वर्म! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

कलियुगातील कमलपत्रावरील
ही एक अस्पर्शित लोककथा.
कुणीही कुणालाही कधीही
न सांगितलेली.
कुणीही कुणाकडून कधीही
न ऐकलेली
कुणीही कधीही कधीही
(आजवर) न लिहिलेली

अनमर्त्यनामे नगरीत
एका असुराने आक्रमण
करून थैमान घालून
प्रजाजनांना केले ‘त्राहिमाम’
आरंभला एकच विध्वंस.
गावाच्या वेशीवरील
पर्वताच्या गुहेत राहून
तो ग्रामस्थांस छळो लागला.
हतबल झालेल्या गरीब बिचाऱ्या
प्रजेने तरी काय करावे?
आलिया भोगासी असावे सादर...

-काहींनी किडूक मिडून विकून
देशाटन केले.
-काहींनी लपून छपून
दिवाभीताचे जिणे मान्य केले.
-काहींनी असुराची भक्‍तीच सुरू केली.
म्हणाले : हा असुर नव्हे, हे तो दैवत!
लोककल्याणासाठी, धर्मसंस्थापनार्थाय
संभवामि युगे युगे अवतरलेला
हा तर अलौकिक अवतार!

..काहींनी मात्र झडझडून
अंग झाडत बंडाची भाषा केली.

असुराचे निर्दालन झालेच पाहिजे
स्वातंत्र्याचा हुंकार उमटलाच पाहिजे
पुनश्‍च प्रजासत्ताक उभारलेच पाहिजे
त्यासाठी देह पडला तरी बेहत्तर,
पडेल ते मोल वेंचून
असुरमर्दन केलेच पाहिजे,
केलेच पाहिजे, केलेच पाहिजे...

पेटत्या पलित्यांच्या उजेडात
बंडखोरांच्या टोळक्‍याने
घेतली आण असुर लोळवण्याची.
एक सळसळत्या रक्‍ताचा
तरुण बंडखोर तांबारलेल्या
नजरेने आग ओकत म्हणाला :
‘‘माझ्या सानथोर साथींनो,
असुराच्या निर्दालनाची व्हा शपथ,
एकसमयावच्छेदेकरोन उठावानिशी
नष्ट करूया असुराचा आतंक,
धराशायी करूया त्याचा अहंकार,
चिरडून टाकूया, त्याचे भय.
असुर एकटाच, आपण सहस्रावधी!
लक्षावधी मुंग्या लोळवतात
कहारी हत्तीलाही, तद्‌वत
आपणदेखील करु एकच आक्रमण.
लक्षात ठेवा, शेवटी सर्वश्रेष्ठ असते,
संख्येचे आणि ऐक्‍याचे बळ.
आपल्या सैन्याच्या आघाडीच्या फळ्या
पडतील धारातीर्थी कबूल,
बिनीच्या शिलेदारांना प्राप्त होईल
वंदनीय हौतात्म्य, कबूल!
परंतु, एका सामान्य सैनिकाचा घाव
वर्मी बसून कधी ना कधी
कोसळेलच ना तो मर्त्य असुर!
तेव्हा उठा, जागृत व्हा!’’

‘जीतम जीतम’च्या आरोळ्या उठल्या...
अनाम सैनिकांनी मिळेल ते
शस्त्र उगारून घेतली धाव...
लढाईला तोंड फुटले...

अवघ्या निर्णायक लढ्याचे
करारी नेतृत्व करणारा तो
तेजस्वी नेता सुरक्षित आडोश्‍याला
उभे राहून सारखा विचारत राहिला :
‘‘लागला का वर्मी घाव...लागला?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com