आम्ही काय कुणाचे खातो रे..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

आजचा दिवस : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघी पौर्णिमा. शिवजयंती
आजचा वार : सुवर्णवार.
आजचा सुविचार : आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम अम्हाला देतो रे..!
...................

आजचा दिवस : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघी पौर्णिमा. शिवजयंती
आजचा वार : सुवर्णवार.
आजचा सुविचार : आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम अम्हाला देतो रे..!
...................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. सकाळी उठलो तोच मुळी हसत हसत!! आरशासमोर उभे राहून खूप दिवसांनी झक्‍कास हसलो. समोरची व्यक्‍तीही झक्‍क हसली. अंगठा आणि तर्जनी जोडून ‘टॉप’ अशी खूण केली. समोरच्या व्यक्‍तीनेही डिट्टो तस्सेच केले. मी हसलो, ती व्यक्‍तीही हसली. मी गुड मॉर्निंग म्हटले. त्याने गुडमॉर्निंग म्हटले नाही, पण ओठांची भेदक हालचाल केली. आरशातून आवाज कसा येणार? पण सावधगिरीचा उपाय म्हणून तिथून हटलो आणि चहाची ऑर्डर दिली...
कालच्या दिवसभरातल्या सुखद आठवणी मनातून हटायला तयार नाहीत. कालचा दिवस खूपच धकाधकीचा गेला. (पण) अखेर आमचे जमले!!  सारे श्रम सार्थकी लागले. आमचे परममित्र श्रीमान उधोजीसाहेबांशी हातमिळवणी झाली नाही, तर बंगालमध्ये प्रचाराला पाठवले जाईल, असा इशारा दिल्लीहून देण्यात आला होता. म्हटले, बंगालपेक्षा युती पर्वडली!! पण आमचा जुना मित्र दोस्तीला जागला. जो मनुष्य आमचे फोन घेत नव्हता, तो चक्‍क ओळखीचे हसला!! इतकेच नव्हे, तर घरी बोलावून त्याने चहा आणि बटाटेवडे समोर ठेवलेन! आणखी काय हवे असते?
‘मातोश्री’वर फायनल बोलणी करायला श्री. मोटाभाईंना घेऊन गेलो. बैठकीला सुरवात झाली. तेवढ्यात सोफ्याच्या मागल्या बाजूला कोणीतरी दडलेले माझ्या चाणाक्ष नजरेने टिपले. चटकन बघितले तर ते संजयाजी राऊत होते. त्यांना भिवया उडवून ‘आता काय?’ असे विचारले. ते ओशाळल्यागत हसले. म्हणाले, ‘‘माझं पेन हरवलं आहे, सोफ्याखाली शोधत होतो!’‘ मी म्हटले, ‘‘जाऊ दे! नका शोधू आता... काही गरज लागणार नाही!!’’ त्यांचा चेहरा साफ पडला होता.
‘‘जाऊ दे हो, कशाला एवढं मनाला लावून घेता!’’ मी म्हणालो.
‘‘तसं नाही हो... उद्या लिहायचं कशावर असा प्रश्‍न पडलाय!’’ त्यांनी त्यांची अडचण सांगितली. त्यांना मी ‘पीक विमा योजनेचे महत्त्व’ हा विषय सुचवला.
काहीही असो, आमचे (एकदाचे) जमले, हेच सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. श्रीमान मोटाभाई आणि मा. उधोजीसाहेबांनी यापुढे परस्परांमधली कटुता टाळून नवा प्रारंभ करण्याचा संकल्प केला.
‘‘हे पाहा, आपण पंचवीस वर्षं जिव्हाळ्याची पाहिली, पाचेक वर्ष संघर्षाचीही पाहिली. पण आता पुन्हा तसले कटू अनुभव नकोत!’’ उधोजीसाहेब पोक्‍तपणाने म्हणाले.
‘‘म्हंजे?’’ मी.
‘‘म्हंजे तुमचे शेलारमामा आणि गिरीशभाऊ नकोत!’’ ते उसळून म्हणाले. मी त्या वेळी फक्‍त संजयाजींकडे अर्थपूर्ण नजर टाकली. ह्या माणसाने गेली दोन वर्षे आम्हाला फार छळलेन!! ते काहीही न बोलता गपचूप सटकले. शेवटी झाले गेले गंगेला मिळाले, असे म्हणून आम्ही सर्वांनी ‘श्रीरामचंद्र की जय’ असा पुकारा करत चहाचे कप उचलले. मा. उधोजीसाहेबांनी स्वबळावर केलेली ती एकमेव कृती होती, असा विचार मनाला चाटून गेला. बैठक आटोपल्यानंतर मोटाभाईंनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि किंचित हसले.
‘‘आपने बडे धैर्यसे यह गुत्थी सुलझाई’’ हे उद्‌गार त्यांनी काढले आणि माझा कंठ दाटूनच आला. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ हा अभंग ओठांवर आला. आता विरोधकांनी कितीही टीका केली तरी बेहतर... तसेही आम्ही काय कुणाचे खातो?

Web Title: editorial dhing tang british nandi article