ढिंग टांग : एक फोन...न आलेला !

dhing tang
dhing tang

आदरणीय मा. नमोजीहुकूम साहेब यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत सा. नमस्कार. सर्वप्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. मी एक साधासुधा सिंपल खासदार आहे. (तुमच्याच करिश्‍म्याच्या जोरावर) प्रचंड मताधिक्‍याने (ह्यावेळीही) निवडून आलो आहे. ‘ह्या वेळी मंत्रिमंडळात तुमचा नंबर नक्‍की लागणार’ असे मला सांगण्यात येत होते. तशी मला खात्रीही होती. कारण खासदारांच्या मेळाव्यात तुम्ही माझ्याकडे बघून भिवई उडवली होती व श्रीमान अमितभाईंनी चष्म्यातून रोखून सलग अडीच मिनिटे माझ्याकडे पाहिले होते. ‘कोणावरही विश्‍वास ठेवू नका. माझ्या ऑफिसमधून फोन येईल...तेव्हाही खात्री करुन घ्या!’’ असे तुम्ही इच्छुकांना बजावून सांगितले होते. त्यानुसार गेले दोन-तीन दिवस तुमच्या फोनची वाट पाहिली...
यंदा आपल्याला फोन येणार, ह्या कल्पनेने हुरळून गेलो होतो. दोन रात्री डोळ्यांला डोळा नव्हता, पण मंत्रिपदाची स्वप्ने मात्र पडत होती. भर्रर्रदिशी आपल्या मोटारींचा ताफा बंगल्याच्या आवारात शिरत आहे...बंगल्यासमोरील हिरवळीवर कार्यकर्त्यांची गर्दी उभी आहे...हारतुरे घेऊन लोक भेटायला आले आहेत...पांढऱ्याशुभ्र सोफ्यावर बसून मी आज्ञा सोडीत आहे...अशी कितीतरी स्वप्ने!

माझ्याकडे दोन मोबाइल आहेत. दोन्ही नीट चार्ज करुन ठेवले होते. लॅंडलाइनच्या फोनशी स्वत: बसून होतो. तिथेच बसून डुलक्‍या मारल्या. जेवलोदेखील! पण दैनंदिन जीवनातली कित्येक कार्ये अशी असतात की जी सोफ्यावर बसून ‘होत’ नाहीत. उदाहरणार्थ....आंघोळ! तिथेही (म्हंजे न्हाणीघरात) दोन्ही मोबाइल फोन प्लॅस्टिकच्या (दुधाच्या) पिशवीत घालून नेत होतो. पण नको तीच माणसे सतत फोन करत होती. ‘‘अभिनंदन साहेब...फोन आला का? फोन एंगेज ठेवू नका...’’ असे लोकच फोन करून सांगत होते. मी त्यांना सुनावत होतो की ‘‘ **व्यो, तुम्ही आधी ठेवा फोन ***!!!’’
एकदा फोन वाजला. ‘‘सरजी गुडमॉर्निंग जी, पीएमओसे बात कर रहें है जी!’’ पलीकडून कोणीतरी म्हणाले. तेव्हा खरे सांगतो, श्‍वास अडकला!!
‘‘जी आपको गुरुवार को ओथ लेने पहुंचना है, सरजी!’’ पलीकडून ते मधुर शब्द ऐकू आले. मी ‘थॅंक्‍यू’ म्हणून फोन ठेवला. एक भांगडापण केला. नंतर आठवले, ‘‘माझ्या हपिसातून फोन आला तरी व्हेरीफाय करा...’’ असे तुम्ही सांगून ठेवले होते. तसे मी केले. कॉल आलेल्या ‘त्या’ नंबरावर कॉलबॅक केला.
‘‘कौनसा खाता देनेवाले है मेरे को? रेल्वे मिलेगा क्‍या?’’ असा उगीचच खडा टाकला. पण तो पीसीओचा नंबर निघाला हो!! असो.
दिवसभर फोन वाजला की झडप घालत होतो. शेवटी ‘आपका क्रेडिट कार्ड ब्लॉक हो चुका है...’’ असा फोन आला, तेव्हा मी नाद सोडला. सायंकाळी साडेसहापर्यंत वाट पाहिली. साडेसहाला पत्नी आली आणि तिने विचारले, ‘‘काय हो, अजून कसा नाही आला तुम्हाला फोन?’’
‘‘येईल, येईल!’’ मी म्हणालो.
‘‘फू!! कोण्णी करणार नाही तुम्हाला फोन...बसा असेच आयुष्यभर बोंबलत. ज्यांना फोन येतात नं, त्यांनी आधीच आपली खातीसुध्दा पटकावलेली असतात. फोन यायला हे काय ‘केबीसी’ आहे का? ‘मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूं केबीसी से...’ टाइपचा? मुकाट्याने आंघोळ करा, आणि शपथविधीनंतरचं फुकट जेवण तरी जेऊन या!! निघालेत मोठे मंत्री व्हायला!!,’’ पत्नीने सुनावले.
...जो फोन यायला हवा होता, तो आलाच नाही, साहेब!! चालायचेच! ह्यालाच जीवन असे म्हणतात ना? पुनश्‍च अभिनंदन आणि आभार.
आपला. एक अनामिक खासदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com