शक्‍ती, भक्‍ती, सक्‍ती! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

(एक लघु विज्ञानकथा)

स्थळ : टेम्पे टेरा क्षेत्र, ऑलिम्पस मॉन्स ज्वालामुखीच्या मागे, मंगळ ग्रह.
वेळ : पृथ्वी प्रमाण वेळेनुसार सकाळी पावणेबारा ते बारा.
प्रसंग : तणावपूर्ण.
पात्रे : मंगळवासी.

प्रधानसेवक इडोम अर्दनेरान आपल्या वातावरणानुकूलित कक्षात बसून होते. ते विश्‍वाचे चिंतन करीत आहेत, असे द्वाराशी आलेल्या प्रधान चिटणीस टिमाभाईंना सांगण्यात आले. ही वेळ प्रधानसेवकांच्या वामकुक्षीची असून नुकताच आडफाफ ह्या खास मंगळावरील पदार्थाचा मन:पूत आस्वाद घेऊन ते खुर्चीत पडून असतील, हे टिमाभाईंनी ताडले. तरीही ही वेळ वामकुक्षीची नसून पेचप्रसंगाची आहे, हे जाणवून त्यांनी द्वारपालाच्या मुस्कटात मारून कक्षात प्रवेश केला.
‘‘प्रधानसेवक इडोम अर्दनेरान ह्यांचा विजय असो!,’’ टिमाभाईंनी जयजयकार केला. विषय कसा काढायचा हे त्यांना कळत नव्हते.
‘‘प्रीथ्वी उप्परथी कछु खबर छे के?,’’ प्रधानसेवकांनी खास सांकेतिक भाषेत नेमका प्रश्‍न विचारला.
‘‘खबर छे, पण...’’ टिमाभाईंनी गुळमुळीत सुरवात केली.
‘‘त्यां चूंटणी छे ने?’’ प्रधानसेवकांनी दुसरा नेमका प्रश्‍न विचारला.
‘‘चूंटणीपेक्षाही भयंकर खबर आहे. प्रीथ्वीवाळ्यांनी अंतराळात सर्जिकल स्ट्राइक केला असून अवकाशातील एक उपग्रह उडवला आहे. ‘मिशन शक्‍ती’ म्हणतात त्याला...पुढल्या काळात ते आपल्यावर क्षेपणास्त्र डागतील, अशी चिन्हं आहेत...’’ टिमाभाईंनी गोपनीय खबर दिली.
‘‘स्पेसमधी सर्जिकल स्ट्राइक किधा? अरे बाप रे!!’’ प्रधानसेवक खडबडून जागे होऊन (खुर्चीतच) सावरुन बसले.
‘‘मिशन शक्‍ती बहु डेंजर चीज छे,!’’ टिमाभाईंनी चिंता व्यक्‍त केली.
‘‘अरे, त्यांना सांग ने, के चूंटणी भारत मां छे, स्पेस मां नथी! इकडे कशाला शक्‍ती-भक्‍ती दाखवते?,’’ प्रधानसेवक वैतागून म्हणाले. ‘त्यांना’ म्हणजे कोणाला हे टिमाभाईंना चांगले कळले होते. नेमका काय झ्याला? असे प्रधानसेवक अर्दनेरान ह्यांनी त्यांना विचारले.
‘‘बप्पोरे साडेग्यार वाग्या इंडियामधून एक रोकेट उडाला. त्रण मिनट मां त्रणसो किलोमीटर अंतर उप्परना उपग्रह...धडाम! किस्सा खतम!!’’ टिमाभाईंना घटनेचा क्रम सांगणे क्रमप्राप्त होते.
‘‘शुरुआतपासून सांगा!’’ छातीतली धडधड महत्प्रयासाने नियंत्रणात आणत प्रधानसेवक म्हणाले.
‘‘बप्पोरे मी आज महत्त्वपूर्ण संदेस सांगण्यासाठी टीव्हीवर येणार आहे, असं तिथल्या प्रधानसेवकांनी ट्विट केलं...पब्लिक फुल टेन्शनमधी आलं! छेल्ला वखत आच लोगोंने टीव्हीउप्परथी नोटबंदी डिक्‍लेर करी हती!’’ टिमाभाईंनी पूर्वपीठिका सांगितली.
‘‘पण अंतराळमधल्या उपग्रहाच्या चूंटणीशी काय संबंध?’’ प्रधानसेवकांना नीटसे कळेना!
‘‘ छे ने, छे! आता बीजा कोणीही आपडे उप्पर हमला ना करी शके, ए कहे छे आ लोग! पब्लिक तो व्होट आपीश ने!’’ टिमाभाईंनी विश्‍लेषण केले.
‘‘हेच्यात भक्‍तीच्या अने सक्‍तीच्या काय संबंध?,’’ प्रधानसेवकांना अजूनही काही टोटल लागत नव्हती.
‘‘ भक्‍ती माने प्रेम, विश्‍वास! तो भक्‍तीच्या व्होट तो मळशे! सक्‍तीच्या व्होट अलग छे... जुओ!’’ टिमाभाईंनी समजावून सांगितले, ‘‘...त्रणसो किलोमीटर अंतरावरच्या एक उपग्रह पाडी नाख्या...ना किसीने देखा, ना किसीने सुना! पण व्होट तो करवुज पडशे ने...’’
‘‘हां, ए वात तो छे..’’ प्रधानसेवकांनी मान डोलावली.
‘‘अगली चूंटणीच्या टायमाला त्यांच्या अंतराळयान मंगळापर्यंत येणार, ह्याची खात्री बाळगा! कछु सांभळ्यो?’’
...त्यानंतर मंगळ प्रमाण वेळेनुसार ठीक दुपारी चार वाजता मंगळावासीयांनी शनिग्रहाच्या पट्ट्यातील एक आख्खा उपग्रह उडवल्याची खबर सूर्यमालिकेत पसरली. अर्थात तेथे चूंटणी आहे की नाही, ते अजून समजू शकलेले नाही. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com