...केला तुला फर्जंद! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान (बुद्रुक) वेळ : मसलतीची.
काळ : घडी बदलण्याचा ! प्रसंग : पेच !
पात्रे : राजाधिराज उधोजीराजे आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद.
.....................
महाराष्ट्राचे तारणहार आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा जिताजागता हुंकार जे की राजाधिराज उधोजीराजे आपल्या अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. मधूनच ‘जगदंब, जगदंब’ असे पुटपुटतात. मधूनच बाहेर डोकावून चाहूल घेताना दिसतात. बराच काळ कोणीही येत नाही, हे बघून वैतागतात. अब आगे...
उधोजीराजे : (खच्चून ओरडत) कोण आहे रे तिकडे? (कोणीही येत नाही, हे बघून आणखीनच चिडतात...) अरे, कोणी तरी या रेऽऽ...फर्जंदाऽऽ...
मिलिंदोजी फर्जंद : (आरामात एण्ट्री घेत) येवडं वरडाया काय झालं?
उधोजीराजे : (दात ओठ खात) कुठे कडमडला होतास? ह्या इथं दरवाजात स्टुलावर तुझी नियुक्‍ती केली आहे ना?
मिलिंदोजी : (गुळमुळीत उत्तर देत) जरा भाईर गेल्तो!!
उधोजीराजे : (संतापातिरेकानं)...शी:!! हे काय उत्तर झालं? (आठवण करून देत)...आणि मुजरा राहिला !
मिलिंदोजी : (जीभ चावत) माफी असावी महाराज ! हा घ्या मुजरा !!
उधोजीराजे : (वैतागून) अरे, मुजरा म्हणजे काय गजरा आहे का? ती एक चांगली सवय असते...
मिलिंदोजी : कशापायी आठवन केली व्हती महाराजांनी गरिबाची?
उधोजीराजे : (विचारमग्न अवस्थेत) फर्जंदा, काळ मोठा कठीण आला आहे !! मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायानं आमचं मन भडकून उठलं आहे ! विचार करकरोन मस्तक फुटून गेलं आहे !!
मिलिंदोजी : (मान डोलावत) खोबरेल तेल आनू?
उधोजीराजे : (दुर्लक्ष करत)...राज्याची घडी बदलावी, असा विचार मनीं डोकावू लागला आहे !!
मिलिंदोजी : (चुटकी वाजवत)...आर्जंटमध्ये बदलून टाका !!
उधोजीराजे : (स्वत:शीच बोलल्यागत) आमच्या सरदार-दरकदारांमध्येही काही प्रमोशनं केली पाहिजेत !!
मिलिंदोजी : (होकार भरत) त्ये तर पैलं करा, म्हाराज ! कां की आपल्या मराठी मान्साचा स्वोभाव राहातोय चंचल !! न्हाई मन रमलं तर जातील तिकडं... पार कमळाबाईच्या दारात !! उगीच कशापायी इषाची परीक्षा बघायची?
उधोजीराजे : (निर्धारानं) यापुढली सर्व युद्धं आम्ही स्वबळावर लढायचं ठरवलं आहे !!
मिलिंदोजी : (दाद देत) ह्ये तर लई ब्येस झालं !!
उधोजीराजे : किती काळ आम्ही त्या कमळाबाईचा पदर धरोन काळ कंठावा, ह्याला काही लिमिट? मराठी माणसाला काही स्वाभिमान आहे की नाही?
मिलिंदोजी : (जोरात मान डोलावत) हाय कीऽऽ...चांगला कोबीच्या गड्ड्यायेवडा हाय !
उधोजीराजे : (न कळून) काय?
मिलिंदोजी : (हाताने आकार दाखवत) स्वाभिमान !
उधोजीराजे : (हेटाळणीच्या सुरात) वेडाच आहेस ! स्वाभिमान असा काय कोबीसारखा असतो? तो...तो... (काही न सुचून) थोडा वेगळा असतो !!
मिलिंदोजी : युवराजास्नी पन काही थोडी जाहागीर दिऊन मार्गी लावा, असं म्हन्तो मी !! (बिचकत) आनि आमचं पन बघा की कायतरी !!
उधोजीराजे : (खुश होत) शाब्बास ! आमच्या मनातलं बोलिलास !! हुशार आहेस म्हणून तर केला तुला आमचा खाजगी फर्जंद !! तुझ्या ह्या अतिचलाख मेंदूलाच आमचे सरदार घाबरतात आणि दबकून राहतात ! काही जण तर पळूनसुद्धा जातात !!
मिलिंदोजी : (नम्रपणे) मी गरीब बिचारा कार्येकर्ता आहे महाराज ! माझी जागा भाईर स्टुलावरच राहनार !!
उधोजीराजे : चल, केला तुला आमच्या दौलतीचा फर्जंद ! आता तुझी जागा आमच्या दरवाजाशी नव्हे, तर दौलतीच्या वेशीपाशी !! जगदंब जगदंब!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com