झाले उन्हाचे चांदणे! (ढिंग टांग)

शनिवार, 1 डिसेंबर 2018

प्रिय मित्र नानासाहेब-

प्रिय मित्र नानासाहेब-
सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आज पहिल्यांदा आम्ही ‘प्रिय’ अशा मायन्यासमेत आपणांस हे खत लिहितो आहो, ह्याची नोंद घ्यावी! ह्याचा अर्थ एवढाच की आम्ही खुशीत आहोत!! महामंडळांच्या खिरापतीत आमच्या तळहातावर दोन चमचे खिरापत (गपचूप) ज्यास्त ठेवलीत. नाणारची जमीन आपण (एकदाची) शापमुक्‍त केलीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीत. आता (आमच्या आज्ञेबरहुकूम) मराठा आरक्षणाचे भिजते घोंगडेही वाळवून काढलेत!! एकंदरीत कारभार बरा चालवलात. त्याखातर आम्ही एक पितळेचे सलकडे बक्षीस म्हणून पाठवत आहोत. वर ‘प्रिय’ म्हटलेच आहे. आणखी काय हवे? ईश्‍वर तुम्हास (थोडेसेच) यश देवो! बाकी भेटी अंती.
उधोजी.
ता. क. : आम्ही अयोध्येच्या मोहिमेत थोडेसे व्यग्र होतो...नाहीतर ही सर्व कामे आम्ही दोन मिनिटांत करून टाकली असती. तुम्हाला थोडा वेळ लागला! पण ते जाऊ दे. देर आये, दुरुस्त आये!. उ. ठा.
* * *
प्रिय प्रिय आदरणीय माननीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान उधोजीसाहेब यांच्या चरणारविंदी बालके नानासाहेबाचा शिर्साष्टांग नमस्कार. आपल्या दूताने एक बंद पाकिट दिले. त्यात गोल गोल काय आहे, हे आम्ही चाचपून बघत होतो. बांगडीसारखे वाटल्याने थोडे गोरेमोरे झालो. भीत भीत पाकिट उघडले. आत पितळेचे सलकडे होते आणि सोबत आपले पत्र! वाचून आनंद गगनात (आणि पोटात) मावेनासा झाला...
आपण अयोध्येच्या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेत व्यग्र होता, त्यामुळे (ह्या वेळी) तुम्हाला त्रास न देता सरप्राइज द्यायचे होते. आपण ‘प्रिय’ मायन्याचे पत्र पाठवलेत, ह्यात सारे काही आले!! खरे सांगू? मायना वाचून माझ्या डोळ्यांत पाणीच आले. ‘ह्याचसाठी केला होता अट्टहास’ असे वाटले. ‘झाले उन्हाचे चांदणे’ अशी भावना झाली. सलकड्याबद्दल आभार. अशी (पितळेची का होईना) सलकडी बक्षीस मिळणार असतील तर हा नाना तुमच्यासमवेत अयोध्येला येऊन बांधकामाच्या विटा वाहील, विटा!! बाकी काय लिहू? आभार! सदैव आपला.
नाना.
ता. क. : ‘बाकी भेटी अंती’ असे तुम्ही म्हटले आहे! ते कधी? कधी? कधी? कोळंबीची खिचडी आणि खिमा प्याटिसची सय येत्ये आहे!!
कळावे. नाना.
* * *
नाना-
एकदा ‘प्रिय’ म्हटले म्हणून दरवेळी म्हणणार नाही! एखाद्यास बोट दिले की मनगट धरून दंडावर चढत खांद्यावर बसून कानात गप्पा करणाऱ्यांचा एक टाइप असतो, त्यापैकी तुम्ही कमळवाले लोक आहात! म्हणूनच आम्ही तुमच्यापासून दोन हात दूर राहातो. कोळंबीची खिचडी आणि खिमा प्याटिस खाण्याचे का हे दिवस आहेत? महागाई किती वाढली आहे. (मेथी चाळीस रुपये जुडी!! हेच का तुमचे अच्छे दिन?) शेतकऱ्यांना नेमकी कर्जमाफी किती मिळाली? हे अजून कळलेले नाही. महामंडळाच्या नियुक्‍त्या केल्यात, पण निधी कुठे आहे? मंत्रिमंडळात आमच्या लोकांना स्थान दिलेत, पण निर्णय कुठे ते घेतात? मराठा आरक्षण झाले, पण सरकारी नोकऱ्या कुठे आहेत? तुमचे हे असेच असते! नुसता भास!! कसले उन्हाचे चांदणे नि कसले काय! हॅलोजनचे दिवे लावून त्याला चांदणे म्हणू नका!! को. खि आणि खि. प्या. खायला अजून टाइम आहे हे लक्षात घ्या. ‘प्रिय’ म्हटले म्हणून युती झाली असे समजू नका! ‘बाकी भेटी अंती’ असे लिहिण्याची पद्धत आहे. ते आम्ही बंगालच्या ममतादीदींना उद्देशूनही म्हणतो! तेव्हा, धीराने घ्या. (अजून तरी) तुमचाच
उधोजी.
ता. क. : हॅलोजनचे चांदणे ही उपमा कशी आहे? उ. ठा.