फोन! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

महाराष्ट्राचे (एकमेव) तारणहार श्रीरामभक्‍तसाहेब अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. अधूनमधून फोनच्या डबड्याकडे चमकून पाहत आहेत. खिशातला मोबाइल फोन काढून न्याहाळताहेत. अखिल महाराष्ट्र आज कुणाच्या बरे फोनची वाट पाहत आहे? दूरवर बेल वाजत राहते...
‘‘कोण आहे रे तिकडे? फोन उचला!,’’ साहेब ओरडले. तरीही फोन वाजतच राहिला. बराच वेळ वाजून फोन बंद पडला. साहेब अस्वस्थ झाले. तेवढ्यात फोन वाजला. उतावीळपणाने त्यांनी फोन उचलला; पण पलीकडून कुणीतरी ‘ठाकरे’ चित्रपटाची दोन तिकिटे मिळतील का? असे विचारत होते. ‘संपली, संपली’ असे त्रोटक उत्तर देऊन त्यांनी फोन आपटला.

तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. त्यांनी घाईघाईत उचलला. ‘तुमच्या गाडीच्या सर्व्हिसिंगची वेळ झाली आहे. ग्यारेजला कधी पाठवता?’ अशी विचारणा करणारी कन्या (शक्‍य तितक्‍या) मधाळ आवाजात बोलत होती. साहेबांनी दातओठ खाल्ले; पण सौजन्य म्हणून ‘गाडीला काहीही झालेलं नाही, आमची गाडी व्यवस्थित आहे’ असे संयमिपणाने सांगून फोन ठेवला. पाठोपाठ आणखी एक फोन वाजला.
‘‘तुम्हाला लोनची गरज आहे का?’’, पलीकडून विचारणा झाली. अवघे जग ‘जरा कर्ज काढता का?’ असे सदोदित का विचारत असते? असा प्रश्‍न साहेबांना पडला. त्यांनी हताशेने सुस्कारा टाकला. त्या सुस्काऱ्यातच पलीकडल्या व्यक्‍तीने संधी साधून कमी व्याजदरात वैयक्‍तिक कर्ज मिळण्यात तुमचा कसा फायदा आहे, ते सांगून टाकले.
‘‘पण मला कर्ज नको आहे. मी कुणाच्या एका पैचा ओशाळा नाही...’’ असे ठणकावून सांगत साहेबांनी फोन आदळला. कर्जाची आर्जवे करणारे फोन टाळण्याचा उपाय कर्ज काढणे हा असतो, हे साहेबांना माहीत नव्हते. एकदा कर्ज काढून ते बुडवले की फोन बंद होतात, हा अनुभव अनेकांनी गाठीला बांधला होता, परंतु साहेबांसारख्या स्वाभिमानी बाण्याच्या व्यक्‍तीस ते कसे पटावे? असो.
आपला मोबाईल इतका थंड का? त्यावर कुणी फोन का करीत नाही? साहेबांना नवल वाटले. एरव्ही ह्या घरातले फोन कसे सदोदित खणखणत असतात आणि आपण ते घेत नसतो. आज वाजणारा प्रत्येक फोन उचलूनही काही उपयोग झाला नाही. साहेब काळजीत पडले.
‘‘कुणाचा फोनबिन काही?’’ साहेबांनी शेवटी न राहवून आपल्या स्वीय सहायकाला विचारले.
‘‘चक...’’ स्वीय सहायकाने तपशीलात उत्तर दिले.
‘‘चक काय चक...’’ साहेब खवळले.
‘‘नाय ना... एक पण फोन नाय... नाही म्हणायला कोल्हापूरकरांचा सात वेळा फोन येऊन गेला...’’ स्वी.स.ने माहिती दिली.
‘‘काय म्हणत होते?’’ साहेबांनी घुश्‍शातच विचारले.
‘‘काही नाही... झाला का निर्णय?’’ असं विचारत होते. मी म्हटलं आपल्याला काय म्हाईत. डिसिजन झाला असेल तर साहेब आम्हाला कशाला सांगायला बसलेत?,’’ स्वी. स. हुशार होता. त्याचे मनातल्या मनात कौतुक वाटून साहेबांनी उघडपणे त्याची पाठ थोपटली. म्हणाले, ‘‘शाब्बास...आहेस खरा! असले फोन एण्टरटेन करायचे नाहीत. कळलं?’’
‘‘मी कशाला करू एंटरटेन्मेंट? गेले काही दिवस असे चिक्‍कार फोन परस्पर फुटवलेत मी!,’’ स्वी. स.ने फुशारकी मारली. साहेब खूश झाले. तरीही ते अधूनमधून फोन काढून बघत होतेच.
‘‘...मघाशी कुणीतरी शहा म्हणून फोन आल्ता! म्हणे, ‘भाई, डिसिजन थया के? जरा पूछी लै तो...’ मी म्हणालो, ‘‘गप फोन ठेवा! असल्या फालतू चवकशा नाय पायजेत!,’’ स्वी. स. उत्साहात सांगत होता.
...ते ऐकून साहेब मटकन खाली बसले. खोल आवाजात इतकेच म्हणाले : ‘‘लेका, मला द्यायचा होता ना फोन!’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article