उठाव! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

पहिल्या सहस्रकाच्या
पहिल्या शतकातील,
पहिल्याच काही दशकांतील
ही एक कलिकथा.

सम्राट नीरोने लादलेल्या
अवजड करभाराने वाकलेल्या,
सक्‍तीच्या शिस्तीनं मोडलेल्या,
प्रेटोरियन दंडुक्‍याने पिचलेल्या
रोमन साम्राज्यात आधी झाली
असह्य कुजबूज, मग झाली
आदळआपट आणि त्यातूनच
पेटला जनतेचा जळजळता हुंकार.
‘‘नीरोनं जायला हवं...जायलाच हवं!’’

नित्यनूतन कलमकारीत मश्‍गूल
सम्राटानं नवं काव्य लिहून
दरबाऱ्यांची मने जिंकून घेतली.
राजमाता अग्रिप्पिनाच्या
स्वत:च घडवून आणलेल्या
हत्त्येनंतरही त्याने लिहिली
मातेच्या महतीची लाजबाब कवने.
स्वत:च त्यांना लावल्या
(भावमधुर वगैरे) चाली, आणि
‘रोमन जनतेनंही काव्यरचनांचा
आनंद लुटलाच पाहिजे,’
असाही काढला एक फतवा.

‘आपलं सुख आपल्या हातात,
नाही कुणाच्या मनातबिनात
गप्पा मारा, गाणी गा
स्वप्न बघा, आणि खूप खा.
घरटी व्हावी कवींची पैदास
रडगाणे आता बास!
क्रीडांगणात दाखवा कसब
नको आता कुठली सबब
आहे त्यात मानाल सुख
तर चतकोराने मिटेल भूक’’

ह्या काव्यमय फतव्याने
रोमनांच्या संतापाला
उरलाच नाही पारावार
सहस्रावधी रोमनांनी अखेर
केलाच उठाव, आणि सारे
प्रजाजन एकवटले एकदाचे
महानगराच्या मध्यवर्ती चौकात.
उठावाने हादरलेल्या मंत्र्यांनी
घेतली धाव सम्राटाकडे,
तेव्हा तो नेहमीप्रमाणे
वाजवतच होता
आपले लाडके फिडल!

महालाच्या सज्जात येऊन
हजारो रोमनांना उद्देशून
म्हणाला सम्राट : ‘‘लोकहो!
शांत व्हा, शांत व्हा!
आपली लाडकी धनदेवता
ॲबण्डान्तियाने आत्ताच मजला
दृष्टांत दिला असून कुठल्याही क्षणी
ती रोमन साम्राज्यावर
सुवर्णमुद्रांचा मुसळधार पाऊस
पाडणार आहे...पहा, पहा,
ढग जमलेदेखील आभाळात.’’

चौकातील प्रजाजनांमध्ये
अचानक पसरली शांतता.
तेवढ्यात खण्णकन एक
टप्पोरे नाणे खणखणले
चौकाच्या फरसबंदीवर
तेव्हा, सम्राट नीरो म्हणाला:
‘‘पहा, म्हटलं नव्हतं?..
झाली सुरवात धनवर्षेला!’’

...तेव्हापासून लोकशाहीतील
निवडणुकांच्या आसपास
घोषणांचा पाऊस पडतो म्हणे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com