मंदिर वहीच बनायेंगे! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

माझ्या तमाऽऽम मावळ्यांनो, सरदारांनो, दरकदारांनो... आणि माता-भगिनीन्नो, आपल्या कृपाशीर्वादाच्या आणि पाठबळाच्या जोरावरच आम्ही श्रीराम मंदिराचे शिवधनुष्य खांद्यावर पेलिले आहे. (टाळ्या आणि कुचकट हशा!) पाठीवरल्या भात्यात मुबलक बाण आहेत!! (हिप हिप हुर्रेची ओरड) भारताच्या सर्व प्रश्‍नांवर मंदिर हा एकमेव रामबाण उपाय आहे, ह्याबद्दल आमच्या मनात यत्किंचितही शंका नाही. ‘मंदिर तिथ्थेच (‘थ’वर जोर...) बनवणार’ हे आमचे ब्रीद असून बांधकामाची पहिली वीट आम्ही तेथे नुकतीच पोहोचवली आहे. (टाळ्याच टाळ्या!) उरलेल्या विटा आणि दगड यथावकाश पोहोचतील! काही दगड ऑलरेडी पोहोचले असून तेथे गर्दी येवढी झाली आहे, की आपल्या ते लक्षात येत नसेल!! (कुजबूज) काही निर्लज्ज लोकांनी असंख्य भूलथापा आणि खोटी वचने देऊन रामभक्‍तांना तेथे झुलवत ठेवले. (‘शेम शेम’च्या घोषणा) म्हणे, मंदिर वही बनायेंगे!! वारेव्वा!! वही काय वही? असल्या कोऱ्या वह्या काय कामाच्या? (प्रचंड हशा) ह्या खोटारड्यांनी राममंदिराच्या जोरावर पंचवीस वर्षे सडवली! होय, आम्ही म्हणतो की सडवलीच! युती सडते तशी ही वर्षे सडवली!! परंतु, आम्ही आता ह्या लोकांची दुकानदारी ताबडतोब बंद करणार आहो!! (जयजयकार) अयोध्येत प्रभुरामाचे मंदिर बनणार, ही संगमरवरी शुभ्र दगडावरची रेघ आहे आणि आमचे वचनही!! ह्या वेळी आम्ही (इन्शाल्ला) ते पाळणार आहो!! (जयजयकार) माझ्या मावळ्यांनो, ‘मंदिर वही बनायेंगे’ हा नारा आता जुना झाला. आता आम्ही नवा नारा देत आहो! ‘‘मंदिर वहीच बनायेंगे!’’ (टाळ्या आणि जयजयकार) ह्या ‘वहीच’ मधला ‘च’ चप्पलेतला ‘च’ उच्चारावा! आधीच्या नाऱ्यात फक्‍त कोरी ‘वही’ होती, आम्ही तिला ‘च’ जोडून भारदस्त मुंबईपण आणले आहे! ‘मंदिर वहीच बनायेंगे’ हे नवे घोषवाक्‍य हंड्रेड पर्सेंट बंबैय्या आहे, हे कोणीही ओळखेल!! (आवाऽऽज कुणाच्चा... ही घोषणा दुमदुमते) ‘मंदिर वहीच बनायेंगे, आऊर हमईच बनायेंगे’ हा आमचा मूळ नारा आहे. (घोषणांचा पाऊस!) मंदिर बनवायला जे कारागीर लागतील, ते आम्ही मुंबईहूनच अयोध्येला नेणार आहो! म्हंजे उत्तर भारतीय कारागीरांना आधी मुंबईत येऊन सेटल व्हावे लागेल, मगच गाडीत बसून परत इथे यावे लागेल! कारण बांधकामे करणारे कारागीर हे प्राय: उत्तरेतलेच असतात असा आमचा मुंबईतला अनुभव आहे. हे का मराठी माणसाचे काम आहे? (टाळ्या)
लोक आम्हाला विचारतात की चार वर्षांनंतर अचानक तुम्हाला मंदिराची आठवण कां आली बुवा? ऐका उत्तर : गेली चार वर्षे आम्ही अयोध्येत मंदिर नेमके कुठल्या दिशेला तोंड करून बांधावे, ह्याचा विचार करत होतो. नेमकी पूर्व दिशा कुठली ह्याविषयी मतभेद होते. अखेर आम्ही एका दिशेला बोट दाखवून ‘ही पूर्व दिशा’ असे सांगितले!! विषय संपला!! (जयजयकार) कळले?
‘अयोध्या-प्रकरणी कोणीही राजकारण करू नये, पाप लागेल’ असे आम्ही विरोधकांना बजावून सांगितले आहे. ह्या उदात्त आणि वंद्य विषयाचे राजकारण करणाऱ्यास चौदा वर्षे वनवासाची शिक्षा ठोठावली पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठीच आम्ही अयोध्येत जाऊन आलो!! काय म्हणालात? कुंभकर्ण रावणाच्या बाजूने लढत होता? रामाच्या नाही? असेल असेल!! हमकू कुच नै फरक पडता!! आम्ही त्याला जागे करू म्हंजे करूच!! आमचा बाण एकदा सुटला म्हंजे सुटला! मग तो कुणाच्या कुठे जाऊन लागेल, ह्याचा काही नेम नाही!! कळले? तेव्हा मावळ्यांनो, तयारीला लागा! मंदिर वहीच बनायेंगे!
जय महाराष्ट्र. जय अयोध्या... आणि जय बांद्रा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com