नभांगणाची भाषा! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेहोषीच्या जलशांना इथे चढे रोज रंग
जो तो रमे आपुल्याच मौजमजेमध्ये दंग

अशा वेळी काळीज गा माझे फाटुनिया जाय
कुठे आणि कशी आता असेल ती
वेडी माय?

शाळेच्या त्या प्रांगणात अधीमधी दिसते ती
उभी राही गोंधळून भांबावली सरसुती

काय तिला बोलायाचे, सांगायाचे आहे तिला
पुन्हा पुन्हा विचारिते ‘पोरा, तू
गा कितवीला?’

शाळेच्या त्या प्रांगणात उभे किती मम्मी पप्पा
नाबाज कपड्यात रंगतात कूल गप्पा!

विद्यार्थ्यांच्या दप्तराला लगडली सुधबुध
त्यांच्यासुद्धा बाटलीत थोडे वाघिणीचे दूध!

भांबावली सरसुती होत जाई कानकोंडी
अंगावरी जुनेराला ठिगळे नि हातभुंडी

एकेकाळी होती म्हणे तिच्या घरी शिरीमंती
वैभवाचे दिस होते, वाडा होता चिरेबंदी

चिरेबंदी वाड्याला हो, महिरपी नक्षीदार
धनधान्य, पुत्रपौत्र, गाईगुजी, अप्रंपार

हात होता सढळ नि समृद्धीला नाही खळ
परसात तिच्या होती लेकुरवाळी उभी केळ

तालेवार विद्‌वज्जन तिच्या पालखीचे भोई
संतमहात्मेही तिला हाकारीत- ‘आई, आई!’

अशी माझी मोठी माय तिचा हात हो सढळ
नशीबाच्या धनिणीचे भाग्यशाली गं निढळ
 
तिच्या चौसोपी वाड्यात होती म्हणे गजबज
लक्षुमीचा होता वास, संस्कृतीची होती वज

अमृताते पैजा जिंकी अशी माझी मोठी माय
वासे फिरल्या घरात, तिची अवस्था हो काय

उतरती लागे कळा, उसवली सारी वीण
ठरे परकी परकी असुनिया मालकीण

अबाळाने तिची आता हडकली किती कुडी
आपुल्याच मुलखात माय लागे देशोधडी

एकलीच कोपऱ्यात, बसे -आधाराला भिंत
तरी तिच्या ओठांवरी आहे एक गूढ स्मित

कुणालाही नकळे गा तिची अगम्यचि भाषा
स्वत:शीच बोलते नि विसळते कपबश्‍या

गार गार हपिसात पुशिते ती निळ्या काचा
झाडूपोछा करताना नच तिला फुटे वाचा
 
असा सारा दिस जातो, पाय ओढे मोठी माय
घराकडे जाता जाता अंधारतो अंतराय

उजेडाचे सैन्य हळू माघाराला जाऊ लागे
उरलेल्या किरणांचे पायरव आगेमागे

काळोखाच्या पखालींची क्षितीजाशी लगबग
तिमिराच्या डोहामध्ये हळूहळू बुडे जग

मध्यरात्री अचानक चाहुलीने जाग येते
कुठली ही कुजबुज? कोण येथे गा बोलते?

अंगणात येऊनिया पाहताना उगा वर
नभांगणी तारकांची भाषा येते कानावर

जडावाच्या दागिन्यांनी मढलेले सारे नभ
गप्पांमध्ये गुंगलेले त्याचे शब्द शुभ शुभ

पुंजाळून येते तेव्हा मराठीचे माझे मन
जेव्हा तारकांची पोरे गिरविती ग-म-भ-न!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com