फटकारे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 11 जानेवारी 2018

‘‘बहुत दिन झाले, आपली गाठभेट नाही की बोलणेचालणें नाही. कार्यबाहुल्यामुळे समय मिळाला नाही. सांप्रत थोडकी उसंत आहे. सबब पुनश्‍च एकवार आपल्या भेटीस घेवोन आम्ही येत आहोत!!..सोबत आणतो आहोत अस्सल व्यंग्यचित्रांचा जबर्दस्त नजराणा...ब्याकलॉग मुबलक आणि समय थोडा, ऐसा मामला. तरीही कुंचला हाती घेवोन आम्ही मैदानात उतरत आहोत. व्यंग्यचित्रें काढोन काढोन आम्ही आता आमचें गनिमांचें तोंडचे पाणी पळवू, त्यांसी पळतां भुई थोडी करुं, हीच महाराष्ट्राची आण!! व्यंग्यचित्र आमचे, सातमजली हास्य तुमचें! महाराष्ट्र हांसेल आणि गनिम धाय धाय रडेल, ही आमची हमी!! तेव्हा तारखेकडे लक्ष ठेवा आणि पुनश्‍च नवनिर्माणास तय्यार रहा.

‘‘बहुत दिन झाले, आपली गाठभेट नाही की बोलणेचालणें नाही. कार्यबाहुल्यामुळे समय मिळाला नाही. सांप्रत थोडकी उसंत आहे. सबब पुनश्‍च एकवार आपल्या भेटीस घेवोन आम्ही येत आहोत!!..सोबत आणतो आहोत अस्सल व्यंग्यचित्रांचा जबर्दस्त नजराणा...ब्याकलॉग मुबलक आणि समय थोडा, ऐसा मामला. तरीही कुंचला हाती घेवोन आम्ही मैदानात उतरत आहोत. व्यंग्यचित्रें काढोन काढोन आम्ही आता आमचें गनिमांचें तोंडचे पाणी पळवू, त्यांसी पळतां भुई थोडी करुं, हीच महाराष्ट्राची आण!! व्यंग्यचित्र आमचे, सातमजली हास्य तुमचें! महाराष्ट्र हांसेल आणि गनिम धाय धाय रडेल, ही आमची हमी!! तेव्हा तारखेकडे लक्ष ठेवा आणि पुनश्‍च नवनिर्माणास तय्यार रहा. होश्‍शियार!! ...नवनिर्माणाच्या पुढील मसलतीसाठी तांतडीने साहेबकामी रुजू व्हावे. आज्ञेचा अंमल व्हावा. साहेब.’’

...वरील मजकुराचा खलिता सांडणीस्वाराने मध्यरात्री (पक्षी : सकाळी अकराचे सुमारास) आणून दिल्याने आम्ही चमकलो. दचकलो. कचकलो! खलित्यातील हस्ताक्षर खाशा राजांचेच होते. सहीशिक्‍का थेट तस्साच...त्यांचाच. आम्ही खलित्याचें कागदास हुंगून पाहिले. बरोब्बर! वडापावाचा गंध अचूक दर्वळला. ही खाशी खूण!! खलित्यातील मजकूर वांचोन आमचे रक्‍त सळसळलें. बाहु फुर्फुरले. पोटांत गुर्गुरलें...चला पुन्हा एकदा यल्गार होणार तर!! खाश्‍या राजियांनी मनावर घेतले, आता पाऊल माघार घेणार नाही...हर हर हर हर महादेव!!

आम्ही तांतडीने ‘कृष्णकुंज’गडावर पोचलो. खलबतखान्यात ऑलरेडी खलबते सुरू झाली होती. नवनिर्माणाचे सारे सरदार दरकदार पलित्यांच्या उजेडात कुजबुजत्या आवाजात मसलत ठरवत होते. आम्ही शिरस्त्याप्रमाणे मुजरा करोन उभे राहिलो.
‘‘पण राजे...रागेजूं नका...व्यंग्यचित्रे काढून नवनिर्माण कसे साधणार? हा खरा सवाल आहे!,’’ सरखेल नितिनाजी सरदेसायांनी मानेवरील घाम पुसत प्रश्‍न उपस्थित केला.
‘‘ हे काय विचारणं झालं? व्यंगचित्रं हे तोफगोळे असतात तोफगोळे! एकदा शत्रूच्या राहुटीवर पडले की जागच्या जागी खेळ खलास!! आमची तर मुलुखमैदान तोफ आहे. आम्ही सटासट व्यंग्यचित्रांचे गोळे सोडू. त्या भडिमाराने शत्रू बेजार होईल आणि त्याची पळतां भुई थोडी होईल...कळलं?’’ राजे थबकून म्हणाले.

‘‘तुम्ही तोफगोळे तयार ठेवा...आम्ही नवनिर्माणाचे मावळे बुरुजावरुन त्यास बत्ती देऊ...काय रे सवंगड्यांनो, खरे की नाही?,’’ बाळाजीपंत अमात्यांचे बाहु फुर्फुरले. त्या फुर्फुरत्या बाहूंनीच त्यांनी आम्हाला ढुश्‍या दिल्या. आम्ही ‘हो’ म्हणालो. त्यांचे खरेच होते. व्यंग्यचित्रांच्या सुरनळ्या एकापाठोपाठ एक तोफेत चढवल्या जात असून त्यास आम्ही स्वत: बत्ती देत आहोत, असे एक मानसचित्र (व्यंग्यचित्र नव्हे!!) आमच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. सरखेलांनीही ‘अक्षी बरोबर’ या अर्थाने मान डोलावली.
‘‘ तुमची रस्त्यावरची आंदोलने पर्वडली, पण ही व्यंग्यचित्रे आवरा’, असे गनिमाने दाती तृण घेवोन म्हटले पाहिजे!..काय?’’ साहेब विजयी मुद्रेने म्हणाले. दाती तृण धरल्यावर येवढे मोठे वाक्‍य कसे उच्चारता येईल? ‘चीमची कस्त्यावच्ची इंदीलीनी पयवडई...वण ही यंज्यइये इवया’ असे काहीसे वाक्‍य होईल, हे आम्ही मनातल्या मनात प्रॅक्‍टिस करून ताडले. ( डिस्क्‍लेमर : जिज्ञासूंनी मनात म्हणावे मोठ्यांदा नको!!) पण बोललो काहीच नाही.

‘‘पहिले व्यंग्यचित्र त्या फडणवीसनानांचेच काढणाराय...माझे पोट मोठे दाखवू नका, असा खलिता त्यांनी धाडला होता. आता व्यंग्यचित्रात येवढे मोठे पोट दाखवतो की दोन कागद वापरावे लागले तरी बेहत्तर!,’’ दातओठ खात राजे म्हणाले. आम्ही नुसत्या कल्पनेनेच खोखो हसलो.‘‘पण राजे, नवनिर्माणाचे आंदोलन चालवावयाचे तर व्यंग्यचित्रेच कशाला?’’ आम्ही घाबरत घाबरत तोंड उघडले. सारा खलबतखाना चिडीचूप झाला. आता राजियांचा स्फोट होणार, ही साऱ्यांची अटकळ होती. राजे जळजळीत नजरेने आमच्याकडे बघत राहिले. भरदार खर्जात त्यांनी आम्हाला प्रतिसवाल केला. ‘‘मग? मग काय रांगोळ्या काढू?’’ इत्यलम.

Web Title: editorial dhing tang british nandi article