नगारे आणि...टिमकी! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० कार्तिक कृष्ण द्वादशी.
आजचा वार : ट्युसडेवार.
आजचा सुविचार : युतीचे तोरण चढे...गर्जती तोफांचे चौघडे!
...............................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कालचा दिवस सुवर्णाक्षरात कुठेतरी लिहून ठेवावा लागेल. मन कसे तृप्त झाले आहे. परममित्र उधोजीसाहेब आणि मी दोघे मिळून द्वंद्वगीत म्हणत आहोत, असे स्वप्न मला नेहमी पडत असे. सुरवातीला असे स्वप्न पडले की मी दचकून जागा होत असे. हल्ली हल्ली तसे स्वप्न पडावे, अशी स्वप्ने बघू लागलो होतो. पण काल वाशिममध्ये हे स्वप्न ऑलमोस्ट पूर्ण झाले!! आम्ही दोघांनी अगदी द्वंद्वगीत म्हटले नाही, तरी दोघांनी मिळून नगारे मात्र बडवले!! अहाहा!!
वाशिमच्या कार्यक्रमात आम्ही एकाच व्यासपीठावर होतो. त्या व्यासपीठावरच नगारे ठेवलेले होते. संयोजकांनी आमच्या हातात टिपऱ्या दिल्या. हातात टिपऱ्या आल्यावर आमचे मित्र गोंधळले.
‘‘ह्याचे काय करायचे असते?’’ त्यांनी विचारले. मी त्यांना ‘वाजवा!’ अशी खूण केली. त्यांना कळले नाही.
‘‘अहो, नगारे हे असे वाजवायचे असतात..!,’’ ढुम्मकन एक टिपरी नगाऱ्यावर हापटत मी म्हणालो.
‘‘असं होय! मला काय वाटलं की हिते आपल्याला गरबा खेळायला लावतात की काय!!,’’ सुटकेचा निःश्‍वास टाकत उधोजीसाहेब म्हणाले. मी हसलो. खरे सांगायचे तर मी गरबासुद्धा खेळायला तयार झालो असतो. युतीसाठी वाट्टेल ते करायची आपली तयारी आहे. असो.
संयोजकांनी खूण करताच मी दणक्‍यात नगारा बडवला. आम्हा नागपूरकरांना काहीही बडवणे म्हटले की अनन्वित उत्साह येतो. शिवाय मी हा प्रकार आधी करून पाहिला आहे. दोनेक वर्षांपूर्वी आमचे परमदैवत श्रीमान नमोजीसाहेबांनी चीनमध्ये जाऊन नगारे वाजवणे, जपानमध्ये जाऊन ड्रम वाजवणे, आणखी कुठे जाऊन बासरीबिसरी वाजवणे अशा नानाविध कलागुणांचे प्रदर्शन केले होते. मी बरा गातो, असे (नागपुरातील) लोक म्हणतात. ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू’ ही पं. किशोरकुमारजींची द्रुतलयीतली चीज आणि ‘महबूबा महबूबा’ ही आरडी बर्मनरचित अस्सल अभिजात बंदिश मी गाइलेलीच नागपूरकरांच्या कानी असेल!! पण ते जाऊ दे. स्वत:चेच कौतुक किती करायचे? उधोजीसाहेबांनी मात्र (स्वबळावर) हळूचकन एक टिपरी नगाऱ्यावर टपकवली!! माणूस कमालीचा जंटलमन आहे. नगाऱ्याला उगीच दुखेल, ह्या काळजीने त्यांनी असे केले असावे का? त्यांच्या मनाची कोमलता बघून मला,- खरे सांगतो, गलबलून आले...
‘‘हाणा की जोरात!! उगीच गालावर टिचकी मारल्यागत काय वाजीवता?’’ असे एका कार्यकर्त्याने त्यांना सुचवले. पण त्यांनी निक्षून नकार दिला. म्हणाले, ‘‘आता आम्ही जो काही आवाज काढू तो अयोध्येतच!!’’
कार्यक्रमानंतर खरा कार्यक्रम पार पडला! नगारा मन:पूत वाजवून झाल्यावर मी उधोजीसाहेबांच्या कानाला लागलो. त्यांना म्हटले, ‘‘गाडी आणलीये ना?’’
‘‘मग तांबड्या एस्टीनं आलो असं वाटलं काय तुम्हाला?’’ ते वैतागून म्हणाले. मी दुर्लक्ष केले.
‘‘दोघांसाठी जागा आहे का?,’’ मी विचारले.
‘‘कोण येतंय?’’ ते.
‘‘मीच!’’ हसून मी म्हणालो. त्यांनी काही बोलायच्या आत त्यांच्या गाडीत शिरून बसलो. नाइलाजाने तेही त्यांच्या गाडीत टॅक्‍सीत बसावे तसे बसले. गाडी भुर्रर्रदिशी निघाली. आख्ख्या प्रवासात एक अक्षरही बोललो नाही. आज सकाळी वर्तमानपत्रे उघडली, तर अपेक्षेप्रमाणे युतीवर शिक्‍कामोर्तब झाल्याच्या बातम्या आणि अग्रलेख!! मी गालातल्या गालात हसलो. सकाळपासून मोबाईल फोनवर उधोजीसाहेबांचे चौदा मिस्ड कॉल आहेत! चालायचेच!! नगारा वाजला, यापुढे युतीची टिमकी वाजवणं सुरू!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com