esakal | साडी घ्या, साडी! (ढिंग टांग)
sakal

बोलून बातमी शोधा

dhing tang

साडी घ्या, साडी! (ढिंग टांग)

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

ताई, तुम्हाला कुठली हवी?
मोदी साडी की प्रियंका साडी?
मार्केटमध्ये नवीन आहे ताई,
पुन्हा येणार नाय अशी घडी!

साडी दाखवू? बरं बरं!
‘‘अरे गुलाब, ते जुनं
बंडल उघड
बराच माल उरलाय, त्यातली
एखादी चांगली घडी उलगड’’

ताई, ही बघा मोदी साडी
आहे की नाही भारी?
झगझगीत पॅटर्न, सुरतची प्रिंट
रंगसंगती किती न्यारी?

घेऊन टाका दोनचार साड्या
सध्या जाम डिमांड आहे
टिकाऊ तर आहेच, ताई
पण अजूनही ट्रेंडी आहे

पदर उलगडून बघा ताई
आहे की नाही लफ्फेदार?
बारीक अक्षरात विणलंय
बघा, ‘चोर नहीं चौकीदार!’

मुलायम मोदी वस्त्र आहे,
एकदम पक्‍का आहे कलर
रंगकाम थोडं गॉडी आहे,
पण पॅटर्न एकदम डिझायनर

कशाला बघता साहेबांकडे,
घेऊन टाका ताई!
पुन्हा पुन्हा अशी संधी
कध्धी मिळायची नाही!

दाम एकदम वाजवी आहे,
हिशेब अगदी साफ
भीम ॲपवर करा पेमेंट
जीएसटी कंप्लीट माफ!
काय म्हणालात ताई तुम्ही?
हा जुनाच आहे घाट?
पहिल्या धुण्यात साडीची
सगळी लागेल वाट?

डिमांडमधला आयटम होता,
म्हणून दाखवला तुम्हाला
नसेल घ्यायची तर नका घेऊ,
जबर्दस्तीचा नाय मामला!

तुम्हाला दाखवतो आता
एक नंबर जादुई चीज
बघाल तर म्हणाल, ही तर
भन्नाट भाऊबीज!

अरे गुलाब, स्टुलावर चढ
तो नवा गठ्ठा काढ!
गपचूप निकाल बाबा नायतर
येईल इडीची धाड!

ताई, ही बघा नव्वी कोरी
आली आहे प्रियंका साडी
मार्केटमध्ये क्रेझ आहे,
पण महाग आहे थोडी!
किंमतीकडे पाहू नका,
घेऊन टाका अज्जी!
प्रियंकादीदीसोबत इथे
साक्षात राहुलजी!

ही पण साडी सुरतचीच,
पण नॉर्थचं डिझाइन आहे
दोन्ही टाइपच्या साड्यांचा
सप्लायर एकच आहे!

तलम, सुती, तरीही मॉडर्न
अशी साडी आहे रॉयल
नेसून गेलात कुठंही तर
पब्लिक नमस्काराला वाकंल!

कलरमध्ये पण व्हरायटी भेटेल
त्याचं नाही टेन्शन!
मोदी वस्त्राला सध्या देतेय
ही साडी फुल टशन!

कुठली तुमच्यासाठी बांधू?
सांगा वन टू थ्री!
कुठलीही साडी घ्या ताई
तुम्हाला फॉलबिडिंग फ्री!

loading image