एका बेरोजगाराचे बजेट! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

सकाळी उठलो. घड्याळ बघितले. पुन्हा झोपलो. मनात म्हटले इतक्‍या लौकर उठून काय करणार? माणूस जितके तास जागा राहातो, तितकी त्याची जेवणे जास्त होतात. त्यापेक्षा झोपलेले बरे....घुर्रर्र...पुन्हा उठलो. घड्याळात बघितले. जेवणाची वेळ झाली होती. उठलो. आता चहा प्यावा की डायरेक्‍ट जेवूनच घ्यावे? हा प्रश्‍न पडला. आधी चहा आणि नंतर जेवण की आधी जेवण आणि नंतर चहा? हा उपप्रश्‍न होता. दोन्ही प्रश्‍न एकाच वेळी सोडवणे भाग होते. जेवणाचे ताट समोर ठेवून शेजारी चहाचा कोपही ठेवावा, असा कौल मन देत होते. पण तशी सूचना सैपाकघराकडे केली तर चपला न घालता घराबाहेर घाईघाईने पडावे लागेल, हे सावध मनाने ओळखले. बेरोजगाराला मन सदैव सावध ठेवावे लागते. समोरून येणारी व्यक्‍ती खिश्‍यात शंभर-पन्नासाची नोट बाळगून आहे, हे चेहऱ्यावरून ओळखावे लागते. त्याला बेसावध गाठता आले तर थोडीफार उधारी मिळून जाते. "अंगी असावे सावधपण, हे तो बेरोजगाराचे लक्षण' असे कुणीतरी (म्हंजे आम्ही) म्हटलेच आहे. बेरोजगाराचेही एक बजेट असते. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग वगैरेंचा विचार केला जातो. आम्हा बेरोजगारांना कोण विचारतो?
आम्ही बजेटचा विचार करू लागलो. चेहरा चिंतामग्न आणि बुद्धिमान केला. आवाजाला एक धार आणली. आसपासचे माणूस बघून बजेटबद्दल बोलावे, हे इष्ट असते. उदाहरणार्थ, "तद्दन भंपक आणि संधिसाधू बजेट आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडला की झालं!'' असे ती. नानासाहेब (डावीकडील बिऱ्हाड) डरकाळले की पुढील पाचेक मिनिटे "अबकी बार...पुढले दार' वगैरे वाक्‍ये योजावीत. "विकासयात्रेचे पुढले पाऊल' असे वर्णन ती. अण्णासाहेब (उजवीकडील बिऱ्हाड) करू लागले की "एक कदम रख्खूं तो हजार राहे खुल गई' अशी कवितेची ओळ योजून पुढली पाचेक मिनिटे खेचावीत. जमेल त्याचे यच्चयावत समर्थन झाले की ती. अण्णा वा ती. नाना यांजकडून गुळमुळीत आवाजात पन्नासाची उधारी मागून पुढील दिवसाला भिडावे!! ह्याला म्हंटात बजेट!! असो.
""मला भूक नाही...'' सैपाकघराच्या दिशेने तोंड करून आम्ही (रिकाम्या पोटावर हात फिरवत) मोठ्यांदा म्हटले. अशा वाक्‍यानंतर साधारणत: चहाचा कोप समोर आदळला जातो, असा पूर्वानुभव आहे. ""ही काय चहाची वेळ आहे? आता गिळून घ्या!'' अशा आशयाचे (भांड्यांचे) आवाज सैपाकघरातून येतील, असा आमचा कयास होता. पण काहीही आवाज आला नाही. आम्ही नाद सोडला. बेरोजगाराला हरघडी कांप्रमाइज करावे लागते. सिच्युएशनप्रमाणे वर्तन ठेवावे लागते. गेली कित्येक वर्षे आम्हाला अशा बेरोजगारीचा पूर्वानुभव आहे. किंबहुना, आम्ही जन्मलो तेच बेरोजगार म्हणून! पण आज आक्रित घडले!!
हातात चहाचा गर्मागरम कोप आला. त्यास अद्रकाचा स्वादगंध होता. बशीत ओतून आम्ही घोट घेणार, तेवढ्यात कानावर उद्‌गार पडले : ""आता जेवूनच घ्या हं!'' डोळ्यांत पाणीच आले!! हे काय ऐकतो आहे? बेरोजगाराला इतका मान?
""आता तुम्ही वणवण करू नका फार! दरमहा घरबसल्या बेरोजगार भत्ता सुरू झाला की होईल हो सगळं नीट...जगात देव आहे म्हटलं!'' आमटीच्या सुगंधासारखे ते भावोत्कट उद्‌गार ऐकल्यावर आमच्या तात्काळ ध्यानी आले. -औंदाचे बजेट जाहीर झाले आहे!!
"असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' ही म्हण किती खरी आहे? फक्‍त इलेक्‍शनचे वर्ष हवे!! सारे काही मिळते!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com