गंगा आली रे अंगणी! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ वद्य चतुर्दशी.
आजचा वार : ट्यूसडेवार.
आजचा सुविचार : प्रयागतीर्थावरी। घेऊनि गंगेमध्ये बुडी।
झाली धन्य कुडी। महाराष्ट्राची!!
...........................
।।श्री।। नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. ) आजपासून जपाची नवी वही सुरू केली आहे. नमो नम: ह्या सिद्धमंत्राच्या लिखित जपाच्या (आधीच्या) वह्या महाशिवरात्रीला प्रयागतीर्थावर गंगामातेच्या सुपूर्द करून आलो. हात जोडले आणि म्हणालो, ‘‘माते, हे तुझेच आहे... तुजला परत देत आहे! बालकाकडे लक्ष ठिव!’’ थोडावेळ जपाच्या वह्या तरंगल्यासारख्या वाटल्या. मला वाटले, की आता तरंगतातच की काय! पण नाही...बुडाल्या!!
रात्रभर डोळ्याला डोळा नाही. सारखे पाण्यात बुडी मारल्यासारखे वाटत होते. ह्याला कारण सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त प्रयागतीर्थावर जाऊन केलेले गंगास्नान!! कालचा दिवस जीवनातला पवित्र दिवस होता. कृतकृत्य वाटते आहे. गेले काही दिवस योगीजींचे सारखे मेसेज येत होते.
निजतटबासी बिहंग, जल-थर-चर-पसु-पतंग
कीट, जटित तापस, सब सरिस पालिका
तुलसी तव तीर तीर सुमिरत रघुबंसबीर
बिचरत मति देहि मोहमहिषकालिका
...अर्थ लागला नाही, पण गंगास्नानाला जावे लागणार एवढे कळले! आमच्या योगीजींनी कुंभमेळ्याची तयारीच एवढी जोरदार केली होती की विचारता सोय नाही. उत्तम सोयी होत्या म्हणून बरेच पुढारी, मंत्री वगैरे तिथे जाऊन पापमुक्‍त होऊन आले होते. ‘तुम्ही कधी जाणार?’ अशी विचारणा दिल्लीहून होत होती. आमचे वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवारजींना म्हटले, ‘चलता का?’’ तर ते म्हणाले की जाम सर्दी झाली आहे...तुम्ही पुढे व्हा!! चंदुदाका कोल्हापूरकर म्हणाले की आमचा रंकाळा काय वाईट आहे? शेवटी एकटाच गेलो! नाही म्हणायला आमचे मंत्रिमंडळ सहकारी जयस्वालजी सोबत होते.  
शिवरात्रीच्या दिवशी सकाळी (फक्‍त तीन प्लेट साबुदाणा खिचडी आणि दोन प्लेट साबुदाणा वडा) अल्पोपहार करून मी प्रयागतीर्थावर गेलो. जाताना मुद्दाम काळा सदरा घेऊनच गेलो होतो. साक्षात नमोजीसाहेबांनी पंधरा दिवसांमागे काळे वस्त्र परिधान करून मगच गंगास्नान केले होते. म्हटले, महाजनांच्या पंथावर आपणही चालावे. तेवढ्यासाठी काळा सदरा विकत घेतला होता...असो. पुण्यबिण्याचे ठीक आहे, पण गंगास्नान हे वाटते तितके सोपे नाही. पाण्यात अंगठा बुडवला आणि अंगावर शहारा आला. एक तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे गंगास्नान बघण्यासाठी किमान चारपाचशे लोकांचा जमाव होता. इतक्‍या लोकांसमोर भाषण देता येईल, पण स्नान कसे करणार? शेवटी भीड सोडून प्रवाहात पाऊल घातले. गंगास्नानाच्या वेळी लाइफ जाकिट असावे की नसावे? असा एक सुरक्षाविषयक विचार मनात डोकावला. माणसाने कसे हमेशा सावध असावे. शेजारी जयस्वालजी पडेल चेहऱ्याने उभे होते. त्यांनाच विचारले.
‘‘पाणी गार आहे नै?’’ मी.
‘हहहहहह!’’ ते. त्यांनाही कापरे भरले होते.
‘‘किती खोल असेल? लाइफ जाकिट चढवावे काय?’’ मी.
‘‘हहहहहहह!’’ ते. गृहस्थ अगदीच कामातून गेला होता. मी नाद सोडला.
अखेर कोणीही आपल्याला पाहत नाही, असे समजून बेधडक बुडी मारली. क्षणार्धात काही तरी दैवी घडले. निळसर उजेडात एक आकृती दिसली. मंदपणे हसत होती. तो साधासा महागडा कुर्ता, दाढी, चष्मा...तेच परिचित हास्य...कुठे बरे पाहिले आहे ह्या तेज:पुंज व्यक्‍तीला? त्या आकृतीने मजला अनेक बटणे असलेली एक चौकोनी पेटीसदृश वस्तू आशीर्वाद म्हणून दिली!! पाण्यावर आलो तेव्हा हातात काही नव्हते!!
...नव्याने निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे. विरोधकांनो, आता तुमची खैर नाही!! जय गंगामय्या की...!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com