तक्रार ! (ढिंग टांग)

तक्रार ! (ढिंग टांग)

प्रति,
संबंधित अधिकारी किंवा टू व्हूमसोएव्हर इट मे कन्सर्न- सध्या देशात आणि राज्यात निवडणुकीचे वारे जोरात वाहत असल्याचे आपल्याला ठाऊक असेलच. तथापि, निवडणूक प्रक्रियेत काही नियमबाह्य प्रकार घडत असल्याचे आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी सदरील अर्ज देण्यात येत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराने किंवा त्याच्या पक्षाने प्रचार करणे समजू शकते. किंबहुना ते लोकशाहीला धरूनच आहे. परंतु, सध्या महाराष्ट्रात एका अज्ञात इसमाने उगीचच अपप्रचाराची राळ उडवून दिली आहे, असे कळते. सदर अज्ञात इसम कुठल्याही निवडणुकीला उभा नाही, तसेच त्याचा पक्षही कुठे रिंगणात नाही. त्याच्या पक्षाकडे उमेदवारच नाहीत, इतकेच नव्हे तर मतदारही आहेत की नाही, ह्याची शंका आहे. परंतु, हा इसम गावोगाव फिरून मोठमोठ्या सभा घेत असून त्यात परवानगीशिवाय व्हिडिओफितींचे बेकायदा प्रदर्शन करून अकारण अपप्रचार करत आहे. हा मनुष्य कोणाचाही प्रचार करत नसल्याने त्याच्या सभांचा खर्च कोणाच्या निवडणूक खर्चात टाकायचा, असा यक्षप्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सदरील मनुष्य ‘अमक्‍याला मतदान करा’, असे सांगत नसल्याने सगळी पंचाईत झाली आहे. तसे न सांगितल्याने ‘अमक्‍या’चे फावते, हे ‘तमक्‍या’चे दुखणे आहे! ह्या मनुष्याने घेतलेल्या सभांचा खर्च ‘अमक्‍या’च्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा, असा ‘तमक्‍या’चा आग्रह असला तरी तसे करणे अयोग्य ठरेल, असे नियमावली सांगते. ह्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी काही गोष्टींची दखल घ्यावी असे वाटते.

१. सदर मनुष्यास मरणाची सर्दी झालेली स्पष्ट दिसते. सदोदित नाकाला रुमाल लावून तडाखेबंद भाषण करणाऱ्या ह्या सद्‌गृहस्थाने ‘तमक्‍या’च्या नाकात दम आणला आहे. पडसे झालेल्या माणसाने असे वागू नये!! 

२. सदर मनुष्य आपल्या पक्षाची निशाणी जे की रेल्वे इंजिन (बंद पडलेले) ह्याचे चित्र लावून भव्य सभा घेत आहे. तेव्हा निवडणूक खर्च त्याच्याच पक्षाच्या खात्यात घालून वसूल केला जावा, अशी शिफारस होती. तथापि, ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. कारण सदर मनुष्याच्या खात्यात फद्यासुद्धा नाही, हे उघड आहे. वसुली कशी करणार? 

३. सदर मनुष्य आपल्या भाषणात दाखवत असलेल्या व्हिडिओफिती ‘तमक्‍या’ पक्षाच्या सर्वश्रेष्ठ नेत्यासंबंधी असतात. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावतात. आमच्या नेत्याच्या व्हिडिओफिती दाखवण्यापूर्वी रीतसर परवानगी घेतली नसून कॉपीराइट कायद्याचे हे उल्लंघन आहे, असा ‘तमक्‍या’ पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. 

४. सदर मनुष्यामुळे ‘अमक्‍या’चा (फुकट) राजकीय फायदा होत असून ‘अमक्‍या’ने सदर मनुष्याला बिनभाड्याने कामाला लावल्याचा आरोप केला जात आहे. तसे असल्यास ह्या सभांचा खर्च ‘अमक्‍या’च्या खात्यात घालावा, असा ‘तमक्‍या’चा आग्रह आहे. परंतु, आमचा ह्या प्रकाराशी काहीही संबंध नाही, असा पवित्रा ‘अमक्‍या’ने घेतल्यामुळे अनवस्था प्रसंग ओढवला आहे. उदा. हॉटेलमध्ये गेल्यावर एकाने डोसा मागवला. वेटरने त्याचे बिल (बडिशेपेसकट) शेजारच्या वडासांबार खाणाऱ्याकडे सरकवले, तर त्याने ते भरावे काय? हा खरा सवाल आहे.

सर्वांत शेवटी-
५. सदरील मनुष्यास अटकाव करणे लोकशाहीला अवघड जात आहे, हे खरेच. अशा परिस्थितीत सदरील मनुष्याच्या रंगारंग अपप्रचार सभांना किमान ३५ टक्‍के मनोरंजन कर तरी लावता येईल का, ह्याचा गंभीरपणे विचार व्हावा.

उपरोक्‍त अर्ज सक्षम अधिकाऱ्याच्या वाचनात आल्यास निर्णय व्हावा, ही विनंती. 

आपला नम्र. एक ‘तमका’ कार्यकर्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com