बहिष्कार पॉलिटिक्‍स! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 19 डिसेंबर 2018

प्रिय मित्र मा. उधोजीसाहेब,
शतप्रतिशत प्रणाम. दिवसभर कामाच्या धामधुमीत होतो. त्यामुळे फोन करायला वेळ झाला नाही. पण तुम्हाला किमान साताठ वेळा उचकी लागली असेल!! कारण तुमची चिक्‍कार वेळा आठवण आली. परवा कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या (तुम्ही परस्पर उरकून घेतलेल्या) कार्यक्रमाला आम्हाला बोलावणे नव्हते. पण मी मनावर घेतलेले नाही. परवानग्या आम्ही मिळवून दिल्या असल्या म्हणून काय झाले? कुदळ तुम्ही मारलीत!! काहीही असो, तुमच्या राजकीय कारकिर्दीचा कोस्टल रोडही असाच धावत राहो, ह्या शुभेच्छा.

प्रिय मित्र मा. उधोजीसाहेब,
शतप्रतिशत प्रणाम. दिवसभर कामाच्या धामधुमीत होतो. त्यामुळे फोन करायला वेळ झाला नाही. पण तुम्हाला किमान साताठ वेळा उचकी लागली असेल!! कारण तुमची चिक्‍कार वेळा आठवण आली. परवा कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या (तुम्ही परस्पर उरकून घेतलेल्या) कार्यक्रमाला आम्हाला बोलावणे नव्हते. पण मी मनावर घेतलेले नाही. परवानग्या आम्ही मिळवून दिल्या असल्या म्हणून काय झाले? कुदळ तुम्ही मारलीत!! काहीही असो, तुमच्या राजकीय कारकिर्दीचा कोस्टल रोडही असाच धावत राहो, ह्या शुभेच्छा.

कोस्टल रोडच्या कार्यक्रमात सगळी तुमच्याच पक्षाची माणसे होती. मला बोलावणे न धाडल्याने आमच्या पक्षातील काही मंडळींनी रागावून तुमच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला म्हणे. व्हायचे ते होऊन गेले, जाऊ द्या. मंगळवारी, म्हंजे कालच आमचे गुरुवर्य आदरणीय, प्रात:स्मरणीय, माननीय श्रीमद नमोजीसाहेब स्वत: मुंबईत येऊन गेले. त्यांच्या हस्ते मेट्रोची उद्‌घाटने आम्ही करून घेतली. तुमची निमंत्रण पत्रिका खिशातच राहून गेली!! मी दिवसभर त्यांच्यासोबतच होतो. दिवसभर खिसा चाचपत होतो!! आल्या आल्या मा. नमोजींनी विमानतळावरच तुमची चौकशी केली. म्हणाले, ‘‘अरे, आमच्या नान्हा भाई कुठे आहे?’’ मी काही बोललोच नाही. काय बोलणार? ‘असेल इकडेच कुठे तरी’ असे गुळमुळीत बोलून वेळ मारून नेली. त्यांनी हेका सोडला नाही. शेजारी उभ्या असलेल्या दानवेजींनाही विचारले. दानवेजींनी ओठ काढून खांदे उडवले. शेलारमामांनी तर कानाला मोबाईल लावून पोबाराच केला. हे सगळे तुमची निमंत्रण पत्रिका आमच्या खिशात राहून गेल्यामुळे झाले. असो.  

नमोजींच्या हस्ते आम्ही सकाळी राजभवनवर सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण ह्यांच्यावरील पुस्तकाचे विमोचन केले. विमोचनाच्या वेळीही त्यांनी ‘‘आपडो नान्हाभाई क्‍या छे?’’ असे एकदा विचारलेच. मी शिताफीने आर. के.च्या ‘कॉमन मॅन’चे चित्र त्यांच्या पुढ्यात सरकवले. ते खळखळून हसले! कित्ती दिवसांनी मी त्यांना हसताना पाहात होतो!! गेल्या आठवड्यात मध्य प्रदेश, राजस्थानच्या निवडणुका झाल्यानंतर तर...जाऊ दे.
निमंत्रण देणे मात्र राहून गेले, म्हणून कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. तुमची निमंत्रण पत्रिका नावानिशी तयार होती, पण खिशात राहून गेली हो!! पण असल्या छोट्या छोट्या गोष्टी काय मनावर घ्यायच्या? हो की नाही? काहीही झाले तरी आपण मित्र होतो, आहो आणि राहू!! फुर्सतीत भेटू तेव्हा बोलूच. बाकी सर्व क्षेम. सदैव तुमचाच.
 फडणवीसनाना.

* * *
नानाऽऽऽ....
तुमच्या धाडसाचे कौतुक करावे की औद्धत्याची सबक शिकवावी? काय मुलाहिजा करावा, हे कळेनासे झाले आहे. निमंत्रण पत्रिका खिशात राहून गेली, असे खुशाल कळवता? तुमच्या ह्या फेकुगिरीलाच आम्ही कंटाळलो आहो. ह्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलावणार नाही, ही खबर आधी लागल्यानेच आम्ही कोस्टल रोडच्या कार्यक्रमाला तुमच्या नावावर काट मारली. होय, होय, काट मारली!! निमंत्रण पत्रिका खिशात राहिली अशा थापा मारण्याची आम्हाला गरज नाही.
आम्हाला नान्हा भाई म्हणता? मुंबईत पाय टाकून आम्हाला नान्हा भाई म्हणण्याची हिंमत होतेच कशी? नान्हाभाई कोण आणि मोटाभाई कोण हे आता तुम्हाला लौकरच कळेल. तुमच्या आदरणीय (की माननीय) नमोजींच्या येण्याने (किंवा जाण्याने) काय होते? ज्या माणसाची लौकरच दिल्लीहून ‘जाण्याची’ वेळ आली आहे, त्यांच्याबद्दल काय बोलावे? मुंबईत आम्हीच मोटाभाई होतो, आहो आणि राहू!! निमंत्रण पत्रिका खिशात राहून गेल्याच्या थापा दुसऱ्या कोणाला तरी मारा. आम्ही सत्याला जागणारे आहो. कळावे. (खरे तर न कळावे!).
उधोजी.

Web Title: editorial dhing tang british nandi article