चार वर्षे! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० आश्‍विन कृ. सप्तमी.
आजचा वार : वेडनसडेवार.
आजचा सुविचार : अर्ज किया है...
दिल्ली से मांग के लाए थे चार साल,
दो खुशी में कट गए, दो बेखुदी में...
..........................................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अतिशय तृप्त भावनेने सकाळी उठलो. शिरस्त्याप्रमाणे आरशात डोकावलो.-‘हाय’ केले! आरशातल्या गृहस्थानेही ‘हाय’ असे ओठ हलवले. मी हसलो. गृहस्थही हसला. मी त्याला म्हटले, ‘अरे, आंघोळ तरी करून घे!’ आरशातला गृहस्थही तसेच काहीसे म्हणाला असावा!! मी नाद सोडला.

...माझ्या कारकिर्दीला आज चार वर्षे झाली. चार वर्षे कंप्लिट! विरोधकांची तोंडे आज कडूझर पडली असतील. हा कोण कुठला नागपूरचा मनुष्य आला आणि मुंबईत येऊन तिखट झाला, अशी त्यांची भावना झाली असेल. साहजिकच आहे. आमचा वऱ्हाडी रस्सा मुंबईकरांना नाही म्हटले तरी तिखटजाळ लागणारच. ज्यास्त तिखट खाल्ल्यावर जे होते, तेच विरोधकांचे झाले असणार! मी मुद्दाम त्यांच्याशी नम्रपणा आणून ‘या, बसा’ असे म्हणतो. ते उभेच राहतात. कारण उघड आहे! अति तिखट खाल्ल्यानंतर खुर्चीवर बसणे मुश्‍किल होते...असो!

गेल्या चार वर्षांत ह्या लोकांनी मला कुठे कुठे धाडायचा प्रयत्न केला, ते आठवत होतो. काही लोकांना मी पुन्हा नागपूरला जाऊन सूटिंग- शर्टिंगच्या जाहिराती कराव्यात असे वाटत होते. तर काहींनी ‘मी आर्केस्ट्रात रफीची गाणी म्हणावीत’ असे उघडपणे सुचवले. काहींना मी दिल्लीत गेलो तर बरे असे वाटू लागले तर काहींनी... जाऊ दे. आपल्याला काय करायचे आहे? चार वर्षे टिकलो हेच चिक्‍कार झाले.
आमचे कुलगुरू व थोर ब्रह्मांडनायक श्रीश्री नमोजी ह्यांचा सकाळीच संदेश आला होता. ‘‘बेटा, कोंग्रेच्युलेशन्स... च्यालू राख्खो! तोडी नाख तबला ने फोडी नाख पेटी! बहोत बहोत बधाई!!’’ मन उचंबळून आले. खुद्द नमोजींचा आशीर्वाद मिळाला की मला बारा हत्तींचे बळ येते. पाठोपाठ शहासाहेबांचाही मेसेज आला. मेसेज तोच होता, फक्‍त खालचे नाव बदलून ‘मोटाभाई’ असे होते. आणखी बारा हत्तींचे बळ आले! (एकूण आता चोवीस हत्तींचे बळ झाले!!) त्या बळाच्या जोरावर आमचे बांदऱ्याचे परममित्र उधोजीसाहेबांना फोन केला. आश्‍चर्य म्हणजे त्यांनी उचलला.
‘‘जय महाराष्ट्र! कायाय?’’ त्यांनी विचारले.

‘‘आज चार वर्षे पूर्ण झाली. थॅंक्‍यू!’’ एवढेच मी म्हणालो. पलीकडे शांतता होती. अस्फुट आवाजात पुटपुटल्यासारखा आवाज आला. शब्द ऐकू आले नाहीत. तेवढ्यात भांडीकुंडी फुटल्याचे काही आवाज आले. थोड्या वेळाने पुन्हा लाइनवर येत ते म्हणाले, ‘‘थॅंक्‍यू तर थॅंक्‍यू!’’ एवढे म्हणून त्यांनी फोन आपटला.
मी मनावर घेतले नाही. आमच्या परममित्रांचा राग हासुद्धा प्रेमाचाच आविष्कार असतो, हे मी अचूक ओळखले आहे. आपले माणूस प्रेमाच्याच माणसाला दटावत असते. नाही का? दिवसभर खूप पुष्पगुच्छ येतील, हे ओळखून मी त्यासाठी जागा साफसूफ करून ठेवली. तेवढ्यात नाथाभाऊंचा फोन आला. ‘ओळख ठेवा!’ एवढेच ते म्हणाले. मी ‘हो’ म्हटले. फोनाफोनी करून जरा कुठे टेकतो तेवढ्यात घामाघूम होऊन आमचे चंदूदादा कोल्हापूरकर आले.
‘‘अभिनंदन! आता पुढे काय?’’ असे त्यांनी विचारले.

‘‘चार वर्षे कशी गेली कळलंदेखील नाही...नै?’’ त्यांना सहज अभिमानाने म्हणालो.
‘‘तुम्हाला नाही कळली, पण महाराष्ट्राच्या जनतेला कळली आहेत...त्याचं काय?’’ ते म्हणाले.
...मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढल्या अभिनंदनासाठी तयार झालो. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com