आम्ही निघालो...तुम्ही? (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

स्थळ : मातोश्री हाईट्‌स, वांद्रा सोसायटी.
वेळ : प्रवासापूर्वीचा. काळ : चलो अयोध्या!
प्रसंग : कठीण!
पात्रे : परमप्रतापी रामभक्‍त श्रीमान उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.
...........................
विक्रमादित्य : (अचंब्याने) दोन दिवसांचा दौरा आहे! येवढी मोठी बॅग कशासाठी घेताय बॅब्स?
उधोजीसाहेब : तू गप्प बस बघू! महत्त्वाचा दौरा आहे! सामान होणारच! आपल्यापैकी कोणीही आजवर इतक्‍या लांब पल्ला मारलेला नाही! कळलं?
विक्रमादित्य : तिकडे तुम्ही युद्ध करणार आहात बॅब्स?

स्थळ : मातोश्री हाईट्‌स, वांद्रा सोसायटी.
वेळ : प्रवासापूर्वीचा. काळ : चलो अयोध्या!
प्रसंग : कठीण!
पात्रे : परमप्रतापी रामभक्‍त श्रीमान उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.
...........................
विक्रमादित्य : (अचंब्याने) दोन दिवसांचा दौरा आहे! येवढी मोठी बॅग कशासाठी घेताय बॅब्स?
उधोजीसाहेब : तू गप्प बस बघू! महत्त्वाचा दौरा आहे! सामान होणारच! आपल्यापैकी कोणीही आजवर इतक्‍या लांब पल्ला मारलेला नाही! कळलं?
विक्रमादित्य : तिकडे तुम्ही युद्ध करणार आहात बॅब्स?
उधोजीसाहेब : (गोरेमोरे होत) छे छे! युद्धबिद्ध कोण करतंय? पण जी जागा खाली करण्यासाठी आपले लोक गेले, त्या जागी राममंदिर बांधायला नको का? आम्ही युद्धायमान झाल्याशिवाय ते होणे नाही!!
विक्रमादित्य : (थक्‍क होऊन) तुम्ही बांधणार राममंदिर?
उधोजीसाहेब : (डोळे मिटून) मी फक्‍त सुरवात करून देणार आहे! त्यासाठीच एवढं सामानसुमान घेऊन चाललो आहे!
विक्रमादित्य : (शांतपणाने) बॅब्स, एक बॅकपॅक तेवढं घ्या, असा माझा ॲडव्हाइस आहे!
उधोजीसाहेब : (वैतागून) तुला विचारलाय कुणी ॲडव्हाइस?
विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) ही गदा कशाला हवी बरोबर?
उधोजीसाहेब : (संयमानं) त्याला कुदळ म्हणतात!!
विक्रमादित्य : (कुतुहलानं) आणि हे कुठलं नवं वेपन आहे?
उधोजीसाहेब ः (राग गिळत) ते वेपन नाही...फावडं आणि फावडं!!
विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवत) आता ही ढाल नाही, असंही सांगाल!!
उधोजीसाहेब : (दातओठ खात) नाहीच्चे!! त्याला घमेलं म्हणतात, घमेलं!! तू जा बरं तुझ्या खोलीत!!
विक्रमादित्य : (आश्‍चर्यानं)...आणि हे काय? शिरस्त्राण, चिलखत वगैरे!! तुम्ही खरंच युद्धबिद्ध करणार नाही ना बॅब्स?
उधोजीसाहेब : (लोकरी कपडे दडपत) छे रे! तिकडे थंडी असेल, म्हणून कानटोपी आणि स्वेटर घेतलाय एवढंच!! (चिंताग्रस्त सुरात)...संध्याकाळी मला तिथे शरयू नदीची आरती करायची आहे! नदीकिनारी वारं असतं बरंच..नै!
विक्रमादित्य : तुम्ही नदीत उतरून अर्घ्य वगैरे देणार बॅब्स? धम्माल!!
उधोजीसाहेब : (उडवून लावत) वेड लागलंय का? पाणी थंड असतं तिथलं!!
विक्रमादित्य : आणि ह्या कलशात काय आहे? माती?
उधोजीसाहेब : खबरदार, त्याला माती म्हणालास तर!...शिवनेरीगडाचा प्रसाद आहे तो! शिवरायांच्या जन्मभूमीची मृत्तिका अयोध्येत रामजन्मभूमीच्या मृत्तिकेत मिसळणार आहे मी! मी स्वत: वाजत गाजत शिवनेरीगडावर जाऊन हा कलश भरून आणलाय! ही माती नसून तमाम शिवप्रेमींच्या भावनाच आहेत! पुण्यभू, मातृभू...स्वतंत्रभू! ह्या भूला माझे वंदन असो!!
विक्रमादित्य : (विषय बदलत) सिमेंट कुठाय?
उधोजीसाहेब : (क्रुद्ध चेहऱ्यानं) राममंदिर मोहिमेचा अध्वर्यू म्हणून चाललोय तिथं! गवंडी म्हणून नाही!! तू एकतर मला बॅग भरायला मदत कर, नाहीतर आपल्या खोलीत जा बघू!!
विक्रमादित्य : एवढं सामान एका ब्यागेत मावणं शक्‍यच नाही!!
उधोजीसाहेब : (युक्‍तिवाद करत) आपले इतके मावळे त्या अयोध्येत मावू शकतात, तर हे सामान ब्यागेत का मावणार नाही? बस त्या ब्यागेवर मी लावतो कुलुप!!
विक्रमादित्य : (आज्ञेप्रमाणे ब्यागेवर बसत) बॅब्स, एक विचारू?
उधोजीसाहेब : (निर्वाणीच्या सुरात) पण एकच विचार!!
विक्रमादित्य : (निरागसपणाने) हा तुमचा आध्यात्मिक दौरा आहे की राजकीय? की...आपली एखादी बिझनेस ट्रिप?
उधोजीसाहेब : (खवळून) हर हर हर हर महादेऽऽऽव!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article