कांदे मारा! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

‘‘ह्या  देशात निवेदनं देऊन कुठलेही प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत...काय?,’’ समोरील विस्तृत शुभ्र कागदावर ब्रशचा फटकारा मारत साहेब म्हणाले. आम्ही अदबीने मान डोलावली. डोलावणे भाग होते. अन्यथा ती मुरगळली असती!
‘‘असली अहिंसक आंदोलनं काय कामाची?’’ साहेब स्वत:शीच बोलल्यागत म्हणाले. आम्ही तरीही मान डोलावली. साहेब स्वत:शी जरी बोलले तरी ते आमच्यासाठीच असते, हे आम्हाला आता चांगले ठाऊक झाले आहे.
‘‘आमची आंदोलनं आठवतात ना?’’ त्यांनी जरा दूर जाऊन कागदावर नेम धरून एक ब्रशचा फराटा ओढला. आठवतात ना? हा काय प्रश्‍न झाला? रस्त्यारस्त्यात, तिठ्या-तिठ्यावर जळणारी टायरे कोण विसरेल? खळ्ळकन काचा फुटल्यानंतर निर्माण होणारे संगीत कोण विसरेल? उचलून रस्त्याच्या कडेला फेकलेली टोलनाक्‍याची खोकी कोण विसरेल? जिवाच्या आकांताने पळत सुटलेल्या परप्रांतीय परक्‍यांच्या आरोळ्यांमुळे उडालेली धम्माल कोण विसरेल?
...पण गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!
प्रखर आंदोलनांनी महाराष्ट्र पेटून उठला होता. नवनिर्माणासाठी सज्ज होत होता. ह्या ज्वलज्जहाल आंदोलनाच्या ठिणगीतूनच समृद्धीची ज्योत फुलणार होती. त्यासाठी आम्ही खुद्द किमान तीन वेळा गनिमाच्या हल्ल्यातून बचावलो होतो. गोखले रोडच्या पेट्रोल पंपाशी एका परप्रांतीय भय्याची रिक्षा थांबवून त्याचा मऱ्हाटी पाहुणचार करणे अंमळ अवघड गेले होते. गनिम शंभर किलो वजनी गटातला निघाला!! तीन महिने अंग ठणकत होते. रेल्वे परीक्षांमधल्या पक्षपाताविरोधात रणशिंग फुंकताना पाठीमागून आलेल्या हवालदाराकडे चटकन लक्ष गेले नव्हते. चुरमुऱ्याचे पोते बैलगाडीत टाकावे, इतक्‍या सहजतेने त्याने आमची गठडी पोलिसगाडीत फेकली होती. तेव्हाही तीनेक महिने आम्ही मसाज घेण्यासाठी नियमाने जात असू. पुढे...जाऊ दे. कशाला काढाव्यात त्या दुखऱ्या आठवणी?
‘‘शेतकऱ्यांची अवस्था आम्हाला पाहावत नाही...काय?’’ साहेबांनी ब्रशच्या फटकाऱ्यानिशी एक व्यंग्यचित्र जिवंत केले. ते पाहावे? की साहेबांच्या संवादांकडे लक्ष पुरवावे? हे कळेना. आम्ही भांबावलो.
‘‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात किती पाणी आले? आम्ही पुसून पुसून किती पुसणार?’’ ब्रश पाण्यात बुडवून कापडाला पुसत साहेब म्हणाले. त्यांचेही खरेच होते. कांद्याने शेतकऱ्यांना जाम रडवले. भावच नाही! केलेली मेहनत वाया गेली...
‘‘परवा काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाव नाही, म्हणून कांदा रस्त्यात फेकला...अरेरे!!’’ साहेबांनी पुन्हा चित्राकडे लक्ष वळवले. आम्ही अदबीने मान डोलावली. फेकून दिलेल्या कांद्यात निम्म्या मुंबईने कांदाभजी खाल्ली असती, हा खमंग विचार मनात डोकावला. पण तो आम्ही बोलून मात्र दाखवला नाही.
‘‘कांद्याचं काय करू? असं ते शेतकरी आम्हाला विचारत होते! काय सांगणार आम्ही?..’’ साहेब म्हणाले. त्यांनी कांदा उत्पादकांना नेमके काय सांगावे, ह्याचा विचार आम्ही करत राहिलो. तसे आम्ही स्वभावत: भाबडेच म्हणायचे! असो!!
‘‘आम्ही त्यांना काय सांगायचे ते सांगितले म्हणा..,’’ साहेब म्हणाले. आम्ही तत्काळ विचार थांबवला. आता काय उपेग होता?
‘‘त्यांना म्हणालो, ‘ते कांदे रस्त्यात नका फेकू! मंत्री आले की त्यांना फेकून मारा...बेशुद्ध पडले की तोच कांदा फोडून त्यांना हुंगवा!!’ काय...कसा आहे आमचा तोडगा?’’ साहेबांनी स्वत:वर खूश होऊन पृच्छा केली.
‘‘व्वा!! अगदीच लोकशाही आंदोलन, साहेब!’’ आम्ही म्हणालो. त्यावर साहेबांनी ‘निघा’ अशी खूण केली. मंत्र्यांना कांदे फेकून मारण्याचे हे अजब आंदोलन आमच्या आजवरच्या आंदोलनांपेक्षा निश्‍चितच अभिनव असे होते. मनातल्या मनात दाद देत आम्ही तेथून निघालो...
शिवाजी पार्काच्या रस्त्यावर हुंगण्यासाठी कांदा मागत फिरताना एखादा इसम तुम्ही पाहिलात काय? ते आम्हीच बरं, आम्हीच!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com