नाम (दार) काफी है..! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (झटकन हातातले वर्तमानपत्र पाठीमागे दडवत) आलास...ये! बरं झालं!
बेटा : (फिल्मी स्टाइलमध्ये) ये तुम मुझसे क्‍या छुपा रही हो...मांऽऽऽ..!
मम्मामॅडम : (सारवासारव करत) छे, काही नाही! साधं वर्तमानपत्र तर आहे!! तुझ्यासाठी आज मी मस्त पिझ्झा केलाय! खाऊन घे!
बेटा : (पोटावरून हात फिरवत) नको! राजस्थानात डालबाटी चूरमा खाऊन पोट तुडुंब भरलंय! और मैं अब पिझ्झा नही खा सकता! जब तक मेरे गरीब, किसान और मजदूरोंका पेट नहीं भरता, मैं पिज्झा नही खाऊंगा! न खाऊंगा, न खाने दूंगा!!
मम्मामॅडम : (गपचूप वर्तमानपत्र ठेवत) राजस्थानचा काय हालहवाल?
बेटा : (खांदे उडवत) काय असणार? तिथे तर आपला विजय पक्‍का आहे!  ह्यावेळी आपल्या पार्टीशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीए लोकांपुढे!! मिरचीचा भाव साफ पडलाय तिथं!!
मम्मामॅडम : (हादरून) मध्येच हे काय मिरचीचं?
बेटा : (गंभीरपणाने) तिथले शेतकरी मला भेटले होते! म्हणाले, साहेब, मिरचीला काही भावच नाही सध्या!! हिरवी मिरची घरात इतकी पडून आहे की खाली बसताच येत नाही!! लाल मिरचीला मात्र डिमांड आहे! मी त्यांना म्हटलं मग लाल मिरचीच पेरा!! मुळात मिरची फार लावूच नका!!
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडून) का?
बेटा : (खुलासा करत) झोंबते ना!!
मम्मामॅडम : (नाराजीच्या सुरात) ते कुंभकर्ण लिफ्ट योजनेचं काय बोललास? सोशल मीडियावर सगळे हसतायत आपल्याला!!
बेटा : (बेफिकिरीने) हां हां, ते माझं झुंझुनूचं भाषण ना! हॅ, ते काहीच नाही!! मी तिथं दोनच गोष्टी बोललो, एक म्हणजे मी म्हटलं की मला तुमच्या गावाचं नाव जाम आवडलं! झुंझुनू!! उच्चारताना मजा येते!! हो ना? दुसरं म्हंजे तुमच्या इथल्या कुंभकर्ण लिफ्ट योजनेची ह्या कमळवाल्यांनी वाट लावली, त्यांना आता बाहेरची वाट दाखवा, असं मी म्हणालो! आता ह्यात चुकीचं काय होतं?
मम्मामॅडम : (समजुतीच्या स्वरात) कुंभाराम लिफ्ट योजना आहे ती! कुंभकर्ण नव्हे!! चौधरी कुंभाराम हे तिथले थोर पुढारी होते! आपण सगळी माहिती नीट घेऊन जावं!! कुंभारामचं कुंभकर्ण करणं शोभतं का तुला? लोक किती हसले!!
बेटा : (युक्‍तिवाद करत) मी मुद्‌दामच तसं बोललो!! लोकांमध्ये जरा हशा पिकवला की मजा येते! म्हणून तर लोक माझ्या भाषणांना एवढी गर्दी करतात! साधंच काहीतरी बोललं की मीडियावालेसुद्धा दोनशे वेळा दाखवत नाहीत!! ते मोदीअंकल वाट्‌टेल ते बोलतात ते चालतं का? माझ्याच चुका काढण्यात काय पॉइण्ट आहे?
मम्मामॅडम : (समंजसपणे) आपण कशाला दुसऱ्याच्या नाकाकडे बघावं? आपला रुमाल आपल्यापाशी असला म्हंजे झालं!!
बेटा : (न कळून) म्हंजे? माझ्याकडे रुमाल नसतो! पण शर्टाच्या बाह्या कशासाठी असतात मग?
मम्मामॅडम : (पुन्हा विषय बदलत) नीरव मोदी की जय, मेहुल चोक्‍सी की जय वगैरे घोषणा द्या, हे तुझं आवाहन बाकी छान होतं हं!!
बेटा : (उत्साहात येत) दे टाळी!! धम्माल आली ना!! लोक इतके हसले, इतके हसले की तिथेच मी इलेक्‍शन जिंकलं ह्याची खात्री पटली!! त्या मोदी अंकलची चांगलीच जिरली!! हाहा!!
मम्मामॅडम : (एक पॉज घेत) राजस्थानमधले आपले कार्यकर्ते निराळीच घोषणा देताहेत!!
बेटा : (कपाळाला आठी घालत) कुठली?
मम्मामॅडम : (विषण्णपणे) नामदार की जय, नामदार की जय!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com