ढिंग टांग : एक (आई) शप्पथविधी!

dhing tang
dhing tang

रायसीना हिल्सवरल्या त्या सुविख्यात प्रांगणात झालेल्या भपकेदार शपथविधी सोहळ्याला आम्हीही निमंत्रित होतो. अशा ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभणे हे दुर्मीळ असत्ये. आदल्या दिशीच नमोजींचा फोन आल्याने आम्ही खरे तर बुचकळ्यात पडलो होतो. म्हटले हे काय! निवडणूक न लढविताच आपल्याला फोन कसा आला? पण तो निमंत्रणाचा होता. असो.
कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता. निवडणुकीत एकमेकांची गच्ची धरणारे इथे एकमेकांना उराउरी भेटत होते. नमस्कार घालत होते. प्रांगणातल्या गर्दीत हिंडत असताना एका दाक्षिणात्य (टक्‍कलयुक्‍त) इसमाने आम्हाला निमंत्रणाचा कागद दाखवून आपली शीट विचारली.

‘‘येक्‍सक्‍युस्मी, व्हेअर इस माई सीट्ट?’’ त्याच्या आवाजात रेल्वेच्या बोगीतील कंडक्‍टर समोर वेटिंग लिस्टातील तिकीट दाखवत अजीजी करणाऱ्या पाशिंजराची कळा होती. आम्ही चमकून पाहिले. अय्यो! सुपरसितारा रजनीकांथ!!
‘’‘येन्न रास्कला, सीट दिखाव!’ असे म्हटले असतेत तरी चालले असते..,’’ आम्ही सलगी दाखवली.
‘‘मेकप नसताना माझ्याइतका जंटलमन तुम्हाला अखिल ब्रह्मांडात शोधून सापडणार नाही!,’’ असे सुनावत सुपरस्टार रजनीकांत घाईने पुढे निघून गेला.
...मान खाली घालून आम्ही चाललो असताना एका ठिकाणी पांढरेशुभ्र टोंकदार बूट दिसले. नजर वर नेली असता, बुटाच्या आत आख्खाच्या आख्खा जितेंद्र उभा होता. मनात आणील तर इथल्या इथे शपथ घेईल, अशा विजयी मुद्रेने धीरोदात्त पावले टाकीत तो आपल्या खुर्चीकडे रवाना झाला. जितेंद्रच्या पाठोपाठ घाईघाईने आलेल्या अनुपम खेर ह्यांनी ओळखीचे स्मित केले. वास्तविक आमची आणि त्यांची काही वळख नाही. पण गृहस्थ बऱ्या स्वभावाचे असावेत. बॉलिवूडमध्ये पॉलिटिक्‍स आणि पॉलिटिक्‍समध्ये बॉलिवूड आणणारे हे सध्याचे बिनीचे खेळाडू!!

इतक्‍यात खुद्द नमोजीच नमस्काराच्या पोजमध्ये चालत येत असल्याचे पाहून आम्ही थिजलो. असे कसे झाले? पण निरखून बघताच लक्षात आले की हा तर आपला विवेक ओबेराय!! चित्रपटात भूमिका केल्यापासून ह्या तरुण सिताऱ्यास बहुधा आपणच शपथ घेणार, असे वाटू लागले असावे...एकेक खुर्ची बॉलिवूडच्या ताऱ्या-सिताऱ्यांनी भरून जात होती. थोड्याच वेळात अभिनेत्री कंगना रणौत हिने आपली खुर्ची धरून व्यासपीठाकडे कटाक्ष टाकला आणि आम्ही खल्लासच झालो. अरे, बॉलिवूडवाल्यांना ही कुठली अवॉर्ड रजनी वाटली की काय अं? क्‍येवढी ही ताऱ्यांची गर्दी!!
ग्लॅमरच्या जंजाळात अडकून भारतीय लोकशाही कुठे चालली आहे? ह्या प्रश्‍नावर तीनेक मिनिटांचे मौलिक चिंतन करीत असतानाच ते घडले...
‘‘तुम्ही कुठून आलात?,’’ एका देखण्या तरुणाने आम्हाला हटकले. त्याच्या गालांवर चार दिसांची दाढी होती. हातात पाण्याची बाटली होती. डोळे खोल गेलेले. नजर उदास...आवाजात एक बहारदार कसक होती. दु:खी क्‍लायमॅक्‍सच्या वेळचा मेकप चेहऱ्यावर दिसत होता.
‘‘बॉम्बे!’’ आम्ही.
‘‘...मग मराठीतून घेणार का शपथ!,’’ पाण्याचा घोट घेत व्यासपीठाकडे टक लावून बघत त्या तरुणाने विचारले.
‘‘बघू!,’’ असे गुळमुळीत उत्तर देऊन आम्ही सटकलो.

...तेवढ्यात रणदुंदुभी निनादली. सारे आपापल्या जागी पांगले. आम्हीही एक बरीशी खुर्ची पकडून बसलो. पाहतो तो काय! समोरच्या रांगेतच तोच तरुण (पाणी पीत) बसला होता. शेजारी बहुधा त्यांच्या मातोश्री असाव्यात. श्रीमान नमोजी समारंभपूर्वक शपथ घेत असताना अचानक पाण्याचा घोट घेत बोट नाचवत तो संतप्त तरुण मोठ्यांदा आपल्या मातोश्रींस म्हणाला, ‘‘अपना टाइम आयेगा, अपना टाइम आयेगा!’’
...ह्या तरुणाला (नुकतेच) आपण कोठे बरे पाहिले आहे? हा विचार करतच आम्ही परतलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com