ॲनिमल प्लॅनेट! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

(एक बोधकथा)

पू र्वीच्या काळी जंगलात प्राणी राहत असत, तेव्हाची गोष्ट. हल्ली जंगलात नक्षलवादी, तेंदूपत्ता आणि चंदनतस्कर, तडीपार अशा लोकांचा वावर असतो असे म्हणतात. तेव्हा प्राणी असत. जे काही असेल ते असो. गोष्ट फार जुनी नाही, पण बोध घेण्याजोगी आहे. एका निबीड अरण्यात प्राण्यांचे राज्य होते व सारे प्राणीजगत सुखेनैव जगत होते. उदाहरणार्थ, हरणे चरत होती, माकडे फळे खात होती, अस्वले मधाची पोळी लुटत होती आणि वाघ-सिंह वगैरे प्राणी अधूनमधून एखादा प्राणी मारून खात होते. कुणाचीच तक्रार नव्हती.

जंगलाचा राजा शेरखान हा एक कडक प्राणी होता. अत्यंत निःस्पृह, अत्यंत स्वच्छ आणि जंगलाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा असा हा राजा सकाळी लौकर उठून आळोखे पिळोखे देत योगासनेही करीत असे. सगळे जंगल स्वच्छ करण्याची त्याची प्रतिज्ञा होती. आपण प्राणीरयतेचे भयंकर लाडके आहोत, ह्या सुखद जाणिवेने बऱ्याचदा त्याचे पोट भरत असे. त्यामुळे कुण्या हरणा-काळविटाने त्याला ‘आज छॉन दिस्ताय हं!’ असे म्हटले तर तो त्याला मुळीच खात नसे!! जीव वाचवायचा असेल तर शेरखानाचे कौतुक करा, टाळ्याबिळ्या मारा अशी खबर हा हा म्हणता पसरली. प्राण्यांना अभय मिळू लागले. पण इकडे शेरखानाची पंचाईत झाली. आता खायचे तरी कोणाला? ह्याला उपाय काय? तर शेवटी असे ठरले की मतदान घेण्यात यावे!!
त्या जंगलात निवडणूक नावाची गोष्ट आली आणि स्टोरीच बदलली...
एरवीची लोकशाही आणि निवडणुकीच्या वेळची लोकशाही ह्यात फरक असतो. एरवीची लोकशाही थोडीशी कंटाळवाणी असते. निवडणुकीतली लोकशाही जाम भारी असते. भाषणे, प्रचारसभा, उपोषणे, धरणे...धम्माल असते. नेतेमंडळी एकमेकांना अशा काही दणादण लगावतात की विचारता सोय नाही. जंगलही निवडणुकीत रंगून गेले. माकडांच्या टोळ्या वेगवेगळ्या भागात फिरू लागल्या. पण...
निवडणुकीचा हंगाम बघून काही प्राण्यांनी शेरखानाच्या विरोधात आघाडी उघडली. शेरखानाची दादागिरी चालू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. शेरखानही शेवटी सिंहाचा बच्चा होता. त्याने एक ‘तोता’ नावाचा पोपट पाळला होता. त्याने ‘तोता’ला प्राण्यांमध्ये सोडला! शिवाय काही निवडक बिबटे आपल्या बाजूने मैदानात उतरवले.
‘चामडी लोळवीन, फडशा पाडीन, दात घशात घालीन’ अशा डरकाळ्या मारत बिबटे रानोमाळ फिरू लागले. ‘येत्या निवडणुकीत शेरखानालाच मत द्या, नाय तर खेळ खल्लास!’ अशा धमक्‍या देत तोता उडू लागला. बिबट्याचे गावापाड्यात जाणे होते. तिथल्या कुत्र्या-मांजरांनाही त्याने धमक्‍या दिल्या.

‘‘एकटा शेरखान त्या प्रधानसेवकासारखा दमदार आहे, बाकी तुम्ही प्राणी म्हणजे लेकाचे गल्लीबोळातली माणसे आहेत नुसती...कळलं?,’’ बिबट्या डरकाळला. पोपटाने ‘क्रॅक क्रॅक’ असे ओरडत त्याला दुजोरा दिला. मागे एकदा शहरगावात घुसून हा बिबट्या तिथे विहिरीत पडून आला होता. त्यामुळे त्याला शहरी जीवनाचा अनुभव होता. बिबट्याने त्या ग्रामीण प्राण्यांची तुलना माणसांची केलेली कुणालाच आवडली नाही. प्राण्यांना गल्लीबोळातली माणसे म्हणतो? ही काय भाषा झाली? अवघे प्राणीजगत भडकून उठले.
बिबट्याने शेरखानाकडे जाऊन फुशारकी मारली आणि प्रमोशन मागितले. त्यावर घडले उलटेच. शेरखानाने त्याच्या डोक्‍यावर रागावून एक टप्पल मारली.
‘‘कुत्र्या-मांजरांना असंच बोलावं लागतं, साहेब!,’’ डोके चोळत बिबट्या कुरकुरला.
‘‘ते असू दे रे...त्यांचा अपमान झाल्याचं दु:ख नाही. पण मला प्रधानसेवक कशाला म्हणतो यार!,’’ शेरखान दु:खाने म्हणाला. निवडणूक कशी निभणार, ह्या चिंतेने त्याला ग्रासले.
तात्पर्य : प्राण्यांचा आदर करा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com