आमचा(ही) सर्व्हे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 26 जानेवारी 2019

नि वडणूकपूर्व सर्व्हे ह्या विषयावर गहन भाष्य करण्यासाठी आम्ही आज बसलो आहो! (म्हंजे तसेही बसलेलोच असतो, असे कुणी खवचटपणे म्हणेल, पण आम्ही दुर्लक्ष करून बसू!! असो.) निवडणूकपूर्व सर्व्हे आणि निवडणुकीचे अंदाज हा नव्या सहस्त्रकातील लोकशाहीचा आत्मा आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सर्व्हेशिवाय इलेक्‍शन आम्ही इमॅजिनच करू शकत नाही. किंबहुना आमच्यासारखे अतिअभ्यासू आणि चाणाक्ष (पूर्वीच्या काळी सव्यसाची वगैरे म्हणत तसे) पत्रकार निवडणुकीपेक्षा अशा सर्व्हेलाच जास्त महत्त्व देतात व ते योग्यच मानावे लागेल.

नि वडणूकपूर्व सर्व्हे ह्या विषयावर गहन भाष्य करण्यासाठी आम्ही आज बसलो आहो! (म्हंजे तसेही बसलेलोच असतो, असे कुणी खवचटपणे म्हणेल, पण आम्ही दुर्लक्ष करून बसू!! असो.) निवडणूकपूर्व सर्व्हे आणि निवडणुकीचे अंदाज हा नव्या सहस्त्रकातील लोकशाहीचा आत्मा आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सर्व्हेशिवाय इलेक्‍शन आम्ही इमॅजिनच करू शकत नाही. किंबहुना आमच्यासारखे अतिअभ्यासू आणि चाणाक्ष (पूर्वीच्या काळी सव्यसाची वगैरे म्हणत तसे) पत्रकार निवडणुकीपेक्षा अशा सर्व्हेलाच जास्त महत्त्व देतात व ते योग्यच मानावे लागेल. कारण ॲक्‍चुअल निवडणुकीत जेवढा लाभ होत नाही, त्यापेक्षा बख्खळ लाभ सर्व्हेमधून होतो, असा काहींचा अनुभव आहे. ह्या सर्व्हेसाठी हजारो लोक खपत असतात. ते गपचूप मतदारांना प्रश्‍न विचारून माहिती काढून घेतात व त्या माहितीच्या आधारे आपले निष्कर्ष टीव्हीवर (कमर्शियल ब्रेकसह) जाहीर करतात. हे सर्व्हेवाले बेमालुम वेषांतर करून लोकांमध्ये हिंडतात. न जाणो, ते तुम्हालाही भेटलेले असू शकतील. पण तुमच्या लक्षात आले नसेल. आम्हालाही आजवर एकही सर्व्हेवाला भेटलेला नाही. तरीही त्यांचे अंदाज मात्र अचूक निघतात हे मात्र खरे आहे. सर्व्हेवाल्यांचा अंदाज चुकला तर त्याचा अर्थ एवढाच की मतदारांनी त्यांचा सर्व्हे नीट पाहिलेला नसतो! कळले? आता हा मुद्दा इथेच सोडून थोडे पुढे जाऊ.
निवडणुकीच्या आनंदाचे एक शास्त्र आहे. त्या शास्त्रास इंग्रजी भाषेत सेफॉलजी असे म्हटले जाते. आम्हीही एक नाणावलेले सेफॉलजिस्ट आहो, हे अनेकांना माहीत असेलच! कायम सेफ खेळत असल्यामुळे आम्हाला सेफॉलजीत प्रावीण्य मिळवता आले, हे येथे (नम्रपणे) नमूद करणे भाग आहे. पुन्हा असो.

सांप्रतकाळी देशभरात निवडणुकांचे वारे वाहूं लागले असून कुठल्याही क्षणी बिगुल वाजेल अशी स्थिती असल्या कारणाने विविध च्यानले आणि सर्व्हेकंपन्यांनी सर्व्हे केले. गेले दोन दिवस त्याचे कवित्त्व टीव्हीवर यथास्थित सुरू आहे व इन्शाला पुढेही राहील. ‘जानिए मतदाताओं का मूड,’ ‘अब की बार किस की सरकार’ आदी मथळ्यांसह सर्व्हेतून काही धक्‍कादायक बाबी कळून आल्या. सद्यस्थितीत निवडणुका झाल्यास ‘केंद्रस्थित नमोजी सरकार जिंकणार नाही, आणि दिल्लीस्थित राहुलजी सरकार हारणार नाही’ असे स्पष्ट भाकित ह्या सर्व्हेमधून व्यक्‍त करण्यात आले. हा निष्कर्ष बघून अनेकदांना धक्‍का बसला असेल. ‘अबकी बार त्रिशंकू सरकार’ असा मथळा वाचून आम्हीही किंचित संभ्रमात पडलो. हा त्रिशंकू कोण? हे शोधण्यात आमचे पुढले काही तास गेले. पण तेही एक असो.
सदरील सर्व्हेंमधून आम्ही काही कॉमन निष्कर्ष काढले. ते असे :
१. नमोजी हारणार नाहीत.
२. राहुलजी जिंकणार नाहीत.
३. गठबंधनवाले मते मिळवतील, पण जिंकणार नाहीत.
...थोडक्‍यात सारे काही आहे तसेच आहे. मग सर्व्हेचा नेमका फायदा काय झाला? असा प्रश्‍न साहजिकच उपस्थित होणे स्वाभाविक होते. तर सारे काही येत्या निवडणुकीनंतर मतमोजणीतच ठरेल, हे सर्व्हेमुळेच कळले, हा सर्वात मोठा फायदा. ह्या निष्कर्षानंतर आम्ही सुटकेचा निश्‍वास सोडला.
गोष्ट : एकदा आम्ही एका पोपटवाल्याकडे गेलो. त्यास भविष्य विचारले असता त्याने काहीही न बोलता पिंजऱ्याचे दार उघडून पोपटांस बाहेर आणले. पोपटाने आमच्या हातात दोन कार्डे ठेवली. एकावर लिहिले होते : ‘लुगाई मायके जायेगी... मजे करो!’ आमच्या पोटात आनंद मावेना!! तेवढ्यात दुसरे कार्ड पाहिले. त्यावर लिहिले होते : ‘पारिवारिक संघर्ष का काल आगे है... सावधान.’
तात्पर्य : ते गोष्टीआधी भाराभर लिहिले आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article