नवा नेता! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

विक्रमादित्य : हे देअर बॅब्स...मे आय कम इन?
उधोजीसाहेब : नोप...
विक्रमादित्य : ह्याला काय अर्थय?
उधोजीसाहेब : बराच अर्थय! मला भेटण्याची ही वेळ नाही! आणि मला चारचौघात बाबा, बॅब्स असं काहीही म्हणायचं नाही! सांगून ठेवतोय!!
विक्रमादित्य : व्हाय नॉट? मी म्हणणार! अगदी सहा वेळा म्हणणार...बॅब्स! बॅब्स! बॅब्स!!
उधोजीसाहेब : हे तीनदाच झालं! थॅंक्‍यू!!
विक्रमादित्य : पुढचे तीन मी मनात म्हटले!! बॅब्स...आय हॅव अ क्‍वेश्‍चन! मला एक प्रश्‍न विचारायचाय!
उधोजीसाहेब : माझ्याकडे उत्तर नाहीए! गुड नाईट!!
विक्रमादित्य : धिस इज राँग!
उधोजीसाहेब : काय राइट आणि काय राँग हे मी ठरवणार! मला भेटायचं असेल तर वेळ घेऊन या!!
विक्रमादित्य : तुम्हाला भेटायला मीसुद्धा वेळ घ्यायची? धिस इज टू मच!
उधोजीसाहेब : आता तू नेता झालायस! पक्षाचा डेकोरम पाळावा लागतो सगळ्यांना!! आपल्या नेत्यांना लग्गेच मी भेट दिल्याचं कधी तू ऐकलंयस?
विक्रमादित्य : नाही!!
उधोजीसाहेब : झालं तर मग! त्यांना जो न्याय, तोच तुलासुद्धा! माझी वेळ घेऊन भेटायला ये!! यापुढे माझ्या खोलीत दार न ठोठावता घुसणं बंद! ओके? आता जरा जबाबदारीनं वागा!!
विक्रमादित्य : नेता बनल्यानंतर माणसानं जबाबदारीनं वागावं लागतं का बॅब्स?
उधोजीसाहेब : छे! काहीही बरळतोयस! नेतेगिरीचा आणि जबाबदारीचा काय संबंध?
विक्रमादित्य : मग मीच काय घोडं मारलंय?
उधोजीसाहेब : तू झोपायला जा ना प्लीज!!
विक्रमादित्य : मी जागरणाची प्रॅक्‍टिस करतोय! मी नेता झाल्यामुळे आता मुंबईत नाइट लाइफ सुरू करीन! मग जागावं लागणारच ना!!
उधोजीसाहेब : परीक्षेच्या वेळेला ही प्रॅक्‍टिस कामी आली असती रे!!
विक्रमादित्य : बॅब्स...मी नेता झालो म्हणून लोकांनी फटाके वाजवले!! मी म्हटलं फटाके का वाजवता? त्यानं नॉइज पोल्युशन होतं!!
उधोजीसाहेब : नॉइज पोल्युशनवरचा सोपा उपाय म्हणजे कानात कापसाचे बोळे घालणं हा आहे!!
विक्रमादित्य : नेता होण्यासाठी बरंच वर्क करावं लागतं ना ॲक्‍चुअली?
उधोजीसाहेब : कुठल्या गाढवानं सांगितलं तुला हे?
विक्रमादित्य : मी कविता करतो बॅब्स! माझा एक कवितासंग्रहदेखील प्रसिद्ध झालाय!...ब्लॅक अँड व्हाइट!!
उधोजीसाहेब : असू दे असू दे!! पुन्हा करू नकोस म्हंजे झालं!!
विक्रमादित्य : मी करणार! इतर लोक व्यंग्यचित्र काढून नेतेगिरी करतात! मी कविता केल्या तर काय वाईट आहे?
उधोजीसाहेब : कविता करणं हेच मुळात वाईट आहे! सोड ही सवय!!
विक्रमादित्य : आय सी...बॅब्स, मी नेता झालो, म्हणून कमळ पार्टीच्या शेलारकाकांनी मला खो खो हसणारी स्मायली पाठवली व्हॉट्‌सॲपवर!! आता ह्यात जोक काय झाला?
उधोजीसाहेब : तू त्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस!! ती वाईट माणसं आहेत!!
विक्रमादित्य : पण देवेन अंकलनी पण अंगठ्याची इमोजी पाठवली!! मी त्यांना डोळा मारणारी स्मायली पाठवली!!
उधोजीसाहेब : च...च...तू तुझा मोबाइल फोन माझ्याकडे देऊन जा बरं!!
विक्रमादित्य : आपण आता बाहेरच्या राज्यातही इलेक्‍शन लढवणार ना बॅब्स?
उधोजीसाहेब : येस...नक्‍कीच! घाबरतो की काय!!
विक्रमादित्य : दिल्लीतसुद्धा?
उधोजीसाहेब : अफकोर्स!! अगदी पंजाबातसुद्धा!!
विक्रमादित्य : आपण जम्मू-काश्‍मीरमध्ये निवडणुका लढवणार?
उधोजीसाहेब : अर्थात!
विक्रमादित्य : फॅण्टास्टिक! तुम्हाला संधी आहे बॅब्स!
उधोजीसाहेब : कसली?
विक्रमादित्य : श्रीनगरच्या लाल चौकात भगवा फडकवण्याची!! याल ना?
उधोजीसाहेब : (दात ओठ खात) आता जातोस की....जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com