कलोजस ऑफ नीरो! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

हातातील चिमुकले फिडल
खाली ठेवून सम्राट नीरोने
पाहिले सभोवार गर्वाने,
बराच वेळ निरीक्षण करून
पॅलाटाइन टेकडीकडे रोखत
आपले चक्रवर्ती बोट, तो म्हणाला :
‘‘ऐका रे...इथल्याच एखाद्या कड्यावर
कोरून काढा सूर्यदेवतेचे
भव्यदिव्य शिल्प, जे देत राहील
प्रेरणा अहर्निश येणाऱ्या-जाणाऱ्या
सहस्र पिढ्यांना, सांगत राहील
विजयगाथा, येणाऱ्या-जाणाऱ्या
देशोदेशीच्या मुशाफिरांना,
दिग्विजयाचा हरेक क्षण
कोरला जावो त्या फत्तरात.
प्रत्यक्ष काळावर मात करो
ते पाषाणकाव्य, आणि
उभे राहो दिमाखात
आपल्या गंडस्थळाचे प्रतीक
जे अक्षुण्ण राहील सर्वऋतुंत,
पावसापाण्यात, वादळवाऱ्यात,
परचक्रात आणि घरचक्रातही!’’

शेजारी उभ्या असलेल्या
प्रसिद्ध रोमन शिल्पकार
झिनोडोरसने सावरला
आपला नम्र झगा, दिला नकार.
म्हणाला : ‘‘सम्राटांचा विजय असो!
परंतु, हे जमणे कठीण आहे...
टेकडीवरील फत्तराचा
ठिसूळ पोत कसा सांभाळेल,
सूर्यदेवतेचा तेजस्वी झोत?
त्या तेजाने जळून जाईल
तेथील हरेक तृणपाते,
दगडांचे होतील कोळसे,
मातीची होईल राख!
...पुतळाच हवा असेल, तर
तो उभा हवा मैदानातच.’’

सम्राट नीरोने मान डोलावली...

हजारो गुलामांच्या परिश्रमातून
शेकडो मण लोह-तांब्यामधून
उभा राहिला मग
गगनाला गवसणी घालू पाहणारा
अफाट, अचाट, उंच उंच पुतळा.
ज्याच्या मस्तकाभोवती
घिरट्या घालणाऱ्या घारींनाही
होते गरगरत, त्याच्या छातीवर
मेघांचे पुंजके होते धडकत.

त्या अवाढव्य पुतळ्याच्या
अनावरणाच्या सोहळ्यात
कैक ग्लॅडिएटर्सनी केले बलिदान,
रथांच्या शर्यतींनी मैदाने दुमदुमली,
सम्राट नीरोच्या जयजयकाराने
निनादले सारे साम्राज्य,
तुस्त झाली रहाटी
गोडाधोडाचे यथेच्छ जेवून...

अनावरणाचे अखंड वस्त्र
सळसळत खाली कोसळले,
तेव्हा सम्राटाने किंचित
आंबट केले तोंड, आणि
शिल्पकार झिनोडोरसला
घेतले बोलावून नजीक
म्हणाला-
‘‘पुतळा ठीक केलास, पण
त्याचा चेहरा माझ्यासारखा का नाही?
मूर्ख कुठला!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com