नानासाहेबांची मुलाखत! (ढिंग टांग)

शुक्रवार, 5 एप्रिल 2019

आमचे आराध्य दैवत जे की महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब ह्यांच्या म्यारेथॉन मुलाखतीनंतर आम्हाला चिक्‍कार बोलावणी येऊ लागली असून, ‘आमचीही मुलाखत घ्या’ अशी गळ घालण्यात येत आहे. बरेच पुढारी तूर्त आम्ही वेटिंग लिस्टवर टाकले असून, वन बाय वन एकेकाला घेऊ!! आम्ही घेतलेली साहेबांची मुलाखत देश पातळीवर प्रचंड गाजली. आम्हीही गाजलो! साहेब ऑलरेडी गाजलेलेच होते. ‘दगा देणार नाही, दगा देऊ नका’ अशी क्‍याचलाइन साहेबांनी आम्हाला दिल्यानंतर तोच धागा पकडून आम्ही तडक महाराष्ट्राचे कारभारी आणि युतीचे (एकमेव) शिल्पकार जे की नानासाहेब फडणवीस ह्यांना गाठले.

आमचे आराध्य दैवत जे की महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब ह्यांच्या म्यारेथॉन मुलाखतीनंतर आम्हाला चिक्‍कार बोलावणी येऊ लागली असून, ‘आमचीही मुलाखत घ्या’ अशी गळ घालण्यात येत आहे. बरेच पुढारी तूर्त आम्ही वेटिंग लिस्टवर टाकले असून, वन बाय वन एकेकाला घेऊ!! आम्ही घेतलेली साहेबांची मुलाखत देश पातळीवर प्रचंड गाजली. आम्हीही गाजलो! साहेब ऑलरेडी गाजलेलेच होते. ‘दगा देणार नाही, दगा देऊ नका’ अशी क्‍याचलाइन साहेबांनी आम्हाला दिल्यानंतर तोच धागा पकडून आम्ही तडक महाराष्ट्राचे कारभारी आणि युतीचे (एकमेव) शिल्पकार जे की नानासाहेब फडणवीस ह्यांना गाठले. आम्ही त्यांची मुलाखत घ्यावी, अशी गळ त्यांनी आम्हाला खूप आधी घातली होती. पण ‘आधी लगीन कोंडाण्याचे’ ह्या ऐतिहासिक बाण्यानुसार आम्ही क्‍याचलाइनवाली मुलाखत आधी घेतली.
नानासाहेबांची मुलाखत नेहमीप्रमाणेच खेळीमेळीची झाली. आम्ही खेळी केली की ते मेळी करत, त्यांनी खेळी केली की आम्ही चपळाईने मेळी करीत असू. येणेप्रमाणे बरीच खेळीमेळी झाल्यानंतर आम्ही मुलाखतीच्या कामाला लागलो.
आम्ही    :    सध्या क्‍या चल रहा है?
नानासाहेब    :    (ऐसपैस रेलून बसत) आराम! चहा घेणार?
आम्ही    :    चालेल! युतीचं कसं चाललंय?
नानासाहेब    :    (खुशीत) मज्जेत! परवाच ‘मातोश्री’कडून आंबाडाळ आली होती!
आम्ही    :    (चेहरा पाडून) अरे व्वा! आहे का शिल्लक?
नानासाहेब    :    छे! पहिल्या मिनिटात संपली! (चिमटीएवढा आकार दाखवत) हा एवढा डबा होता हो!! मी उलटा निरोप पाठवला! डबा देणार नाही, डबा देऊ नका!! हाहा!!
आम्ही    :    नेत्यांचं मनोमिलन झालं असलं तरी कार्यकर्त्यांचं कधी होणार?
नानासाहेब    :    काय?
आम्ही    :    (हाताने खूण करत) मनोमिलन!
नानासाहेब    :    (वैतागून) वाट्टेल त्या खुणा काय करताय? आता आमचं चांगलं चाललंय! जे काही किरकोळ मतभेद होते, ते मिटले आहेत! का विचारा?
आम्ही    :    का?... म्हणजे का विचारू?
नानासाहेब    :    असंच! साबुदाणा खिचडी खाणार?
आम्ही    :    चालेल! चहासोबतच येऊ द्या! पण मला सांगा, गेली पाचेक वर्षं तुम्ही चांगली निभावून नेलीत... कसं जमलं तुम्हाला हे?
नानासाहेब    :    चांगला प्रश्‍न विचारलात! साबुदाणा वडा खाणार?
आम्ही    :    (हुरळून) चालेल! मघाशी खिचडी आणि चहासुद्धा सांगितला होता, तोही-
नानासाहेब    :    (दुर्लक्ष करत) माझ्यात एक चांगला गुण आहे! सकारात्मकता!! कुठल्याही प्रश्‍नाला मी सकारात्मक प्रतिसाद देतो! उदाहरणार्थ, आमच्या मित्रानं आम्हाला नालायक म्हटलं तरी प्रेमानं विसरून जातो! हेच माझ्या कारभाराचं सीक्रेट आहे!!
आम्ही    :    तुमच्या प्रिय मित्रानं आम्हाला युतीची क्‍याचलाइन दिली आहे- ‘दगा देणार नाही, देऊ नका’! तुमची प्रतिक्रिया?
नानासाहेब    :    देत नाही जा!
आम्ही    :    (हबकून) आँ?
नानासाहेब    :    (डोळे बारीक करून) कांदेपोहे खाणार?
आम्ही    :    (कळवळून) चालेल ना! ते साबुदाणा खिचडी, वडा आणि चहाचंही बघा काहीतरी! पण ‘देत नाही जा’ म्हणजे काय? मघाशी-
नानासाहेब    :    ‘दगा देत नाही जा’ असा त्याचा अर्थ!
आम्ही    :    (बुचकळ्यात) अस्सं होय! मग तुमची क्‍याचलाइन हीच समजायची का?
नानासाहेब    : (बोट नाचवत) नाही! आमची क्‍याचलाइन वेगळी आहे! सांगू?
आम्ही    :    (उत्साहाने) हो तर! पण हा शेवटचा प्रश्‍न होता! त्याआधी कांदेपोहे, साबुदाणा खिचडी, वडे आणि चहा आला तर बरं होईल!!
नानासाहेब    :    (विजयी मुद्रेने) ‘तुमची मिर्ची, आमची खुर्ची!!’ कशी आहे आमची युतीची नवी क्‍याचलाइन?