बोधकथा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

ऐका, ऐका कान देऊन गंमतशीर गोष्ट
तात्पर्याला मारा गोळी, गोष्टच आहे स्पष्ट

गोष्टी तुम्हि ऐकल्या असतील, असतील लय भारी
इसापनीती, पंचतंत्र किंवा आफ्रिकन सफारी
जंगली प्राणी असतात मस्त, त्यांच्या गोष्टी बेफाम
तात्पर्याचा सूर तेवढा बोअर करतो जाम

गोष्टी तरी किती तरी त्यांच्या नाना परी
त्यांच्यामधलीच अस्सल एक गोष्ट आहे न्यारी
बोलका पोपट, डॉक्‍टर माकड, आळशी ससा, कोल्हा
असला काही गोंधळ नाही, नाही कसला कल्ला

ऐका, ऐका कान देऊन गंमतशीर गोष्ट
तात्पर्याला मारा गोळी, गोष्टच आहे स्पष्ट

गोष्टी तुम्हि ऐकल्या असतील, असतील लय भारी
इसापनीती, पंचतंत्र किंवा आफ्रिकन सफारी
जंगली प्राणी असतात मस्त, त्यांच्या गोष्टी बेफाम
तात्पर्याचा सूर तेवढा बोअर करतो जाम

गोष्टी तरी किती तरी त्यांच्या नाना परी
त्यांच्यामधलीच अस्सल एक गोष्ट आहे न्यारी
बोलका पोपट, डॉक्‍टर माकड, आळशी ससा, कोल्हा
असला काही गोंधळ नाही, नाही कसला कल्ला

कोणे एके काळी होतं एक गर्द रान
किपलिंगच्या ‘जंगलबुका’तलं जणू जिवंत पान!
साळिंदरांची बिळं होती, आणि होते लांडगे
हरणं होती बावरलेली, गवे होते दांडगे

आभाळ पडून धावणारे छोटे छोटे ससे
खरसणारं तरससुद्धा खिदीखिदी हसे
मादीवरती डॉ. मोर फोडत होते टाहो
‘‘बंदुकनळीतून क्रांती जाते, म्हणतो म्हणे माओ!’’

दात आंबलेले कोल्हे काही शोधत हिंडती बिळं
सावरीच्या शेंड्यावरती खेकसे माकड
खुळं, फळं, रेलचेल...अस्सं होतं रान
एवढ्यात आला डरकाळत, आला शेर खान!

फिस्कारलेल्या मिश्‍या आणि मोठे मोठे दात
तांबड्यालाल डोळ्यांमध्ये वसे वादळवात
धारदार नख्या आणि दणकेबाज पंजे
शेरखानाच्या तोडीचे नाही कोणी दुजे

‘‘खामोश!, जंगल प्राण्यांनो, माझ्याशी आहे गाठ
बघतोच आता कसे सुटता, लावतो तुमची वाट
शेरखान म्हणतात मला, आहे ना ठाऊक?
एका झडपेत काम तमाम, जीव घेईन घाऊक!’’

शेरखानाच्या आगमनानं प्राण्यांची वळली बोबडी
साप गेले बिळात, आणि अस्वलानं मारली दडी
ऐकू येईनाशी झाली जंगलात कोल्हेकुई
‘हेही दिवस जातील’ अशी चर्चा प्राण्यांत होई

घाबरून गेले सारे प्राणी, थरकापले की वृक्ष
इतकी वर्षे भक्षक होते, आता झाले भक्ष्य
शेरखानाच्या डर्काळीने थिजले सारे रान
किपलिंगच्या गोष्टीमधले दुमडले ना पान!

असे सारे चालू होते, रानात होती दहशत
कसेबसे दिवस काढत होते प्राणिजगत
तेवढ्यात एकदा पाचोळ्यावर लागली काही चाहूल
आणि हातात हंटर घेऊन आला की राहुल!

तरणाबांड, गोरा गोरा, नम्र आणि धीट
गालावरती खळी आणि तब्बेत एकदम फिट!
शेरखानाला बघून त्यानं वाजवला चाबूक कडाड
म्हणे, ‘‘शेरा, नीघ इथून...की वाजवू एक फडाड!’’

शेरखान म्हणे त्याला, ‘‘जा रे जा, पोरा
उडून जाशील वाऱ्यावरती अस्सा भराभरा!
शेरखान म्हणतात मला, नाय माहीत तुका?
कडंकडंनं घरला जा, आई वरडंल बरं का!’’

पुढं काय? विचारता काय...म्हणे पुढं काय?
विचारणाऱ्याचे लांब कान, नाकात दोन पाय!
उलट्याचे सुलटे झाले, झाला हाहाकार
शेरखान हल्ली करतो कंप्लीट शाकाहार!

म्हणून म्हटलं कान देऊन ऐका गंमतगोष्ट
तात्पर्याला मारा गोळी, गोष्टच आहे स्पष्ट!

Web Title: editorial dhing tang british nandi article