...पधारो अयोध्या में! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले असून, आपण ब्यागा भरावयास घ्यावात, ही विनंती. येथील पूर्वतयारीचा अहवाल सोबत देत आहे. :

आपण २४ तारखेस दुपारी येथे यावे. (दुपारचे जेवण विमानातच घ्यावे.) इथे आल्यावर दुपारी तीनच्या सुमारास ‘लक्ष्मण व्हिला’ नावाच्या इमारतीत एक धार्मिक कार्यक्रम ठेवला आहे. धार्मिक कार्यक्रम असला की वामकुक्षीची सोय आपोआप होते. तद्‌नंतर सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या पवित्रहस्ते शरयु नदीचे पूजन होईल. अशी भपकेबाज आरती मोदीजींच्या काशीत गंगामैय्याची होते...दुसऱ्या दिवशी सकाळी उठून साक्षात रामलल्लांचे दर्शन घेऊन गुलाबवाडी येथे जमलेल्या शिवप्रेमींसोबत जनसंवादाचा कार्यक्रम होईल. (जाहीर सभा इल्ले!) त्यानंतर पुनश्‍च मुंबईकडे प्रयाण केले जाईल...असा साधारण कार्यक्रम आहे. तुम्हाला आवडेल असे वाटते. सदर कार्यक्रमासाठी आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांची भेट घेऊन त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची आज्ञा दिली आहे. ते नम्रपणे ‘हो’ म्हणाले आहेत. (न म्हणून सांगतात कोणाला?) एक अडचण मात्र ते सोडवू शकले नाहीत...प्रभुरामांच्या ह्या भूमीत पाऊल ठेवताना अगदी जिवावर आले होते. जेथे प्रभुरायाची पाऊले टेकली, वावरली तेथे आपण कोल्हापुरी पायताणे घालून चालायचे? बरे वाटत नव्हते. पालखीची सोय होते का ते पाहिले.-नव्हती! योगीजींना आम्ही पालखीची सोय होईल का अशी थेट विचारणा केली. पण आश्‍चर्य म्हणजे येथील उत्तर भारतीय बांधवांना पालखी म्हणजे काय हेच माहीत नव्हते!! शेवटी त्यांना लोडाला टेकून गोंडा धरून डुगडुगत जाण्याची ॲक्‍शन करून दाखवली. योगीजींनी खांदे उडवले. ते म्हणाले की पाहिजे तर नुसतेच उचलून घ्यायला माणसे पाठवतो!! आम्ही लग्गेच (विषय बदलून) तेथून निघालो. थोडक्‍यात, येथे फिरण्यासाठी मोटारीची सोय करण्यात आली आहे. सारे आलबेल असून सर्व तयारी पूर्ण झाली असून आपण लौकरात लौकर येथे यावे. आम्ही सारे मावळे आपली आतुरतेने वाट पाहात आहोत. कळावे.
आपला नम्र. संजयाजी.
ता. क. : ‘जे रामाचे तेच कामाचे’ हा मेसेज फिरल्यामुळे सभेऐवजी तूर्त जनसंवादच करावा, असे ठरले आहे.
* * *

संजयाजी, अनेक उ. आशीर्वाद. साहेबकामी आपण दिरंग न करता कार्यवाही करीत आहा, ते पाहोन परम संतोष जाहला. मुंबईस परतल्यावर आपणांस एखादे धातूचे कडे बहाल करणेत येईल. चाकराचे कवतिक करणे हे साहेबांचे प्रथम कर्तव्य होय, व ते आम्ही यथास्थित पार पाडू. आम्हांस प्रारंभी सांगण्यात आले होते की अयोध्येत जंगी जाहीर सभा होणार असून जोरदार तयारी सुरू आहे. परंतु, आपल्या पत्रात जाहीर सभेचा उल्लेख नाही. जनसंवादाचा आहे! ह्याचा अर्थ काय? इथलीच चार डोकी तेथे नेऊन त्यांच्यासमोर आम्ही भाषण करावे काय? आम्ही जाहीरसभेसाठी हिंदीतील भाषण एव्हाना तोंडपाठ केले होते, ते आता वाया जाणार काय? त्वरेने कळवावे.
 आपल्या कार्यक्रमाच्या यादीत शरयु पूजनाचा उल्लेख दिसला. तशी आरती गंगातीरावर होते हे आम्ही (टीव्हीवर) पाहिले असून आरतीचे तबक जरा लांबच घ्यावे, उगीच आगीशी खेळ नको असे वाटते. असो. भेटीअंती बोलूच. कळावे. उधोजीसाहेब.
ता.क. : ही आमची जाहीर सभा आहे की ‘कभी तो पधारो हमारे अयोध्या में’ छापाचा यूपीचा पर्यटन सोहळा? कळावेच. उ. ठा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com