शेक्‍सपिअरचं नाटक! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

तुम्हाला सांगायला
हरकत नाही,
परवा नाक्‍यावर भेटला बार्ड!
कटिंग पीत बसला होता
निर्ममपणे रहदारी पाहात
...पुढे केलं व्हिजिटिंग कार्ड!

मला पाहताच चपापला,
उगीच थोडा ओशाळला,
‘गुड मॉर्निग’ घातला, तर
ओठांवर हसू आणत
किंचितसा मिशाळला...

खुर्चीखाली पाय हलवत
(बुटकाच होता तसा)
म्हणाला साहेबी तोऱ्यात,
‘‘गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग!’’

म्हटलं, ‘‘साहेब, इकडं कुठे?’’
तर म्हणाला, ‘‘सहज आलो,
ऐकलं की इथं इलेक्‍शन आहे!’’

मराठी बाण्यानं
म्हणालो त्याला :
‘‘नाऊ कमॉन, बार्ड!
चारशे वर्षांपूर्वी मातीत
गेलेल्या तुला
ॲव्हन नदीची शपथ...
स्ट्रॅटफर्डची वेसदेखील
न ओलांडणाऱ्या,
उमरावी नाटकं करण्यात
जिंदगी घालवणाऱ्या,
किलो-किलोनं शब्दओझी
पैदा करुन तमाम दुनियेला
शतकानुशतकं छळणाऱ्या,
तुझा आणि
 (आमच्या) इलेक्‍शनचा
संबंध तरी काय?’’

‘‘तूसुद्धा असं म्हणावंस,
एट टू...ब्रूटस?,’’ हताशेने
कटिंगचा गिलास मेजावर
आपटत तो म्हणाला,
‘‘अरे, इलेक्‍शनमध्येच तर
असतं भन्नाट नाटक,
पायदिव्यांच्या झोतात रंगणारं,
प्रवेशांमागून प्रवेश होणारं,
प्रेक्षकांची मती गुंग करणारं,
अस्सल बावनकशी नाटक!

इलेक्‍शनमध्येच उलगडतो
मानवी विकारांचा कृष्णपट
ज्यात असतात महानाट्याची
अगणित बीजे,
 रंग आणि वास...
घातपात, रक्‍तपात,
कपट, विश्‍वासघात,
सूड, चीड, द्वेष, असूया,
संशय, हेटाळणी, विटंबना,
चापलुसी, हेराफेरी, ढोंग,
खून आणि वंचना!


माणसाच्या मनामनांत
खोल खोल तळातळात,
साकळलेला असतो
दुर्भावनांचा चिखलगाळ,
बुडबुडतो दुर्गंध, फेसाळतो
विकार-विलसितांचा विखार.
उभारतं एक कृष्णकृत्यांचं
अभावविश्‍व, ज्यात असते
मिसळलेली दुर्बल विकलता,
तुझी, माझी,
ह्याची आणि त्याचीही.
अटळतेच्या अनिर्बंध नाट्याचे
रंग अवकाश व्यापून असताना
मी कुठे असावं,
असं तुला वाटतं?’’

थोडं पुढे सरकून
बार्ड म्हणाला :
‘‘ह्या महानाट्यात तुझी
भूमिकासुद्धा आहेच ना?
प्ले इज द थिंग मित्रा,
प्ले इज द थिंग!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com