ईश्‍वरी संकेत! (ढिंग टांग)

ईश्‍वरी संकेत! (ढिंग टांग)

मम्मामॅडम : (अत्यंत दिलखुलास एण्ट्री घेत)...लो मैं आ गई बेटा!
पं. राहुलकुमार : (विनयशीलतेनं) पधारो माई...हे आपलंच घर नाही का?
मम्मामॅडम : (खुशीत बॅग खाली टाकत) हुश्‍श!! इतकं बरं वाटतंय ना हल्ली!! तुझ्याकडे सगळा कारभार दिला आणि मी कशी मोकळी झाले!!
पं. राहुलकुमार : (डोळे मिटून) प्रवासाने दमून आली असशील तर अंमळ विश्राम घ्यावा माई!! थोडीशी भूक असेल, तर माझ्या पासोडीत हनुमंताचा प्रसाद आहे थोडा!! तो खा!! पेलाभर दूध प्राशन कर!!
मम्मामॅडम : गोव्याला गेले होते सुट्टी घालवायला!! दमायला काय झालंय?
पं. राहुलकुमार : (मान खाली घालून) वार्धक्‍यात थोडंसं मनोरंजन हवंच! ते क्षम्य असतं... पण मनुष्यमात्राने संन्यासाश्रमी ईशचरणी आपलं मन गुंतवावं, असं शास्त्रात म्हटलं आहे!!
मम्मामॅडम : (सपशेल दुर्लक्ष करत) गोव्यात बऱ्याच वर्षांनी मस्त सायकल चालवली मी!! काय धम्माल आली म्हणून सांगू?...तुला येते ना सायकल?
पं. राहुलकुमार : अहमद अंकलनी थोडी शिकवली होती!! पण ते मागून सीट घट्ट धरून ठेवायचे!! त्यामुळे मला प्याडल नीट मारता येत नसे!! शेवटी माझा मीच शिकलो!! मागल्या वर्षी आख्खा उत्तर प्रदेश सायकलीवरून फिरलो होतो!!
मम्मामॅडम : (अविश्‍वासानं)...नीटशी येत नाही म्हणतोस आणि आख्खा उत्तर प्रदेश कसा फिरलास?
पं. राहुलकुमार : (शांतपणे) डबलसीट!! यादवअंकलचा अखिलेश चालवत होता!! त्याचे दोन्ही पाय जमिनीपर्यंत पुरतात!!
मम्मामॅडम : (विषय बदलत) चल, मी शिकवते तुला नीट सायकल चालवायला!! आपण दोघंही कुठंतरी सुट्टीवर जाऊ!!
पं. राहुलकुमार : (नकारार्थी मान हलवत) नाही माई!! मला आता तितका वेळ नाही!! माझ्या भारतभूमीसाठी मी तन-मन-धन वेचायचं ठरवलं आहे!! ह्या भारतभूमीतील घराघरातून पुन्हा सोन्याचा धूर येवो, अफगाणापासून श्रीलंकेपर्यंत आणि ब्रह्मदेशापासून अंदमानपर्यंत अखंड भारत साकार होवो, असा माझा संकल्प आहे! स्वप्न आहे! धारणा आहे!! सारे हिंदूराष्ट्र एक व्हावे आणि ही पवित्रभूमी ईश्‍वराचे कायमस्वरूपी स्थान व्हावे, हीच माझी इच्छा आहे, तिच्यासाठी मी ईशभक्‍तीचा मार्ग निवडला आहे!!
मम्मामॅडम : (खुर्चीत मटकन बसत) तुला बरं वाटत नाहीए का बेटा?
पं. राहुलकुमार : (चिंतनशील स्मित करत) काल अमेठीला जाताना रस्त्यात चुरवामधल्या प्रसिद्ध श्रीहनुमानाचं दर्शन घेतलं!! इतकं पवित्र आणि शांत वाटलं म्हणून सांगू!! तेव्हाच मी ठरवलं की एक दिवस अयोध्येला जाऊन रामलल्लाच्या-
मम्मामॅडम : (दोन्ही कानांवर हात ठेवत किंचाळत)...माय गॉड!! तू पार्टी बदलली आहेस की काय?
पं. राहुलकुमार : आता आपल्या सर्वांची पार्टी एकच- माणुसकीची पार्टी! भगवंताचे आशीर्वाद पाठीशी असले की देवाचं राज्य निर्माण व्हायला वेळ नाही लागणार!! गुजराथेत पाहिलंस ना! प्रत्यक्ष भोलेनाथाचा आशीर्वाद मिळाल्यावर-
मम्मामॅडम : (वैतागून) काही सांगू नकोस!! गुजराथेत सत्तावीस देवळं हिंडलास, तेव्हाही मी ‘हे आता आवर, आपल्या पार्टीच्या धोरणात बसत नाही,’ असं सांगितलं होतं!! आता अमेठी आणि रायबरेलीत जाऊन देवळात पूजापाठच करणार आहेस का?
पं. राहुलकुमार : (निग्रहानं) होय माई, आधीच उशीर झाला आहे!! परमेश्‍वराचे संकेत आपल्याला राजकारणामुळे फार उशिरा कळले!!
मम्मामॅडम : (संयम राखून) कुठले संकेत?
पं. राहुलकुमार : (भक्‍तिभावाने ओसंडत्या सुरात) आपल्या पक्षाचं चिन्ह काय आहे?- हात! आशीर्वादाचा हात!! ही अध्यात्मिक खूण पटली आहे मला माई!! (डोळे मिटून गुणगुणत) ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्‍ती चारी साधलिया।।..’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com