चॉपर राइड! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 13 जानेवारी 2018

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 पौष शु. एकादशी.
आजचा वार : फ्रायवार!
आजचा सुविचार : घार हिंडते आकाशी... लक्ष तिचे हेलिपॅडशी!!

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 पौष शु. एकादशी.
आजचा वार : फ्रायवार!
आजचा सुविचार : घार हिंडते आकाशी... लक्ष तिचे हेलिपॅडशी!!

नमो नम: नमो नम: नमो नम: (एक हजार आठ वेळा लिहिणे. पुण्याई कमी पडत्ये आहे... सिद्धमंत्राचा जप वाढवला पाहिजे!) हेलिकॉप्टर आणि माझे काय वांकडे आहे, कळत नाही. आजवर कितीतरी मंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसले असतील. किंबहुना, केवळ हेलिकॉप्टरमधून फिरायला मिळते म्हणून काही जण मंत्री झाल्याची उदाहरणे भारत देशात आहेत. आजवर इतके मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने फिरले असतील, पण त्यांना कधी मैदानातल्या वायरी, विजेचे खांब, हवेचा झोत, वाढते वजन असले प्रॉब्लेम आले नाहीत. मलाच का येतात हे कळत नाही!!

इतके लोक हेलिकॉप्टरने कुठे कुठे जात असतात, पण आम्हीच त्या उडत्या यंत्रात बसलो की काय त्याच्या अंगात येते कोण जाणे!! परवा भायंदरला बालंबाल बचावलो. हेलिकॉप्टरच्या अपघातातून वाचण्याची ही आमची चौथी वेळ!! इजा, बिजा, तिजा होऊन गेल्यावर आता काही प्रॉब्लेम नाही, असे वाटले होते, पण छे!!
ह्यावेळी तर आमच्यासोबत गुरुवर्य गडकरीसाहेब होते. भायंदरला एका कार्यक्रमासाठी एकत्र जाऊ असे ठरले. त्यांना सहज म्हटले, ""हेलिकॉप्टरने चाल्ले जाऊ...येता?'' ते कमालीचे दचकले. संशयाने पाहू लागले. जोराजोराने मान हलवून त्यांनी मोटारच बरी असे सुचवले.

"आमच्या रस्त्यावर तुमचा का येवढा राग?'' ते म्हणाले. प्रचंड खड्‌डे असल्याने रस्तामार्गे जाणे तितकेसे सुरक्षित राहणार नाही, असे पटवून मी बळेबळेच त्यांना हेलिकॉप्टरमध्ये शिरवलेच. त्यांना म्हटले, ""गंमत दाखवतो, चला तर! आयुष्यभर लक्षात राहील अशी चॉपर राइड करू!!''
भायंदरला हेलिपॅडच्या जवळच आल्यावर मीच टाळी वाजवून ओरडलो, ""वायर! वायर सांभाळा!!'' त्यासरशी घाबरून पायलटने हेलिकॉप्टर एकदम वर घेतले. तो ओरडला ""कुठाय कुठाय?'' यथावकाश हेलिकॉप्टर लॅंड झाल्यावर मी गुरुवर्य गडकरीसाहेबांना विचारले, ""मजा आली ना?''

...पूर्वी नागपुरात असताना मी स्कूटरवर फिरत असे. त्या स्कूटरमध्ये एक प्रॉब्लेम होता. तिचा ब्रेक थोडा आधी लावावा लागत असे. म्हंजे अर्जंट ब्रेक दाबला तरी गाडी थोडी पुढे जाऊन थांबत असे. रात्री सायंशाखेनंतर घराकडे येताना मी कित्येकदा गाडी पुढल्या गल्लीत नेऊन थांबवली आहे!! तिथून स्कूटर ढकलत आपल्या घराकडे आणण्यात पुढची पंधरा मिनिटे जात असत. आमच्या हेलिकॉप्टरचे तसेच असणार! एका जागी उतरायचे म्हणजे दोनदा- तीनदा वरखाली करून मगच लॅंड होण्याची सोय त्या वाहनात असणार, ह्याची मला आता खात्रीच पटली आहे. सारांश इतकाच, की अपघातातून वाचलो असे लोकांना वाटते, पण ऍक्‍चुअली तसे नसते.
भायंदरहून परत येताना आम्ही मोटारीत बसूनच आलो. म्हंजे कार्यक्रम संपल्यावर गुरुवर्य गडकरीसाहेब घाईघाईने स्टेजवरून उतरून थेट समोरच्या मोटारीतच बसले. सीट सोडायला जाम तयार होईनात. शेवटी मीसुद्धा त्याच गाडीत बसलो, आणि हेलिकॉप्टरच्या पायलटला सांगितले, ""हमारे पीछे पीछे लेना!''

रस्ताभर गुरुवर्य गडकरीसाहेब एक शब्द बोलले नाहीत. मुंबईत परतल्यावर गाडीतून उतरताना ते फक्‍त एवढेच म्हणाले, ""नानाभाऊ, सध्या काही दिवस घरच्या छताचा पंखासुद्धा लावू नका. दिवस वाईट आहेत. बेस्ट लक!'' मी म्हटले, "नमो नम:!!'

Web Title: editorial dhing tang british nandi article