छाबड हाऊस! (ढिंग टांग)

छाबड हाऊस! (ढिंग टांग)

गजबजलेल्या वस्तीत
उभ्या असलेल्या त्या
अबोल इमारतीत हल्लीच
पुन्हा राहू लागला आहे पुरेसा उजेड,
धटिंगणासारखा भाडे बुडवून
इतके दिवस राहिलेला काळोख
पळून गेला रातोरात एकदाचा
तोंड काळे करून...काळे करून.
पुन्हा एकवार दूध ऊतू
जाऊ लागले आहे तेथे,
दर्वळू लागले आहेत व्यंजनांचे सुवास...
पुन्हा दिसू लागल्या आहेत
जागोजाग पितळी कुंड्यांमधील
शोभिवंत पामची झाडे
किंवा देखणा निवडुंगही.

भिंतींवरही नव्याने झाली आहे,
बरीच वर्षे रेंगाळलेली रंगसफेतीही.
प्रार्थनांचे सूर ऐकून
अबोल इमारत मधूनच मिटते डोळे,
टाकते उसासा...किंवा
एखादा तरी सुटकेचा नि:श्‍वास.

समोर उभ्या असलेल्या
लहानग्या अनाथ मोशेला बघून
मात्र तिनं केले एक निर्भेळ स्मित.
निरखून पाहात राहिला मोशे
आपल्या दुबळ्या दृष्टीनिशी.
शोधत राहिला ओळखीच्या
पायऱ्या, फरशांचे परिचित आकार.
शोधत राहिली त्याची दुबळी नजर...
-बंदुकांच्या फैरींनी उडालेले टवके,
-उडालेले रंगांचे अमंगळ पोपडे,
-भिंतीशी टेकून हलकेच कलंडणाऱ्या
देहाप्रमाणे खालवर उमटलेले
लाल रंगाचे सलग उभे फराटे.
-फरशीवर साचलेले थारोळ्यांचे डाग.
-भिंतींनी आपल्या कानांनी ऐकलेले
बॉम्बस्फोट, बंदुकांचे आवाज.
-दहशतीच्या काही सावल्यांची सळसळ.

""काय पाहातो आहेस मोशे?,''
इमारतीने त्याला विचारले...
""अंहं...काही नाही...काही नाही...''
जोराजोरात मान हलवून
अनाथ मोशे नुसताच म्हणाला,
इमारतीशेजारील पत्र्याच्या चाळींकडे
पाहून त्याने नकळत जोडले हात,
जणू कुणी घंटानादच केला आहे...

""तू अवघा दोन वर्षांचा तर होतास,
दहा वर्षांपूर्वीचे आघात तुला
आता आठवणार तरी कसे?''
कुणीतरी म्हटलेच त्याला...
त्यावर मोशे त्वेषाने उत्तरला,
""आठवतात...स्वच्छ आठवतात.
इथे ह्या भिंतीशी माझ्या आईने
मोजली होती माझी उंची,
त्याच्या खुणा होत्या...
त्या...त्या कुठायत?''

अबोल इमारतीने पुन्हा घेतले
डोळे मिटून आणि सोडला
एक अनाथ नि:श्‍वास.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com