उत्खनन! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

निरंगी अंधारातील वाटचालीतच
कुठल्यातरी अनवट पावलाशी
तुला विचारला होता
अनंगाचा अन्वयार्थ, तेव्हा
सारी लकब पणाला लावून
तू फक्‍त हसली होतीस आणि
दाखवले होतेस बोट,
अलांछन चंद्रबिंबाकडे
बिनदिक्‍कत.

अनाकार तिमिरघनासारखी
उलगडत, मिटत निघून गेलीस,
अदृश्‍य झालीस वळणावरती
मी मात्र एकटा मोजतो आहे
मागे पडणारे दिव्यांचे खांब.
नोंदवतो आहे कापलेले अंतर
मनातल्या मनात, आणि
करतो आहे हिशेब
अजून किती वेळ लागेल?
किती वेळ लागेल?
वेळ लागेल?
लागेल?

तुझ्या वज्रचुडेमंडित किनखापी
संसारात कुठेतरी दडून असेल
आपल्या प्रवासाची रोजनिशी.
अजूनही असतीलच त्या
खिरणाऱ्या चंद्ररात्रींचे
काही प्राचीन अवशेष.
काही सबूत. काही बयानात.
दांतात चिमटा धरुन
मान वेळावत केस बांधताना
आइन्यातील प्रतिबिंब बघणेही
टाळत असशील एखाद्यावेळी.
किंवा, सहजच टाळत असशील
जगजितसिंगची एखादी
गझल गुणगुणणेदेखील.
सकाळच्या वेळी अर्धतंद्रेत
कढईतील सांजा ढवळताना
सैपाकघराच्या कट्ट्याला
रेलून हसतही असशील
अस्फुटसे, चोरटे.

तू तूच होतीस की नव्हतीसच?
की निव्वळ होतीस फक्‍त
एक मागे पडलेला खांब?
नव्हतेच ते चंद्रबिंब?
नव्हताच तो निरंगी काळोख?
अजूनही कधी कधी
ऐकू येते कालपक्ष्यांच्या पंखांची
अदम्य उघडझाप.
ढवळला जातो भवताल
आणि अंतरातला ताल,
नाचू लागतात फेर धरून
स्मरण-विस्मरणांची भुते.
डोळे घट्ट मिटून घेत
सारा इतिहास नाकारण्याची
धडपड होत जाते केविलवाणी
प्रहरोप्रहर गडदतात आठवणी.
मग
आत्मघाताच्या बेलाग कड्यावर
ओठंगून पाहातो मी उत्सुकतेने
दरीच्या तळाशी मला दिसते
तेच विस्मरणातले चंद्रबिंब.
फिकुटलेल्या अन्वयार्थासकट.
गतिकार आवर्तांनो,
उधळून द्या वाळुचे पर्वत,
ढवळा हा कोरडाठाक महासागर,
चक्रवाताच्या
 गरगरत्या पात्यांनो,
कापून काढा सारेच अस्तित्व
अंतरातल्या गाभ्यासकट.

रुद्ध हातांनी हे उत्खनन
सुरु करण्यापूर्वी हे प्रिये,
हे एक लालगडद फूल
वाहतो आहे,
तुझ्या लकबींना
तुझ्या स्मृतींना
तुझ्या असण्याला
आणि तुझ्या नसण्यालाही.

आणखी एक-
पायपीटीच्या रस्त्यावर
पुढल्या वळणावर तू
उभी असशील ह्याची
मला प्रत्येक पावलागणिक
अपेक्षा असते...अजूनही.
म्हणून आणखी एक
लालगडद फूल
छातीशी धरून
मी वाटचाल
सुरू ठेवली आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com