होगी प्यार की जीत! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

डिअरेस्ट नमोजी अंकल, सप्रेम नमस्कार आणि एक बिग बिग हग!... आय मीन प्यार की झप्पी!! माझं पत्र वाचून तुम्ही एव्हाना च्याट पडला असणार आणि वाचता वाचता खुर्चीतून खाली पडले असणार, ह्याची मला खात्री आहे. ह्याआधी मी तुम्हालाच काय, कोणालाच पत्र लिहिलेले नाही. पत्राच्या कागदाला नाक लावून पाहा, सुगंध येईल. हा सुगंध तुमच्या प्रति माझ्या मनात असलेल्या अपरंपार प्रेम आणि आपुलकीचा आहे. पाकिटावर माझे नाव वाचून तुम्ही पत्र न वाचता दात ओठ खात चोळामोळा करून बंबात घालाल, अशी भीती वाटली. म्हणून पत्राच्या पाकिटावर मी मुद्दाम ‘प्रेषक का नाम-’ म्हणून ममतादीदींचे नाव लिहून ठेवले. दीदींनी ‘दोन बंगाली कुर्ते आणि थोडी मिठाई पाठवत्ये आहे’ असे कळवले असणार असे वाटून तुम्ही ते उत्सुकतेने उघडले असेल.- आणि आतमध्ये मी! हाहा!!

नमोजी अंकल, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी तुम्हाला ‘चौकीदार चोर है’ असे म्हणतो म्हणून अस्वस्थ होऊ नका. ते मी प्रेमापोटीच म्हणत आलो आहे. एखाद्या लाडक्‍या वांड मुलाला नाही का आपण ‘अरे चोरा, लब्बाडा’ असे म्हणतो, तस्सेच!! तुम्ही देशाचे चौकीदार आहात. आपले लाडके काका चौकीदार आहेत, ह्याचा मला विलक्षण अभिमान आहे. मी तुम्हाला उद्देशून ‘चौकीदार चोर है’ असे म्हणालो तेही प्रेमादरापोटीच.

परवा टीव्ही चॅनेलच्या एका मुलाखतीत मी सांगून टाकले की कुणी काहीही म्हणो, आपल्याला बुवा नमोजी अंकल जाम आवडतात. तो चॅनेलवाला पत्रकार हैराण झाला. सारखा विचारत होता की ‘‘असं कसं? ते तर तुम्हाला कित्ती कित्ती नावं ठेवत असतात!’’ मी त्यांना ठणकावून सांगितले की  ‘‘काड्या घालू नका आमच्यात. आमचं नातं वेगळं आहे. राजकारणाची भानगड नसती तर हा पुतण्या आणि नमोकाका दोघे दिल्लीच्या प्रांठेवाल्या गल्लीत एकत्र आलू प्रांठा खाताना दिसले असते..!’’
मध्यंतरी मी तुम्हाला भर सभागृहात प्यार की झप्पी दिली होती. (नंतर डोळाही मारला होता!) मनात प्रेम असल्याशिवाय का कुणी प्यार की झप्पी देते? आमच्या मल्लिकार्जुन खर्गेजींना त्या दिवशी खूप दु:ख झाले. ‘‘मई इत्ते सालसे यहां बईठा, लेकिन मेरेकु झप्पी नै मिला! ए बराबर नै हय...’’ अशी तक्रार ते करत होते. पण मी त्यांना म्हटले, ‘‘नथ्थिंग डुइंग! आय लाइक नमोजी अंकल टू मच!’’

यू आर रिअली रिअली माय फेवरिट अंकल! (पत्र लिहिताना व्हाट्‌सॲपच्या इमोजी वापरण्याची सोय नसते, ह्याचे मला ह्याक्षणी खूप दु:ख होते आहे.) तसा मी फार प्रेमळ माणूस आहे. माझ्या गालाला खळी पडते. (तुम्ही पाहिली आहे का?) खळी पडणाऱ्याबद्दल तुमच्या मनात इतका दुस्वास का? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. माझ्याबद्दल तुमच्या मनात भयंकर खुन्नस आहे, हे मला माहीत आहे. पण तुम्ही कितीही खुन्नस दिलीत, तरी मी तुमच्यावर असेच प्रेमच करत राहणार. किंबहुना, तुमच्या सान्निध्यात राहता यावे म्हणूनच मी राजकारणात आहे, हे खरे सत्य आहे. ‘मोदीजी मुझसे डरते है. आंख उठाकर नहीं देखते’ अशी उघड तक्रार मी मध्यंतरी केली होती. हीच खरी प्रेमाची शक्‍ती आहे. प्रेमापुढे द्वेष, तिरस्कार, घृणा ह्या भावनांचा नेहमीच पराजय होत आला आहे. ह्या निवडणुकांमध्येही प्रेमाचाच विजय होणार, हे निश्‍चित.
सदैव आपल्या प्रेमादरात बुडालेला आप का अपना.
रागा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com