घरचे कार्य! (ढिंग टांग)

muktapeeth
muktapeeth

गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या गडबडीत राजकारण आणि समाजकारणाकडे अंमळ दुर्लक्ष झाले; परंतु या पुढे आम्ही यथास्थित लक्ष देऊ. गेले काही महिने सदर मंगलकार्याचे आम्हाला प्रचंड टेन्शन होते. सारे काही नीट पार पडते की नाही, ह्याकडे लक्ष (आम्ही नाही तर) कोण देणार? पत्रिकांचे वाटप, मांडववाल्यांशी झगडे, बस्ता बांधणे, पंगतीचा मेनू ठरविणे, कंत्राटदाराशी हुज्जत आदी असंख्य गोष्टींचा मेळ घालणे एका माणसाचे काम नव्हे. निव्वळ मुलीकडची बाजू असती, तर समजू शकले असते. पण आम्ही वरपित्याच्या घरचेही होतो. परिणामी, आमच्याकडे दोन्ही बाजूंकडून पत्रिका आली...काय करणार? जरा कान इकडे करा, ही सोयरीक आम्हीच जुळवून आणल्याने सारे काही यथासांग पार पडते की नाही, हे बघण्याची जबाबदारी आमचीच होती...

‘‘एक निक्षून सांगतो, हुंडाबिंडा भानगडी चालणार नाहीत...,’’ लग्नाच्या याद्या करण्याच्या बैठकीआधीच आम्ही मुळावर घाव घातला. हुंड्याची प्रथा भयंकर वाईट. हुंडेबिंडे मागण्याचे का हे दिवस आहेत? वरमुलग्याच्या बापाने ‘वडी साई, हम आपके शब्दों के बाहर कैसे जा सकते है? लो खा लो पापड...’’ असे खालमानेने कबूल केले. मुलीच्या बापाने आमच्याकडे कृतज्ञतेने पाहिले. त्यांची परिस्थिती नाही म्हटले तरी यथातथाच होती. ब्याडमिंटन खेळून किती पैका मिळणार, सांगा ना! मुळात पदुकोण आडनावाच्या माणसाला तशी समाजात बोलता-वावरताना भीड पडते. त्यात मुलीचा बाप पडला अगदीच भिडस्त स्वभावाचा. ब्याडमिंटनच्या फुलालाही अलगद चापटी मारील, असा!

‘‘एक मिनीऽऽट...मंगळसूत्र कुठे करायला टाकणार आहात? मी सांगतो...’’ आम्ही बोट नाचवून थेट मुद्द्यालाच हात घातला.
‘‘अहो, भावजी, मुलीनं पाहून ठेवलं होतंन एक मंगळसूत्र, अंधेरीच्या एका जवाहिऱ्याकडे! तुमचं नाव सांगितल्यावर तीस टक्‍के सूट देतो म्हणाला!,’’ मुलीच्या आईने खुलासा केला. आमचे नाव परस्पर सांगून काम झाले, हे ऐकून आम्हालाही थोडे बरे वाटले. मग विषय अर्थातच जेवणाचा निघाला...
‘‘हे पहा, उगीच भलती छानछोकी नको. इथं कुणीही जहागीरदार नाही! आपण पडलो मध्यमवर्गीय माणसं. अंथरुण पाहून पाय पसरावेत...काय? ऋण काढून सण साजरे करण्याचे टाळा. नातलग काय वाट्टेल तिथं गिळायला येतात! मी सांगतो, पन्नास पानं पुष्कळ झाली...’’ आम्ही निक्‍काल लावला.
हो-ना करता करता साठ मोजकी माणसं बोलवायची ठरली. ‘पाहिजे तर नंतर रिसेप्शन घाला जोरदार!’ ही सूचनादेखील आमचीच.
लग्नाचा बस्ता बांधायला खरे तर लक्ष्मी रोडला नेणार होतो, पण पुण्यात सध्या ट्राफिकचे हाल भयानक आहेत. मुंबईतल्या दादरचेही तेच!

‘‘मी सांगतो, तो सव्यसाची म्हणून एक आहे, त्याच्याकडून आणा! वेळप्रसंगी भाड्यानंही कपडे देतो! पन्नास रुपये जास्तीचे टिकवलेन, तर टाके घालून फिटिंगमध्ये करून देईल! तो आपल्या शब्दाबाहेर नाही...काय?’’ आम्ही सरळ निर्णय जाहीर करुन टाकला. सर्वांनी माना डोलावल्या. आमची नवरी मुलगी कोकणी आणि जावई सिंधी!! म्हटले दोन्ही पद्धतीनं लग्न लावून टाका...मुंडावळ्या सगळीकडे सेमच असतात...काय?
‘‘कित्ती करता हो भावजी?’’ हे वाक्‍य मुलीच्या आईकडून ऐकलेन आणि ‘‘अच्छ वे पुत्तर...अच्छ वे’’ असे मुलग्याच्या बापाने ऐकवलेन! भरून पावले...इटलीत लेक कोमो का कुठे तरी विवाहसोहळा संपन्न झाला म्हणे! म्हटले, लेक कोमो तर लेक कोमो! आपल्याला काय, लेक चांगल्या घरी पडली हेच खूप!! एवढे मनाशी बोलून आम्ही डोळे पुसत टीव्हीचा च्यानल बदलून बातम्या लावल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com