माय लॉर्ड! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा असतो, असे म्हणतात. माझी कहाणी अतिशय हृदयद्रावक आहे. आपण ती कान देऊन ऐकावी, अशी विनंती आहे. ती ऐकलीत, तर आपल्याही न्यायनिष्ठूर डोळ्यांत अश्रू येतील. म्हणाल, अब रुलायेगा क्‍या पगले?.. तर प्लीज ऐका!

इंग्रजी की देशी? असा एक लाडका पर्याय आमच्या इंडियात असतो. मी ‘देशी इंग्रजी’ पठडीतला मनुष्य आहे. देशी म्हणजे काय हे कृपा करून विचारू नका. ते एक वेगळेच रसायन असते. (त्याबद्दल पुन्हा कधीतरी!) माय लॉर्ड, कोणे एके काळी भारतात माझे नाव राजपुत्रांच्या यादीत घेतले जात होते. मी स्वत: केस खांद्यापर्यंत वाढवून सोबत दाढीही राखत असे. कानात डूल घालून मी माझ्या मालकीच्या विमानातून जगभर फिरत असे. माझ्या मालकीचे असंख्य महाल, हवेल्या, बंगले होते. दाराशी शेकडो आलिशान मोटारी होत्या. त्या शानदार वास्तूंमध्ये नव्या नवेल्या अप्सरांचा संचार असे. सकाळी जाग आल्यावर मला शुभशकुन घडवण्यात येत होते. सकाळचा चहा देण्यासाठी कमनीय दासी असत. पोहे आणणारी (खुलासा : पोहे ही एक देशीच डिश आहे!) दासी वेगळी असे!! त्यानंतरचा माझा दिवस भयंकर बिझी असे. दुपारचे जेवण (वेगळ्या दासींसोबत) मी अंमळ कमीच घेत असे, कारण सायंकाळनंतर अनेक (आणखी वेगळ्या अप्सरांसोबत) पार्ट्यांची कामे असत!!..असे सारे छान चालले होते.
माझी ही राजेशाही राहणी तशीच चालू राहावी म्हणून अनेक बॅंका चढाओढीने मला धन पुरवीत होत्या; पण कालांतराने मला बहुधा शनीची साडेसाती सुरू झाली. (त्याचे मधले अडीचके आत्ता सुरू आहे...) दिलेले पैसे परत करण्याच्या बोलीवर दिले होते, अशी उलट्या काळजाची भाषा बॅंकांनी सुरू केली. माय लॉर्ड, ह्याला काय अर्थ आहे? असे पैसे मागणे भारतीय बॅंकांना शोभले का? तुम्हीच सांगा! नाताळात दिलेली भेटवस्तू आठवडाभराने कुणी परत मागू लागले तर जिवाला किती यातना होतील? माझे तसेच झाले. बॅंकांनी दिलेले हजारो कोटी रुपये परत करायचे आहेत, हे माझ्या गावीही नव्हते. ते परत मागण्याचा धोशा भारतातील सरकार, बॅंका आणि तपास यंत्रणांनी लावल्यावर मला रातोरात पळून येथे यावे लागले...

माय लॉर्ड, आजही भारतात कुठल्याही गावात जा! सायंकाळी जमा झालेले दोस्तांचे टोळके माझी आठवण काढताना दिसेलच; पण चाहत्यांच्या शुभेच्छा मला कमी पडल्या बहुधा! आज केवळ परिस्थितीच्या रेट्यामुळे मला आपल्या देशात आश्रय घ्यावा लागला आहे. भारतात मला नोकरी नव्हती. इंग्रजांच्या देशात आल्यावरही मी नोकरीसाठी वणवण केली. प्रत्येक माणूस मला ‘‘तुला काय येतं?’’
असे मुलाखतीत विचारत असे. मी काय सांगू? पैसा सोडून मला काहीही ‘येण्या’ची अपेक्षाच नव्हती कधी, माय लॉर्ड!! हाती कला-कसब नाही. जे आहे, ते फारसे उघडपणे सांगण्यासारखे नाही!! परिणामी, गेली दोन वर्षे मी आपल्या देशात बेकारीत काढली आहेत. भारतात परत जाण्याची माझी तूर्त तरी प्राज्ञा नाही. भारतातील तुरुंगात भयंकर मच्छर असतात, माय लॉर्ड!! मुंबईत भायखळ्याच्या आर्थर रोड तुरुंगात माझ्यासाठी खास कोठडी बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते; पण तिथे अप्सरांचा संचार असेल का? खानपानाची रेलचेल असेल का? मेजवान्यांचा परिपाठ असेल का? झोपायला छपरी पलंग असेल का? ह्या अटी पूर्ण होणार असतील तर मी भायखळ्याला स्थायिक व्हायला तयार आहे, माय लॉर्ड! रहम करो, रहम करो!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com