सत्तेचे समान वाटप! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
Saturday, 23 February 2019

एक आटपाटनगर होते. तेथील नगरजनांनी नगरात लोकशाही मार्गाने राजा निवडायचे ठरवले. दर पाच वर्षांसाठी राजा नेमण्याचा निर्णय झाला. निवडणूक ठरली. देवदत्त आणि उद्धवदत्त अशा दोघा धडाकेबाज धुरीणांची उमेदवारी जाहीर झाली. मतदान झाले. परंतु, अहो आश्‍चर्य! मतदानात देवदत्तास आणि उद्धवदत्तास समसमान मते पडली. आता काय करावे? नगराच्या नजीक एक पर्वत होता, तेथील गुहेत एक साधू वास करून असे. सदर साधू फार वेडेवाकडे तामसी भोजन करीत असल्याने तो त्या पर्वतावर खरोखर वास करतो, असे म्हटले जाई.

एक आटपाटनगर होते. तेथील नगरजनांनी नगरात लोकशाही मार्गाने राजा निवडायचे ठरवले. दर पाच वर्षांसाठी राजा नेमण्याचा निर्णय झाला. निवडणूक ठरली. देवदत्त आणि उद्धवदत्त अशा दोघा धडाकेबाज धुरीणांची उमेदवारी जाहीर झाली. मतदान झाले. परंतु, अहो आश्‍चर्य! मतदानात देवदत्तास आणि उद्धवदत्तास समसमान मते पडली. आता काय करावे? नगराच्या नजीक एक पर्वत होता, तेथील गुहेत एक साधू वास करून असे. सदर साधू फार वेडेवाकडे तामसी भोजन करीत असल्याने तो त्या पर्वतावर खरोखर वास करतो, असे म्हटले जाई. नगरजनांनी त्याच्याकडे जाऊन विचारिले, ‘‘हे महर्षी, दोघा उमेदवारांना समसमान मते पडली तर आता कसे करावे?’’ ह्यावर साधूने एक गवताची काडी उचलून त्याचे समसमान दोन तुकडे केले व तो हसला.

साधुमहाराजांनी सत्तेचे समसमान वाटप करावे, असा कौल दिल्याची खबर पसरली. उद्धवदत्त म्हणाला की ‘अडीच वर्षे मी राजा, अडीच वर्षे देवदत्त! हे मान्य असेल तरच पुढे जाऊ!’ देवदत्त चाणाक्ष होता. त्याने ‘अडीच वर्षे मी राजा, त्याच्या पुढली अडीच वर्षेसुद्धा मीच राजा!’ असे सुचवले. त्यावर उद्धवदत्ताने त्याला ‘चेचीन!’ अशी हातवारे करून धमकी दिली. हा नवाच पेच निर्माण झाला. अखेरीस दोघांनाही पूर्णवेळ अधिकार आणि सन्मान बहाल केला. ‘दोघांनी मिळून गुण्यागोविंदाने राज्य करा!’ असा आशीर्वाद रयतेने दिल्याबरोब्बर देवदत्त आणि उद्धवदत्त ह्या दोघांनी एकाच मुहूर्तावर राजमहालात आपापले सामानसुमान शिफ्ट केले व कल्याणकारी राज्यास सुरवात झाली...

तथापि, ह्या दुहेरी व्यवस्थेमुळे राज्यकारभारात काही किरकोळ अडचणी येऊ लागल्या. एकाच महालात दोघेही राहत असल्याने सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या निद्रेपर्यंत दोघांमध्ये तुंबळ लढाई होई. उदाहरणार्थ, उद्धवदत्तास बटाटेवडे आवडत, तर देवदत्तास साबुदाणा खिचडी! नाश्‍ता कुठला करावा? अन्य काही अडचणीही होत्याच. राजासाठी एकच सुवर्णरथ होता. त्या रथात दोघांना प्रवास करता आला असता, परंतु, रथात आधी कोणी बसायचे ह्यावर एकमत होईना. त्यावर दोघांनी एकदम रथात उडी घ्यायची असे ठरले.

पहिल्या दिवशी दरबार भरलेला असताना सिंहासनावर कोणी बसायचे ह्या मुद्द्यावर उभयतांमध्ये भांडण झाले. तलवारी निघाल्या. कारण सिंहासन सिंगल सीट होते. आता काय करायचे? असा पेच पडला. दरबारातील (एक प्रकारचा) बिरबल असलेल्या चंद्रसेन कोल्हापूरकर ह्याने दोघांनीही सिंहासनाच्या हातांवर बसावे व मधली जागा मोकळी ठेवावी, असा तोडगा सुचवला. त्याप्रमाणे देवदत्त आणि उद्धवदत्त हे दोघेही सिंहासनाच्या हातावर अवघडून बसले. उद्धवदत्ताचे ठीक होते, त्याला घोडेस्वारीचा थोडका अनुभव असल्याने त्याने सिंहासनाच्या हातास घोडा समजून मांड ठोकली. परंतु, देवदत्ताला स्कूटरची सवय असल्याने त्याची पंचाइत झाली!! अखेर ह्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून एक डब्बलसीट सिंहासन बनवण्यास राजमहालातील फर्निचर विभागास फर्मावण्यात आले. हे नवे सिंहासन मात्र प्रशस्त होते. दोघेही एकाच वेळी त्या सिंहासनावर बसून सुखाने न्यायदान करू लागले.

पण त्यातही अडचणी येतच होत्या. उदाहरणार्थ, एखाद्या गुन्हेगारास त्यांच्यासमोर आणण्यात आले की देवदत्त म्हणे, ‘‘नॉट गिल्टी...क्‍लीन चिट!’’ तेव्हाच उद्धवदत्त ओरडे, ‘‘गिल्टी, गिल्टी, गिल्टी!!...कडेलोट करा!’’ आता अशा वेळी काय करावे? हा नवा पेच निर्माण झाला. अखेर दोघांपुढे टीव्हीतल्या रिॲलिटी शोमध्ये असतो, तसा बझर लावण्यात आला. जो सर्वांत आधी बझरचे बटण दाबून न्याय देईल, तो निवाडा अंतिम मानण्यात येईल, असे ठरले.
...अशा प्रकारे आटपाटनगरातले प्रजातंत्र सुखात कालक्रमणा करू लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article