निश्‍चयाचा महासेतू! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

(अर्थात सदू आणि दादू...)

(अर्थात सदू आणि दादू...)

दादू : (संतापून फोन फिरवत) हलो...कोण बोलतंय?
सदू : (शांतपणे फोन उचलत) मीच!
दादू : (करड्या आवाजात) मी कोण?
सदू : (शांत सुरात) मीच!
दादू : (दातओठ आवळत) सद्या, माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव! माझ्या वाट्याला गेलास तर याद राख!
सदू : (थंडपणाने) मी कशाला आड येऊ?
दादू : (डरकाळी मारत) मुंबईचा वाघ आहे मी वाघ!
सदू : (कुत्सितपणे) फू:!!
दादू : (दुर्लक्ष करत) मी जिथे जिथे जातो, तिथे येऊन तू का लुडबुडतोस रे?
सदू : (तुच्छतेच्या सुरात) काय संबंध?
दादू : (भांडण्याच्या पवित्र्यात) मी उत्तर भारतीय बांधवांशी दोस्ती करायला गेलो की लग्गेच तूसुध्दा पुढे येतोस! मी कमळाबाईशी भांडण काढली की तूसुध्दा दोन पावलं पुढे! मी बुलेट ट्रेन नको म्हणालो की लग्गेच तूसुध्दा अज्जिबात नको म्हणत पुढे सरसावतोस!!
सदू : (वाद घालत) उलट बोलतोयस! ह्या सगळ्या गोष्टींना सुरवात मी करुन दिली होती, हे विसरु नकोस! बुलेट ट्रेन नाय पाह्यजे’ हे मी बुलेट ट्रेनचा ‘ब’ उच्चारण्याआधीच बोललो होतो! कमळाबाईचे हेतू दुष्ट आहेत, हे मीच सर्वात आधी म्हणालो होतो! सगळ्यांनी एकत्र येऊन कमळाबाईचा हणम्या करा, असं मीच सुचवलं होतं!!...
दादू : (उडवून लावत) काहीही हं सदू!! मी अयोध्येला गेल्यानंतर तू इथं उत्तर भारतीय बांधवांच्यात मिसळून हिंदीबिंदीत भाषणं द्यायला लागलास, हे शोभलं का तुला? कळतात मला तुझे डाव!!
सदू : (थंडपणाने) माझं कमी खर्चात काम झालं म्हणून जळतोयस का तू दादूराया?
दादू : (नाक मुरडत) अडलंय माझं खेटर!!
सदू : (सज्जनपणाचा आव आणत) मला महाराष्ट्राच्या नवनिर्माणापलीकडे काहीही दिसत नाही दादूराया! त्याच्या आड येणारा प्रत्येक माणूस माझा शत्रू आहे!!
दादू : (इमोशनल होत) मीसुद्धा सद्या? काहीही झालं तरी आपण भाऊ आहोत, हे विसरू नकोस!!
सदू : (कर्तव्यकठोरपणाने) तू अयोध्येत जाऊन आलास! मी कांदिवलीला जाऊन त्याच्या दुप्पट भाषण करून आलो! तुला कार्तिकेय आणि गणपतीबाप्पाची ती गोष्ट माहिताय ना?
दादू : (बुचकळ्यात पडून) कुठली?
सदू : (पौराणिक गोष्ट सांगत) थोडक्‍यात सांगतो- संपूर्ण विश्‍वाला प्रदक्षिणा घालून यायला पार्वतीमातेनं सांगितलं तेव्हा कार्तिकेय गेला विश्‍वसफरीवर आणि गणपतीबाप्पानं आपल्या मातेलाच प्रदक्षिणा घातलीन...काय कळलं?
दादू : (संतापानं लालेलाल होत) बरं बरं! शहाणपणा पुरे!! काय रे, महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी तू काम करतोस ना? महाराष्ट्राचा विकास व्हावा, ही भूमी सुंदर व्हावी, असं वाटतं ना तुला?
सदू : (गंभीरपणे) अवघ्या महाराष्ट्राला माझं नवनिर्माणाचं स्वप्न माहीत आहे...
दादू : (युक्‍तिवाद करत) हो ना! मग प्रत्येक विकासकामात तू खोडा का घालतोस? स्मारक- नको! वल्लभभाईंचा पुतळा- नको! बुलेट ट्रेन नको! उड्‌डाणपुल- नको! कोस्टल रोड- नको! सगळीकडे आपला नन्नाचा पाढा! असं होतं का तुमचं नवनिर्माण?
सदू : (निरुत्तर होत) अगदी तसंच काही नाही...पण...पण-
दादू : (जिरवल्यागत) पण काय पण? मुकाट्यानं माझ्या ‘मुंबईचा महासेतू’ म्हणजेच कोस्टल रोडच्या प्रस्तावाला पाठिंबा दे! त्यातच तुझं नवनिर्माण आपोआप होऊन जाईल! काय? देशील ना मग?
 दे टाळी!!

Web Title: editorial dhing tang british nandi article