नवमतदारांनो..! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सां प्रतकाळी देशात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून प्रचार शिगेला पोचला आहे, हे आपल्याला माहीत आहेच. अत्यंत जबाबदारीने नवीन सरकार निवडण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा वेळी आपले डोके शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: पहिल्यांदाच हौसेने मतदान करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवमतदारांनी समजून उमजून आपला मतदानाचा अधिकार बजावावा, अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असते. ती राजकारण्यांसाठी असते, असा अकारण गैरसमज पसरलेला आहे. वस्तुत: ती आपल्यासारख्या सामान्य मतदारांसाठीच असते, हे लक्षात घ्यावे. परंतु, टीव्ही, समाजमाध्यमे, प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, रोड शो आदी गोष्टींमुळे सामान्य मतदार कंप्लीट खलास झाला असून काय करावे, हे त्याला कळेनासे झाले आहे. म्हणून आम्ही येथे मतदारांनी-विशेषत: नवमतदारांनी- आपले वर्तन कसे ठेवावे, ह्या संदर्भात काही सूचना करुन ठेवत आहो.
१. नवमतदारांनी आपले पहिले मत अनुक्रमे देश, संरक्षण, विकास, किंवा अन्य ह्यांना समर्पित करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, नवमतदारांनो, सावध रहा! पहिले मत स्वत:लाच समर्पित करावे!
१. दहीहंडी, क्रिकेट म्याच आणि निवडणुका ह्या टीव्हीवरच बऱ्या दिसतात, हे लक्षात घ्यावे. प्रचार हा रिॲलिटी शोसारखा शक्‍यतो घरबसल्या एन्जॉय करावा.
१. होताहोईतो कोणाच्याही प्रचाराला जाऊ नये. ते कामधंदा नसल्याचे लक्षण आहे, बाकी काही नाही! शिवाय त्यात घरची आघाडी (काहीच्या काहीच) बिघडते, हे लक्षात घेऊन काळाची पावले ओळखावीत.
३. रस्त्यात अनोळखी इसम तोंडभरून हसून नमस्कार करू लागल्यास तो उमेदवार आहे, असे ओळखावे व आपण (जमल्यास) फुटपाथ बदलावा.
२. एखादा उमेदवार प्रचारासाठी पुढे आला की सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे मोजका संवाद साधावा :
उमेदवार : हहहह...तुम्ही म्हंजे आपलेच!...हहहह!!
मतदार : बिलकुल नाही..हीहीहीही!!
उमेदवार : काही अडचण असेल तर मी स्वत: चोवीस तास....
मतदार : हहहह!! नोकरी द्या!
उमेदवार : निवडून आलो की नक्‍की!
मतदार : मग आत्ता पाश्‍शे रुपये ॲडव्हान्स द्या!
उमेदवार : पाश्‍शे?
मतदार : शंभर तरी द्या...टोकन म्हणून!
...इथे उमेदवार उमेदीने निघून जाईल, ह्याची खात्री बाळगा!
२. आपल्यामुळे लोकशाही टिकून आहे, ह्याचा गमतीदार साक्षात्कार काही जणांना मतदानाच्या काळात होईल. पण ज्याप्रमाणे सर्दीपडसे आठवड्यापलीकडे टिकत नाही, तसेच ह्या साक्षात्काराचे असते, ह्याची खात्री बाळगावी.
४. कुठल्या पक्षास मत द्यावे, ह्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याच्या कार्यास टीव्ही च्यानले समर्थ आहेत. एक च्यानल सांगेल की सत्ताधारी पक्ष माजला आहे. दुसरा सांगेल की सत्ताधारी पक्ष नम्र असून, विरोधकच माजले आहेत. तिसरा सांगेल की दोन्हीही माजलेले आहेत. तुम्ही घ्या कमर्शियल ब्रेक..!
५. अशा वेळी निवांत गाणीबजावणी लावून बसावे. सिनेमा बघावा. कांदेपोहे किंवा उप्पीट खावे. जणू काही ही निवडणूक दुसऱ्याच देशात चालू आहे, असे मनासज्जनाला सांगावे.
५. ह्या काळात भरपूर पाणी प्यावे. तसेच कांदा सोबत ठेवावा! टीव्हीवरील बातम्यांचा मारा बघताना ही काळजी घ्यावी लागते!
६. दर रात्री न चुकता मोबाइल फोनची फोटो ग्यालरी रिकामी करावी.
६. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने काही लोक सहल अथवा गावी जातात. तसे करू नये! कारण सहलीत निवडणुकीची मजा नसते!!
...एवढे केलेत की मतदानाच्या दिवशी बोटाला शाई लावून सेल्फी काढावी व ती सर्व संबंधितांना पाठवावी. इथे मतदानाची प्रक्रिया संपते. पुढे सरकार स्थापना वगैरे. त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही, ह्याची नोंद घ्यावी व आपापल्या दिनक्रमाला लागावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com