फेटा आणि हेल्मेटा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

नवे वर्ष पुणेकरांसाठी अनंत अडचणींचे वर्ष ठरणार, असे संकेत आम्ही आधीच दिले होते. त्याची पहिली चुणूक सक्‍तीच्या हेल्मेटसक्‍तीने मिळाली आहे. हेल्मेटसक्‍तीवर गेले वर्षभर (पुण्यात) बरीच डोकेफोड (पक्षी : चर्चा) झाली असली, तरी काही लोकांच्या डोक्‍यात अजूनही संभ्रम आहे, असे दिसते. हा संभ्रम अधिक वाढावा, म्हणूनच आम्ही सदर लेखनप्रपंच करीत आहो!!

नवे वर्ष पुणेकरांसाठी अनंत अडचणींचे वर्ष ठरणार, असे संकेत आम्ही आधीच दिले होते. त्याची पहिली चुणूक सक्‍तीच्या हेल्मेटसक्‍तीने मिळाली आहे. हेल्मेटसक्‍तीवर गेले वर्षभर (पुण्यात) बरीच डोकेफोड (पक्षी : चर्चा) झाली असली, तरी काही लोकांच्या डोक्‍यात अजूनही संभ्रम आहे, असे दिसते. हा संभ्रम अधिक वाढावा, म्हणूनच आम्ही सदर लेखनप्रपंच करीत आहो!!

हेल्मेटसक्‍ती ही प्राय: दोन प्रकारची असते. एक, भक्‍तीची हेल्मेटसक्‍ती आणि दुसरी सक्‍तीची हेल्मेटसक्‍ती. पुणेकरांच्या वाट्याला दुसऱ्या प्रकारची हेल्मेटसक्‍ती आली आहे. पुण्याचे तत्त्वचि वेगळे आहे. तेथील निम्म्याहून अधिक जनतेस हेल्मेट ह्या आयुधाच्या उच्चारानेच मस्तकात तिडीक जाते. वास्तविक टणक मस्तकाच्या प्राणिमात्रांना हेल्मेटची गरज नसते. मराठी भूमीत लहानपणापासून ‘ठो दे, ठो दे’ असे कपाळ एकमेकांवर हापटण्याचा खेळ शिकवला जातो, हे बऱ्याच लोकांना स्मरत असेल. भविष्यात हेल्मेटची गरज पडू नये, म्हणूनच हे प्रशिक्षण दिले जात असे, हे विसरून कसे चालेल? असो.

सांप्रतकाळी पुणेकरांमध्येही दोन प्रवर्ग निर्माण झाले असून, हेल्मेटसमर्थक आणि हेल्मेटविरोधक अशी दुफळी तयार झाल्याचे निरीक्षण आम्ही अप्पा बळवंत चौकात उभे राहून केले आहे. ह्यापैकी हेल्मेटसमर्थक पुणेकर ही नवी प्रजात असून त्यांस खऱ्या अर्थाने पुणेकर म्हणताच येणार नाही!! कारण खरा पुणेकर कश्‍शाचेच समर्थन करू शकत नाही! एका पुणेकर उमेदवाराने निवडणुकीत स्वत:च्याच विरोधात प्रचारसभा घेतल्याचीही पुण्याच्या इतिहासात नोंद आहे. आता बोला! हेल्मेट घातल्यावर ज्याच्या डोकीस घाम येत नाही, ज्याला घुसमटल्यासारखे वाटत नाही, ज्याची दृष्टी मर्यादित होत नाही, तो पुणेकर कसला? खऱ्या पुणेकरास हे सारे होते!! ह्या बोटचेप्या हेल्मेटभक्‍तांनी हेल्मेटच्या दुकानांमध्ये रांगा लावून ते भिकार शिरस्त्राण विकत घेण्याचा सपाटा लावला आहे, तोदेखील निषेधार्ह असाच आहे. पुन्हा असो!!

उलटपक्षी, हेल्मेट हेच अपघातास कारणीभूत ठरणारे आत्मघातकी शिरस्त्राण असल्याचा हेल्मेटविरोधकांचा दावा चिंत्य आहे. हेल्मेटच्या दोन्ही बाजूंस काहीही दिसत नसल्याने उजव्या किंवा डाव्या बोळातून भस्सकन बाहेर येणारा दुसरा पुणेकर न दिसल्यानेच खरा अपघात होऊ शकतो, ह्या युक्‍तिवादाकडे डोळेझाक करणे अनुचित ठरावे. खेरीज पुण्याच्या कुठल्या बोळात ताशी दहा कि. मी. पेक्षा अधिक वेगाने गाडी (पक्षी : स्कूटी, स्कूटर, मोपेड, बाइक इत्यादी.) चालवता येत्ये? दुचाकीस्वाराने (पुण्याच्या) रस्त्यातून जाताना स्वत:चे मस्तक शाबूत ठेवावे (आणि आगामी निवडणुकीत ‘कमळा’ला मत द्यावे!) ह्या हेतूने केंद्रीय सडकमंत्री नितीनभाऊ गडकरी ह्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. पुणेकराचे ‘डोके’ सांभाळण्यासाठी नागपूरकराने ‘पाऊल’ उचलण्याची ही पहिली आणि शेवटची खेप असावी! हेल्मेटऐवजी पुणेरी पगडी आणि फेटे घालून हिंडू पाहणाऱ्या दुचाकीस्वारांकडून वाहतूक पोलिसांनी तब्बल ३७ लाख रुपये दंड वसूल केल्याच्या बातम्या मात्र अतिरंजित वाटतात. सदोतीस लाख रुपये? येवढ्या पैशात ‘रुपाली’वर (पत्ता : फर्गसन रोडच्या किनाऱ्यावर) कैक लिटर चहा होईल!!

पुणेकरांनी गेले वर्षभर खंबीरपणे खिंड लढवत हेल्मेटसक्‍ती झुगारण्यात यश मिळवले, पण औंदा मात्र गनिमाने डाव साधल्याचे चित्र दिसत आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो. पुण्याच्या परिसरावर सध्या होणाऱ्या अतिक्रमणाच्या व्यापक कटकारस्थानाचाच हा भाग असल्याची आमची खात्री पटली असून ह्या हुकूमशाही विरोधात उन्नत मस्तकानिशी उभे राहण्याचा संकल्प आम्ही पुणेकर सोडतो आहो. आमच्या (पुणेरी) फेट्यास (खुलासा : पगडी अलौड आहे!) जोडलेल्या नव्या पट्ट्या आणि बक्‍कल हा त्याचाच पुरावा आहे. ह्या प्रकारच्या फेट्यास पुणेरी हेल्मेटा असे म्हणतात!! असोच!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article