फ्वॉ! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

‘‘फॉ...फॉ..फ्वॉ..,’’ आम आदमी म्हणाला.
‘‘का?..क्‍वॉ..?’’ आम्ही विचारले.
‘‘...पण डोळ्यात डायरेक्‍ट मिरचीची पूड फेकणं योग्य आहे फ्वॉ?,’’ रडवेल्या आवाजात आम आदमीने आम्हाला विचारले आणि आमचे काळीज गलबललेच. हे खरेच होते. माणसाने आपला निषेध व्यक्‍त करावा, पण असा? छे, भलतेच! शिवाय मिरचीची पूड हा सैपाकघरातला पदार्थ राजकारणात आणणे निषिद्ध मानले पाहिजे.
‘‘आधीच मला तिखट अजिबात चालत नाही...फ्वॉऽऽ!,’’ दुखावलेल्या सुरात आम आदमीने त्याच्या तब्बेतीचे कारण सांगितले. तिखट अनेकांना चालत नाही. उदाहरणार्थ- आम्ही! मागे एकदा नागपूरचा सावजी मटण रस्सा ओरपल्यानंतर महिनाभर आम्ही उभेच्या उभे होतो. दोन मिनिटे बसलो नाही कुठे...पण ते असो.
‘‘जाम तिखट होती का?’’ आम्ही भीत भीत विचारले.
‘‘गोड मिरची कधी ऐकली आहे फ्वॉ?,’’ आम आदमी खेकसला. गळ्यातील मफलरच्या टोकाचा बोळा तोंडाशी नेऊन नंतर तोंडच्या वाफेने गरम झालेल्या मफलरचा शेक डोळ्याला देत आम आदमी मुसमुसत होता. मफलरच्या ह्या उपयोगाचे आम्हाला भारी कौतुक वाटले. व्वा! मफलरचा शेक ही नामी आयडिया आहे. नाशिकचे आमचे मित्र श्रीयुत छगनबाप्पांना ही आयडिया सांगून ठेवावी, ह्याची आम्ही मनोमन नोंद करून ठेवली.
‘‘अतिशय अमानुष प्रकार आहे, आम आदमीसाहेब! पण मी म्हंटो की हे घडलंच कसं?,’’ आम्ही सहानुभूतीने चौकशी केली. आम आदमीला काही होऊ लागले की (अजूनही) आमचा होश उडतो.  
‘‘मी हा असा कामात बुडालो होतो. माझे पीए म्हणाले की आम आदमीसाहेब, कालपासून पोटात अन्नाचा कण नाही...’’ आम आदमी म्हणाला.
‘‘मग?’’ आम्ही.
‘‘मी म्हटले, काय हे! मग जेवून घ्या! उगीच कशाला फ्वॉ...फ्वॉ...राहायचे?,’’ आम आदमीने पुन्हा मफलर डोळ्याला लावला.
‘‘मग?’’आम्ही.
‘‘पीए म्हणाला, की मी सकाळपासून तीन वेळा जेवलोय, आपल्या, म्हंजे तुमच्या पोटात अन्नाचा कण नाही, असं म्हणालो मी!!’’ आम आदमीने डोळ्याचा बोळा काढला.
‘‘ओह!,’’ आम्ही म्हणालो.
‘‘आम्ही भुकेले होतो, ह्याची समाजसेवेच्या गडबडीत जाणीवच झाली नव्हती. उठलो आणि कचेरीच्या बाहेर येतो तो हा प्रकार! एका इसमाने पाया पडण्याच्या मिषाने आमच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली हो!! फॉ...फॉ...,’’ आम आदमीने पुन्हा मफलरच्या बोळ्यात वाफ भरून तो डोळ्यावर ठेवला.
‘‘ कोण होता तो इसम?’’ आम्ही चौकशी केली.
‘‘कमळवाल्यांनी पाठवलेला असणार! त्यांनाच हे असले उद्योग सुचतात! पण हा आम आदमी असा मिरचीच्या पुडीला डरणार नाही म्हणावं!!,’’ आम आदमीचा दुसरा डोळाही लाल झाला होता, पण तो रागाने असावा.
‘‘लोक काय काहीही फेकतात! शाई फेकली, बूट फेकले...काहीही फेकत सुटायचं म्हंजे काय?,’’ आमचा सूर निषेधाचा होता हे सांगणे न लगे!!
‘‘शाई येऊ द्या, बूट येऊ द्या...काहीही येऊ द्या! आम्ही नाही म्हणत नाही,’’ आम आदमीने ह्यावेळी डोळ्याला बोळा न लावता बोळ्याला डोळा लावला. तो पुढे म्हणाला, ‘ह्यांच्या फेकुगिरीत मिरचीपूड पर्वडली..फ्वॉय? बरोबर की नाही?’’
‘‘कमळवाल्यांना तरी कशाला बोल लावायचा? आपले लोकसुद्धा भारी स्टंट करतात, म्हणून लोकांचा विश्‍वास बसत नाही अजून!,’’ आम्ही बहुधा त्यांच्या जखमेवर मीठ चोळले असणार!
लालेलाल डोळे रोखून आम आदमी म्हणाला, ‘‘तुम्हीही त्यातलेच! तुम्हाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही! निघा!!’’
...आम्ही तूर्त मफलर शोधत हिंडतो आहो! डोळा अंमळ जळजळू लागला आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com