कांदा आणि क्रेडिट! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक.
वेळ : रडवण्याचा. काळ : रडण्याचा.
प्रसंग : गंभीर.
पात्रे : मा. आ. उधोजीसाहेब आणि होनहार सुपुत्र प्रिन्स विक्रमादित्य.
.............................
विक्रमादित्य : (खोलीचे दार ढकलत) बॅब्स...मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (अंथरुण ठाकठीक करत) नको! गुड नाइट!
विक्रमादित्य : (खोलीत येत) माझं फक्‍त दोन मिनिटांचं काम आहे!
उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत) उद्या बोलू! मला झोपायचंय!
विक्रमादित्य : कांद्याच्या वांध्याबद्दल बोलायचं आहे! इंपॉर्टंट आहे!!
उधोजीसाहेब : (दुप्पट गंभीरपणाने) कांद्याच्या प्रश्‍नावर जे काही इंपॉर्टंट होतं, ते मी काल बोललोय! गेल्या वर्षीचं शंभर रुपये अनुदान ढापणाऱ्या सरकारनं यंदा २०० रुपये अनुदानाची थाप मारली आहे!! ह्या नाकर्त्या सरकारला बेशुद्ध पाडून नाही त्यांना कांदा हुंगायला लावला तर हा उधोजी नाव लावणार नाही!! कळलं? जा आता!!
विक्रमादित्य : (खचून जात) बॅब्स, असं तुम्ही का बोललाऽऽत?
उधोजीसाहेब : (त्वेषाने) का बोललो म्हंजे? सोडतो की काय!! थापा मारतात लेकाचे, थापा! इथे माझा शेतकरी बांधव होरपळतोय आणि ह्यांना मजा सुचतेय! केंद्रापासून राज्यापर्यंत सगळीकडे मज्जाच मज्जा चालू आहे, आणि इथं माझा बळिराजाला सजा भोगावी लागतेय!!
विक्रमादित्य : (अजीजीने) ते ठीक आहे, पण बॅब्स-
उधोजीसाहेब : (पांघरुण फेकत) माझ्या शेतकऱ्यांना कांदा रस्त्यात फेकून देण्याची वेळ आली!! कोणामुळे? ते काही नाही, जोवर कांद्याला अनुदान मिळत नाही, तोवर मी कांदेपोहे खाणार नाही!
विक्रमादित्य : (आश्‍चर्याने ओरडत) क्‍काय? नो कांदेपोहे फ्रॉम टुमारो?
उधोजीसाहेब : (निश्‍चयाचा महामेरू...) नोप!
विक्रमादित्य : (एक पाऊल पुढे...) ठीक आहे, मग मीसुद्धा कांदेपोहे खाणार नाही! इतकंच काय कांदा घालून आमलेटसुद्धा खाणार नाही!
उधोजीसाहेब : (अभिमानाने) शाब्बास!!
विक्रमादित्य : हाफ फ्राय खाईन!! कांदा भजीसुद्धा नाही खाणार!!
उधोजीसाहेब : (सूर खाली आणत) इतकं करायला नको काही! नुसते कांदेपोहे सोडले तरी चालतील! शेवटी कुठून तरी आपला निषेध व्यक्‍त करायचा, झालं! तेवढ्यासाठी कांदा वर्ज्य केला तर शेतकऱ्यांचे कांदे विकत घेणार कोण? कुणी विकत घेतले नाहीत तर भाव पडणार पुन्हा! इकॉनॉमिक्‍स आहे ते!!
विक्रमादित्य : (विषयाची गाडी रुळावर आणत) बॅब्स, मला वाटतं तुमचा  कांदा प्रॉब्लेमबद्धलचा डिसिजन चुकतोय! दोनशे रुपयांचं अनुदान मिळालं तरीही नाही खाणार तुम्ही कांदा?
उधोजीसाहेब : (उडवून लावत) अरे, त्या ह्या ‘कमळ’वाल्या सरकारच्या थापा सगळ्या! कोण द्यायला बसलंय इथं अनुदान?
विक्रमादित्य : (थंडपणे) आपल्याच दिवाकर रावतेकाकांनी पुढाकार घेऊन हे अनुदान मिळवून दिलंय! आपल्याच पक्षानं अनुदान मिळवून दिलं तर विरोध कसा करायचा?
उधोजीसाहेब : (बुचकळ्यात पडत) असं कसं?
विक्रमादित्य : (आणखी थंडपणे) मंत्रिमंडळाच्या बैठकीत रावतेकाकांनी हे अनुदान द्यायचा आग्रह धरला, अशी बातमी आलीये छापून (वर्तमानपत्र फेकत) हे बघा, वाचा!!
उधोजीसाहेब : (गोंधळून जात) अरेच्चा!
विक्रमादित्य : (आणखी एक पिन मारत) शिवाय आपल्या शिवाजी पार्कवाल्या काकांनीही मंत्र्यांना कांदे मारा अशी सूचना केलीये!!
उधोजीसाहेब : (डोकं खाजवत) भलताच घोळ झाला की!
विक्रमादित्य : (चतुराईने) रावतेकाकांचा फोन आला होता- माझं काही चुकलं का म्हणून विचारायला!! शिवाय बाकीचे मावळेही फोन करताहेत- आपण पण कांदे मारू या का मंत्र्यांना म्हणून!! अब क्‍या करें?
उधोजीसाहेब : (चिक्‍कार विचार करून थकल्यावर) जरा नुसताच एक कांदा फोडून आणतोस का रे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com