ढिंग टांग : ‘विस्तार’भय!

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 13 जून 2019

मुख्यमंत्री श्रीमान नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत नमस्कार. मी आपल्या पक्षाचा साधासुधा व निरलस व निरपेक्ष कार्यकर्ता असून अन्य आमदारांप्रमाणेच मलाही लोकांनी मोदीलाटेत निवडून दिले व आमदार केले आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी गेली साडेचार वर्षे लोकांची निरपेक्ष व निरलस सेवा केली. (पदाची अपेक्षा मी केली नाही आणि आपणही माझा कधी विचार केला नाहीत.) मला त्याचे दु:ख नाही. पक्षाने मला ऑलरेडी भरपूर काही दिले आहे. (मंत्रालयातल्या क्‍यांटिनमधला शेट्टी वळख दाखवतो.) सतरंज्या उचलणारा बबन्या (हे माझे टोपणनाव) आता इनोव्हातून फिरायला लागला, ह्याचेच आमच्या लोकांना भारी कौतुक आहे.

मुख्यमंत्री श्रीमान नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत नमस्कार. मी आपल्या पक्षाचा साधासुधा व निरलस व निरपेक्ष कार्यकर्ता असून अन्य आमदारांप्रमाणेच मलाही लोकांनी मोदीलाटेत निवडून दिले व आमदार केले आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी गेली साडेचार वर्षे लोकांची निरपेक्ष व निरलस सेवा केली. (पदाची अपेक्षा मी केली नाही आणि आपणही माझा कधी विचार केला नाहीत.) मला त्याचे दु:ख नाही. पक्षाने मला ऑलरेडी भरपूर काही दिले आहे. (मंत्रालयातल्या क्‍यांटिनमधला शेट्टी वळख दाखवतो.) सतरंज्या उचलणारा बबन्या (हे माझे टोपणनाव) आता इनोव्हातून फिरायला लागला, ह्याचेच आमच्या लोकांना भारी कौतुक आहे. परंतु, परवाचे दिशी राज्यात शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खबर लागल्याने आपल्याच काही कार्यकर्त्यांनी मला ‘तुम्ही जोर लावा’ अशी गळ घातली. मी स्वत:हून कुठलेही पद मागणार नाही, असे मी निक्षून सांगितल्यावर निदान आपल्या मतदारसंघासाठी तरी मंत्रिपद मिळवा असा त्यांचा आग्रह राहिला. म्हणून हा पत्रप्रपंच.

साहेब, आपल्या टर्मचे शेवटचे तीन-चार महिनेच उरले आहेत. ऑक्‍टोबरात नव्याने निवडणुका होतील. ह्याचा अर्थ सप्टेंबरात आचारसंहिता लागेपर्यंतच नवे मंत्री कारभार करणार! पण तरीही हरकत नाही, तीन-चार महिने तर तीन-चार महिने!! एकदा ‘माजी मंत्री’ असे बिरुद लागले की पुरे झाले!! सतरंज्या उचलणारा हा बबन्या (म्हंजे मी!) किती काळासाठी मंत्री होता, ह्याची इतिहासात नोंद होणार नाही, पण तो माजी मंत्री असल्याची नोंद मात्र सरकार-दरबारी राहणार! करिअरला बरे पडते!! म्हणूनच औंदाच्या विस्तारात आमचा ‘लंबर’ लावावा, ही आग्रहाची विनंती.
मंत्रिपद मिळण्यासाठी नेमके काय करावे लागते? ह्याची टोटल गेली साडेचार वर्षे लागली नाही. आत्ताही ती लागली आहे, असे म्हणता येणार नाही. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या आल्याच्या दुसऱ्या दिवशीच मी आपल्याकडे येऊन गेलो होतो. सहाव्या मजल्यावर येऊन आपल्याला लांबूनच नमस्कार केला होता. (आपण ओळखीचे हसलाही होता...) विस्ताराच्या वेळी आपला चेहरा आणि नाव साहेबांच्या लक्षात कसे येणार? असा प्रश्‍न पडला. (सोबत माझा फोटो अटॅच केलेला आहे. बघून घ्यावा!) बराच वेळ तिकडेच टंगळमंगळ करुन परतलो.

जळगावचे ट्रबलशूटर मंत्री गिरीशभाऊ महाजनसाहेबांना सांगितले तर काम हमखास होईल, असे कुणी तरी पक्षसहकाऱ्याने सुचवले. त्यांनाही भेटून आलो. पण ‘तुम्हाला अर्धमत्स्येंद्रासन येते का?’ असा पहिलाच प्रश्‍न त्यांनी विचारल्याने उठून परत आलो!! मंत्री होण्यासाठी काय काय करावे लागते, ह्या विचाराने विषण्ण व्हायला झाले होते. आणखीही अनेकांना भेटलो. पण मंत्रीपदाचा विषय काढला की सगळे विषय बदलत असत. शेवटी नाद सोडून दिला. म्हटले आपण बरे, आणि आपली आमदारकी बरी!!
केंद्रात मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी आदरणीय नमोजींचा फोन येईल, असे आपल्या खासदारांना सांगण्यात आले होते. ‘शपथविधीसाठी तयार रहा’ असा आदेश येईपर्यंत कोणावरही विश्‍वास ठेवू नका, अशी तंबी देण्यात आली होती. तसा तर तुमचा काही इरादा नाही ना? तसा असला तरी काही हरकत नाही. कुठल्याही क्षणी सीएमसाहेबांचा फोन येईल, असे सांगून मी दोघा-दोघा कार्यकर्त्यांना फोनशी रात्रंदिवस बसवून ठेवले आहे, आणि माझा मोबाइलही चार्ज करुन ठेवला आहे. कृपया आपला फोन यावा!! मी वाट पाहतो आहे. एकदा तरी त्या खुर्चीत बसवा, राया!! आपला आज्ञाधारक. एक अनामिक आमदार. (सोबतच्या फोटोमागे नाव लिहिले आहे...) जय महाराष्ट्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article