लाव रे तो व्हिडिओ! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विकारीनाम संवत्सरे चैत्र शु. त्रयोदशी.
आजचा वार : बुधवार की गुरुवार?
आजचा सुविचार : अच्छे दिन के मजे उडाओ,
नाचो, खाओ, पिओ!
आलबेल है सब कुछ लेकिन
कौन लगावें व्हिडिओ?
....................................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) निवडणुकीच्या धामधुमीत डायरी लिहायला वेळच मिळाला नाही. उन्हातान्हात वणवण भटकणे चालू आहे. दिवसभर असे भटकायचे आणि रात्री तळमळत पडून राहायचे. डोळ्याला डोळा लागत नाही. चुकून लागलाच तर भलभलती स्वप्ने पडतात. उदा. गणिताच्या पेपरची तयारी करून परीक्षेला गेलोय आणि समोर भूगोलाचा पेपर आल्यावर घाम फुटतो...किंवा पाळलेला वाघ साखळी बांधून विजयी मुद्रेने फिरायला बाहेर गेलोय आणि गल्लीतल्या कुत्र्यांची भुंकाभुंक ऐकून वाघ आणि मी दोघेही जीव खाऊन पळत सुटलोय...किंवा एक उग्र चेहरा अंधारातून माझ्या चेहऱ्याजवळ प्रकट होऊन म्हणतो : ‘लाव रे तो व्हिडिओ!’...किंवा जाऊ दे.
‘लाव रे तो व्हिडिओ!’ हे वाक्‍य ऐकले रे ऐकले की पोटात गोळाच येतो. काल आमच्या घरची मंडळी जुन्या आठवणी काढत गप्पा मारत बसली होती. लग्नाचा विषय निघाल्यावर मंडळी उत्साहात म्हणाली : ‘लाव रे तो व्हिडिओ!’’ प्राणांतिक दचकलो. ‘खबरदार व्हिडिओ लावाल तर...’ असे ओरडणार होतो, पण तोंडातून शब्द फुटेना. मुख्यमंत्रिपदाच्या पुढल्या टर्ममध्ये (तरीही मीच होणार मुख्यमंत्री!) व्हिडिओ दाखवण्यावर बंदी आणणार आहे!!
नवल वाटते. ज्याच्या पक्षात एकही उमेदवार नाही, ज्यांच्याकडे साधे मतदारसुद्धा नाहीत, ज्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही, अशा पक्षाच्या पुढाऱ्याच्या सभांना इतकी गर्दी कशी? ही गर्दी कुठून येते? पूर्वीच्या काळी नटून थटून मराठी मंडळी नाटकाबिटकाला जायची. (हल्ली मॉलमध्ये जातात!) तशी इलेक्‍शनच्या हंगामात मराठी मंडळी ह्यांची भाषणे ऐकायला जातात का? एवढा वेळ मैदानात बसून भाषण ऐकायचे आणि नंतर मत तिसऱ्यालाच द्यायचे, हे मराठी माणसाला कसे जमते? माणसाने जोरदार भाषण करावे. खुशाल एकमेकांची उणीदुणी काढावीत. पण हे असले व्हिडिओ दाखवण्याची काय गरज? हा रडीचा डाव आहे. -‘लाव रे तो व्हिडिओ’ काय? हॅ:!!!
हे जे उमेदवार नसलेल्या सेनेचे पुढारी आहेत, त्यांच्या घरच्या मंगलकार्याला मागे एकदा आवर्जून गेलो होतो. तेव्हा गृहस्थ किती सौजन्याने वागला होता. ‘‘तुमच्यासाठी खास साबुदाणा खिचडीही केली आहे’’ असे प्रेमाने सांगितलेन! पण तेव्हा आमचे नुकतेच जेवण झाले होते. तरीही आग्रहाचे म्हणून सात साबुदाणा वडे आपुलकीने खाल्ले. पण ते सगळे व्हिडिओतून बाहेर येतील, असे वाटले नव्हते.
अभ्यास केला काँग्रेस-राष्ट्रवादीचा आणि पेपर आला मनसेचा!! अशी स्थिती आली आहे. त्यातून मार्ग काढून महाराष्ट्रातील ४८ सिटा कशा जिंकायच्या, हा प्रश्‍न भेडसावू लागला आहे. वास्तविक हे सगळेच प्रकरण आम्ही ऑप्शनला टाकले होते. आम्हीच काय महाराष्ट्राच्या जनतेनेही हा प्रश्‍न ऑप्शनला टाकलाय, असे चित्र दिसत होते. पण कसचे काय नि कसचे काय!!
निर्वाणीचा उपाय म्हणून मित्रवर्य उधोजीसाहेबांना साकडे घालून पाहिले. म्हणालो की, ‘तुमची ओळख आहे...म्हंजे असेलच! तर तुमच्या बंधुराजांना जरा आवरा!’ पण त्यावर त्यांनी नुसतेच खांदे उडवले. ...‘लाव रे तो व्हिडिओ’ हे वाक्‍य उच्चारू नका!!’ असे ‘त्यांना’ सांगणारा कुणी मर्द मराठा ह्या महाराष्ट्रात आहे काऽऽऽ? मी शोध घेतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com