ढिंग टांग : विश्‍वरूप!

शनिवार, 25 मे 2019

कुरुंच्या अपार सैन्यासन्मुख दिङ्‌मूढ उभ्या पार्थाचे अचानक पाणावले डोळे... अंतर्मुख होऊन त्याने पाहिले सभोवार तेव्हा, झण्णकन गरगरले व्योम, भवताल आणि शंखगर्जनांच्या, रणदुंदुभींच्या विक्राळात धगधगून उठलेले कुरुक्षेत्र क्षणभर झाकोळले... रथस्तंभ घट्ट पकडून गलितगात्र पार्थाने किलकिल्या नेत्रांनी पाहिले सारथ्य करणाऱ्या युगंधराकडे विचारले जणू,‘‘का रे बाबा, हे अघोरी द्यूत मांडिलेस?’’ समजून उमजून युगंधराने ओढले अश्‍वांचे वेग, आणि ओळखले तेव्हाच की, हाच तो क्षण, हीच ती वेळ...

कुरुंच्या अपार सैन्यासन्मुख
दिङ्‌मूढ उभ्या पार्थाचे
अचानक पाणावले डोळे...
अंतर्मुख होऊन त्याने
पाहिले सभोवार तेव्हा,
झण्णकन गरगरले व्योम,
भवताल आणि शंखगर्जनांच्या,
रणदुंदुभींच्या विक्राळात
धगधगून उठलेले कुरुक्षेत्र
क्षणभर झाकोळले...

रथस्तंभ घट्ट पकडून
गलितगात्र पार्थाने
किलकिल्या नेत्रांनी पाहिले
सारथ्य करणाऱ्या युगंधराकडे
विचारले जणू,‘‘का रे बाबा,
हे अघोरी द्यूत मांडिलेस?’’

समजून उमजून युगंधराने
ओढले अश्‍वांचे वेग, आणि
ओळखले तेव्हाच की,
हाच तो क्षण, हीच ती वेळ...

‘‘पार्था, ठीक आहेस ना?’’
मेघमयी आश्‍वासक स्वरात
सारथी युगंधराने क्षेम पुशिले,
तेव्हा मटकन बसून
चाचरत, अडखळत
पार्थाने विचारले फक्‍त
फक्‍त तीनच प्रश्‍न :
युगंधरा, मला सांग...
‘‘ज्या युद्धाचा निर्णय
आधीच झाला आहे,
त्या रणाचे प्रयोजनच काय?’’
मला हेदेखील सांग...
सत्य संहारक असतेच का?
आणि जमले तर हेही सांग...
केवळ युद्धानंतरच गवसणारे
सत्य नेमके दिसते तरी कसे?

पार्थप्रश्‍नांच्या उत्तरादाखल
युगंधराने केले किंचित स्मित
क्षणकाल सोडून दिला
वर्तमानाचा वेग, आणि
कालचक्राच्या
 गतिमान आरीतून
झळाळत आलेल्या सहस्र
तेजोशलाकांनी व्यापले व्योम
स्थलकाल झाले स्थितिशील
इवल्या अंकुराचे
 फुटावे अस्तित्त्व
आणि उलगडत, विकसत
वृद्धिंगत होणाऱ्या अतिविशाल
अश्‍वत्थाप्रमाणे एक दैवी
निर्गुणाकार प्रकटले
 त्या ठिकाणी.
त्या विराटाला नव्हता आदि,
ना अंत...ना खोली, ना उंची
किंवा ना लांबी, ना रुंदी.
तो सामोरा होता?
 की पाठमोरा?
काळा की गोरा?
 म्लान की शक्‍तिमान?
काही कळेना...कळेनाच!
जीवनाचे गुह्य उलगडणाऱ्या
त्या साक्षात्कारी विराट दर्शनाने
प्रस्फुटला पार्थाचा जीव,
मुखावर दोन्ही हात दाबून
दोन्ही डोळे घट्ट मिटून
तो पाहात राहिला विश्‍वरूप...

कालांतराने भान आले तेव्हा,
सारथी युगंधर उपरणे सावरत
पुन्हा बसला होता
 रथाच्या अग्रभागी.
अश्‍वांच्या पाठीवर
आसूड ओढत
तो म्हणाला इतकेच :
‘‘असंतुष्ट आणि अविश्‍वासार्ह
ह्यांच्यातील हे युद्ध
आहे, पार्था!
तू कोण आहेस ते तूच ठरीव...
त्याचा निकालही
 ठरलेलाच असतो.
तो असा : अविश्‍वास कधी
जिंकत नाही, आणि (म्हणून)
असंतुष्टांचा विजय ठरलेलाच!’
आणि हो, तू जे पाहिलेस
ते सत्यच होते, पण त्याचा
आकार, आकलन कधीही
तुझ्या कवेत येणार नाही...
...कितीही युद्धे
 खेळलास तरीही!’’