गुड मॉर्निंग! (एक मुक्‍त चिंतन...)- ढिंग टांग

गुड मॉर्निंग! (एक मुक्‍त चिंतन...)- ढिंग टांग

गुड मॉर्निंग! गुड मॉर्निंग! गुड मॉर्निंग!!... अगदी त्रिवार गुड मॉर्निंग! गुड मॉर्निंग करणे हे शिष्टाचाराचे, सुसंस्कृतपणाचे आणि सुशिक्षित असण्याचे प्रमुख लक्षण आहे. काही नतद्रष्ट लोकांना ‘गुड मॉर्निंग’ केले तरी ते त्याला उत्तर म्हणून ‘व्हेरी गुड मॉर्निंग’ असे शिष्टाचारापुरतेही म्हणत नाहीत. काही अस्सल शिष्ट नुसतेच ‘मॉर्निंग’ असे म्हणून मान डोलावतात. अशा लोकांना मराठी भाषेत पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने ‘गुड मॉर्निंग’ म्हणावेसे वाटते; पण तसे म्हणू नये. कां की ते अशिष्ट, असंस्कृत किंवा अशिक्षिताचे लक्षण मानले जाते.

‘गुड मॉर्निंग’ सर्वसाधारणपणे सकाळीच म्हणायचे असते. कां की, काही गोष्टी सकाळीच करावयाच्या असतात. उदाहरणार्थ : दांत घासणे!! (तुम्हाला काय वाटले? आम्ही दुसरे एखादे उदाहरण देऊ? आम्ही जंटलमन आहोत!) दुपारी किंवा सायंकाळी ‘गुड मॉर्निंग’ घालणे हे तितकेसे प्रशस्त मानले जात नाही. एखाद्यास ‘गुड मॉर्निंग’ म्हटले की त्याचा अर्थ ‘तुझी सकाळ चांगली जावो, आणि दुपारनंतर तुझा बॅंड वाजो!!’ असा होत नाही. कां की ‘गुड आफ्टरनून’ आणि ‘गुड इव्हनिंग’ किंवा ‘गुड नाइट’ असे सत्रनिहाय वेगवेगळे म्हणायची विलायतेत चाल आहे.

सक्‍काळच्या पारी कुणाला बिछान्यातून निखळवायचे असेल तर ह्या शब्दांचा मात्र काही उपयोग होत नाही, असा अनुभव आहे. त्यासाठी अस्सल मऱ्हाटी शेलके ‘गुड मॉर्निंग’च कामास येते. ‘‘उठ, ***...पसरलाय अजून ** ** ***!!!’’ ह्या उद्‌गारात दम आहे. आपुलकी आहेच; पण धमकीही आहे. काही शाकाहारी लोक ‘शुभ सकाळ’ किंवा ‘शुभ प्रभात’ असे ठणकावून देशी भाषेत म्हणतात. ते बरे असले तरी तितकेसे बरे नाही. मराठी वा अन्य भाषांतील प्रभाती शुभेच्छांना फार तर फोडणीच्या भाताचा स्वाद असतो. ‘गुड मॉर्निंग’ ह्या विलायती शब्दालंकारास तव्यावरून थेट प्लेटीत आलेल्या डब्बल आमलेटाचा स्वाद आहे. अंडी आवडत नसतील, त्यांनी चोरून उकडलेले अंडे खाल्ल्यासारखे हळूच कुजबुजत ‘गुड मॉर्निंग’ म्हणावे, पण म्हणावे!!
गुंड माणसे गुड मॉर्निंग करतात का? नाही!! जंटलमन लोकच प्राय: एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणतात. तथापि, हा शब्दालंकार सकाळीच वापरण्याचा आहे. त्या काळात गुंड लोक जागे नसतात. त्यामुळे ह्या शब्दप्रयोगाचा बोकाळ अधोविश्‍वात झाला नाही. गुंडांची ‘गुंड मॉर्निंग’ असते, परंतु जंटलमन लोकांच्या ऊर्ध्वविश्‍वात सकाळी उपयोगात आणण्याच्या काही मोजक्‍या गोष्टी असतात. (त्याचा तपशील इथे नको!) त्यापैकी ‘गुड मॉर्निंग’ ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

थोर ब्रह्मांडनायक व आपले प्रधानसेवक श्रीमान रा. रा. नमोजी ह्यांना सकाळी कोणीही साधे गुड मॉर्निंग म्हणत नाही, हे ऐकून आम्ही व्यथित झालो आहोत. हे सर्वथा गैर आहे. ‘‘मी एटला बद्धा खासदारांना रोज बप्पोरे मेसेज भेजून गुड मोर्निंग करते, पण कोणी रिस्पोन्स देत नाही’’ अशी तक्रार त्यांनी केली. त्यानंतर लागलीच ३१ डिसेंबर तारीख आली. (योगायोगाने) पाठोपाठ नवे वर्षही आले!!

आम्ही दरवर्षी नवा संकल्प करीत असतो. त्यात औंदा आणखी एका संकल्पाची भर पडली. सकाळी उठून धडपडत उशाखालून मोबाईल काढायचा. पुन्हा शोधाशोध करून चष्मा धुंडाळायचा. मग मोबाईलवरील ‘नमो ॲप’ उघडून रा. नमोजींना आधी गुड मॉर्निंग घालायचा... तद्‌नंतर अन्य दिनक्रमास लागायचे, हा तो संकल्प. ठरले म्हंजे ठरले!!

एक जानेवारी रोजी तस्सेच केले. रा. नमोजींना गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवून विजयी मुद्रेने इकडे तिकडे पाहिले. सारीजणे आमच्याकडे पाठ करून टीव्ही पाहत होती. टीव्हीवर ‘सायंकाळच्या बातम्या’ चालू होत्या.
...गुड नाइट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com