आमचाही सलाम! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सलाम, सलाम सबको सलाम,
लोकशाहीच्या रक्षणकर्त्यांनो,
एक हात जागच्या जागी ठेवून
उजव्या हाताने सलाम!

मतदान करणाऱ्यांना सलाम
मतदान न करणाऱ्यांनाही सलाम
एकदाच मतदान करणाऱ्यांना सलाम,
दोन-तीनदा मतदान करणाऱ्या
लोकशाहीच्या पाईकांना तर
आपला कडकडीत सलाम

तडाखेबंद व्हिडिओबाजी
करणाऱ्यांना सलाम
व्हिडिओबाजीची
 पोलखोल करणाऱ्यांनाही सलाम
ट्रकावर आरूढ सत्ताभिलाषी
उमेदवारांना सलाम
उमेदवाराच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या
प्रोफेशनल चालकालाही सलाम
घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना सलाम
ढोलताशे बडवणाऱ्या वाजप्यांना सलाम
तालावर नाचणाऱ्या
नृत्यकार्यकर्त्यांना सलाम
दुतर्फा गर्दी करणाऱ्या मतवाल्यांना सलाम

सबको सलाम, प्यारे भाईयों,
 सबको सलाम!

गोडाऊनमध्ये कोटी कोटींच्या नोटा
दडवणाऱ्या महामेरूंना सलाम
गाडीच्या डिकीत लाखालाखांची पुडकी
नेणाऱ्या महामोरुंना सलाम
संशयित पुढाऱ्यांच्या बंगल्यांवर
अर्ध्या रात्री रेड मारणाऱ्या
अधिकाऱ्यांना सलाम
रेड मारली म्हणून बोंब ठोकणाऱ्या
संभावित पुढाऱ्यांना तर
दोन्ही हातांनी सलाम

बिचाऱ्या गरीब मतदारांच्या हातात
दोन हजाराची नोट सर्कवणाऱ्या
दानशूर उमेदवारांना सलाम
कुकर, शेगडी, साडीवाटप करणाऱ्या
घरेलु वृत्तीच्या उमेदवारांना सलाम
नुसताच नमस्कार करून
पुढे सरकणाऱ्या सराईतालाही
आमचा सराईत सलाम

सबको सलाम, ताईमाईअक्‍का,
 सबको सलाम!

आंघोळ करुन मतदानाच्या
रांगेत घाम गाळणाऱ्यांना सलाम
घाम पुसत पारोश्‍या मताने लोकशाही
टिकवणाऱ्यांना नाक दाबून सलाम
मतदानाची सुट्टी जोडून
सहकुटुंब सहलीला जाणाऱ्या
कुटुंबवत्सलांना सलाम
एकमेकांना बोट दाखवत
उरलेला दिवस मॉलमध्ये
हिंडण्यात घालवणाऱ्या
कूल फॅमिलीला सलाम
मतदान करून बोटयुक्‍त सेल्फी
फेसबुकावर पोस्ट करणाऱ्या
सोशल लोकांना सलाम
त्यांच्या पोस्टला अंगठायुक्‍त
लाइक करणाऱ्या हौशीभाद्दरांना सलाम

अपना तो पेहलेसेईच बोले तो
सबकू दिलफेक सलाम

पन्नाप्रमुखांना सलाम
बूथप्रमुखांना सलाम
गल्लीप्रमुखांना सलाम
दिल्लीप्रमुखांना तर साष्टांग सलाम

मेरे साथीयों, सबको अपना
तहे दिलसे सलाम!

लोकशाहीतल्या महासोहळ्याला सलाम
महासोहळ्यातल्या लोकशाहीलाही सलाम
सब घोडे बारा टक्‍के म्हणणाऱ्या
 विंदांना सलाम
आणि सबको आदिम सलाम मारणाऱ्या
कविवर्य पाडगावकरांनाही सलाम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com