dhing tang
dhing tang

ढिंग टांग : फॉर्म्युला!

प्रिय नानासाहेब यांसी,
अवांतर बडबड करण्याची आम्हाला सवय नाही. थेट मुद्यावर आलेले बरे असते. राज्यातील निवडणुका तोंडाशी आल्या नसल्या तरी तशा टप्प्यातच आल्या आहेत. (हे म्हंजे सैपाकघरात तळणीला टाकलेल्या बटाटेवड्याच्या वासाने दिवाणखान्यातल्या पाहुण्यांना हैराण करण्यापैकी आहे! असो!!) मुद्दा एवढाच, की नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आम्ही तुमचे ऐकले. यशस्वी होऊ दिले!! आता राज्यातील निवडणुकांमध्ये तुम्ही आम्हाला विजयी होऊ दिले पाहिजे, हा सरळसाधा हिशेब आहे. परंतु, तुमच्या फौजफाट्यातील काही आगाऊ सरदार परस्पर जागावाटप जाहीर करू लागले आहेत, असे आमच्या कानावर आले आहे.  
दोन्ही मित्रपक्ष प्रत्येकी १३५ जागा लढवतील आणि अन्य मित्रांसाठी १८ जागा सोडतील, असे तुमचे एक बलाढ्य सरदार श्रीमान चंदुदादा कोल्हापूरकर ह्यांनी जाहीर केल्याचे समजले. हे कोणी ठरवले? आपल्या वाटाघाटी कधी झाल्या? कृपया कळले तर बरे होईल!!

सत्तेचे समान वाटप असे आपले पुनर्युतीच्या वेळी ठरले होते. ह्याचा अर्थ जागांचे समान वाटप असा होत नाही. सत्तेचा आम्हाला लोभ नाही, हे आम्ही गेली पंचवीस वर्षे सतत सांगत आलो आहोत (आणि तसे वागतही आलो आहोत.) परंतु, ह्याचा अर्थ आम्ही पडखाऊ आहो, असा कोणीही काढू नये. विधानसभेच्या निवडणुकीसाठी(ही) आमच्या काही पूर्वअटी आहेत. पुन्हा एकदा त्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे असे वाटते. बऱ्याचशा अटी टेबलावर बसल्यावर नीट सांगितल्या जातीलच, परंतु, काही ढोबळ अटींचे स्मरण येथे करून देत आहो. वाचा :
१. पुनर्युती झाली म्हणजे वाटाघाटी होणार नाहीत, अशा भ्रमात कोणी राहू नये.
२. सत्तेचे समान वाटप झाले, तरी आम्हाला थोडे अधिक समान वाटप हवे!
३. मोठे भाऊ कायम आम्हीच राहणार!
४. निवडणुकीची तारीख जाहीर होण्याच्या आसपास तुमच्या नेत्यांनी आमच्या राहत्या घराच्या अंगणाशी येऊन वारंवार उभे राहावे. ‘भेट हवी आहे’, असे दरवानास सांगावे. आर्जवे करावीत. (आम्ही खिडकीतून बघत राहू!!) आम्ही भेट नाकारू.
५. मग एखाद्या रात्री (नऊबिऊनंतर...पण दहाच्या आत!) तुम्ही स्वत: काळ्या काचांच्या मोटारीतून यावे. साबूदाणावडा वगैरे पदार्थांचा आस्वाद घ्यावा. (प्रत्येकी दोन मिळतील!) सोबत दही मिळेल.
६. आम्ही आर्डाओर्डा करू, तुम्ही सर्व काही आलबेल असल्याचे बोलत राहावे. असे काही काळ चालू राहिलेच पाहिजे.
७. तुमचे चंदुदादा कोल्हापूरकर आणि गिरीशभाऊ महाजन ह्या दोघा नेत्यांना वाटाघाटींसाठी पाठवू नये. मतदारसंघांच्या वाटपानंतर श्रीमान गिरीशभाऊ महाजन ह्यांना आमच्या मतदारसंघात फिरकण्यास विशेषत: मज्जाव करण्यात यावा!!
८. तुमच्या दिव्य कारभाराचे जाहीर वाभाडे काढण्यास आम्ही मुखत्यार आहो. पण तुम्ही दुरुत्तर केल्यास महाग पडेल, ह्याची नोंद घ्यावी.
९. तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आमच्या दारात आलेच पाहिजेत! नुसता फोन चालणार नाही, ह्याची नोंद घ्यावी.
१०. सत्तेच्या समान वाटपात दोन मुख्यमंत्र्यांची आयडिया कशी वाटते? एका खुर्चीत तुम्ही आणि दुसऱ्या खुर्चीत आम्ही!! (आमची खुर्ची थोड्या अधिक उंच पाठीची!! चालेल?) कळावे!!

...वरील अटींचे मनन व चिंतन करून मगच पुढे जाता येईल. आमच्या अन्य काही अटीदेखील आहेत. त्या टेबलावर बसून मगच सांगू. ह्या अटींना इशारे मानण्यासही आमची हरकत नाही.ता. क. : आम्हाला खूश करण्यासाठी वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवारजी ह्यांना कचकड्याचे वाघ घेऊन पाठवू नये. घरात ऑलरेडी चिक्‍कार वाघ आहेत! कळावे.
आपला पंचवीस वर्षांचा मित्र. उधोजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com