असा मी काय गुन्हा केला? (ढिंग टांग)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

ब्रिटिश नंदी
प्रिय नानासाहेब,
 शतप्रतिशत प्रणाम.

ब्रिटिश नंदी
प्रिय नानासाहेब,
 शतप्रतिशत प्रणाम.

अतिशय अर्जंटमध्ये सदर पत्र लिहीत आहे. पोलिस खाते तुमच्याकडेच आहे, त्यामुळे तुम्हीच ह्या प्रकरणात लक्ष घालावे, ही विनंती. गेले काही दिवस मला घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले आहे. कुणी एक अज्ञात व्यक्‍ती मला त्रास देत असून जीव हैराण होऊन गेला आहे. गेले अनेक दिवस मला रात्री-अपरात्री फोन येत असत. फोन उचलला की कोणीही बोलत नसे. नुसते श्‍वासोच्छ्वास ऐकू येत! पण मी दुर्लक्ष केले. मग हे प्रकार वाढतच गेले. सार्वजनिक जीवनात असे अनुभव येतात, ह्याची मला चांगली कल्पना आहे. ब्लॅंक कॉल देणे ही तशी जुनीच आयडिया आहे!! पण ते जाऊ दे.
त्रासाचे वेगवेगळे अनुभव येऊन राहिले आहेत. कधी कधी माझ्या गाडीच्या टायरची हवा कुणीतरी काढून टाकलेली असते व मला चालतच पक्ष कार्यालयात यावे लागते. पक्ष कार्यालयात येताना हल्ली मी पिशवी घेऊनच येतो. गेल्या काही महिन्यांत माझे बारा चप्पलजोड पळवण्यात आले आहेत. दुपारी जेवल्यानंतर आरामात पडावे, तर घराची कडी वाजवून पळ काढण्याचे प्रकार होऊ लागले आहेत!! सुरवातीला वाटले, कांग्रेसवाल्यांचा चहाटळपणा असेल. पण तसे नव्हते...

परवा रात्री तर त्या अज्ञात व्यक्‍तीने कहर केला. रात्री दोन-अडीचचा सुमार असेल. मी पुस्तक वाचत बसलो होतो. मग उठून पाणी पिऊन दिवा मालवून झोपी गेलो. थोड्या वेळाने पाहातो तो काय...खोलीतला दिवा पुन्हा जळत होता. मी म्हटले, चुकून राहिला असेल. पण छे, असे बऱ्याचदा झाले. लावलेले दिवे विझवता विझवता सकाळ उजाडली...सकाळी दाराशी बघितले तर एक चिठ्ठी अडकवली होती. त्यावर लिहिले होते : ‘ असा मी काय गुन्हा केला? गुन्हा केला असेल तर शिक्षा करा, नाही तर मी तुम्हाला शिक्षा करीन!’ माझे धाबेच दणाणले आहे!!
नानासाहेब, मला सध्या खूप मानसिक त्रास होत आहे. झोप उडाली आहे. भूक मेली आहे. साहजिकच त्याचा पक्षाच्या कामावर परिणाम होत आहे. आपल्या अखत्यारीतील पोलिस खाते ड्युटीवर लावून सदर व्यक्‍तीचा छडा लावून तिला योग्य ती शिक्षा करावी, ही विनंती.
आपला.
 रावसाहेब.
* * *
प्रिय रावसाहेब,
 शतप्रतिशत प्रणाम.

 काहीही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काहीही होणार नाही. मी आहे ना? सदर खेळ हा कुठल्याही टारगट पोराचा नसून संशयित माझ्या अगदी चांगल्या माहितीतला आहे. (तुमच्याही माहितीतला असणारच!) जी व्यक्‍ती तुम्हाला सध्या टार्गेट करत आहे, तिचे खरे टार्गेट मीच आहे!! पण आमच्या ‘वर्षा’ बंगल्यात खोल्याच इतक्‍या आहेत की कुठल्या खोलीत शिरून चहाटळपणा करायचा, हेच त्या व्यक्‍तीला कळत नसणार!! सदर व्यक्‍ती मला मंत्रालयात सारखी भेटत असे. सावलीसारखा पाठलाग करीत असे. पण मी अजिबात लक्ष दिले नाही. शेवटी मी (त्या व्यक्‍तीस टाळण्यासाठी) सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहातूनच काही काळ काम पाहात होतो. तेथे कडेकोट बंदोबस्त असल्याने सदर व्यक्‍तीला शिरकाव साधणे अशक्‍यच होते. पण तेथेही एकदा मला निनावी पत्र आले. त्यात लिहिले होते : ‘असा मी काय गुन्हा केला? गुन्हा केला असेल तर शिक्षा करा, नाही तर मी तुम्हाला शिक्षा करीन!’
सदर व्यक्‍तीकडे दुर्लक्ष करणे, हीच त्या व्यक्‍तीला सर्वात मोठी शिक्षा आहे, हे लक्षात ठेवा! त्यासाठी पोलिस खात्याची गरज नाही. कळावे.
आपला
नाना.
ता. क. : ‘रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत पुस्तक वाचत बसलो होतो...’ हे वाक्‍य भन्नाटच आहे! हाहा!! नाना.

Web Title: editorial dhing tang british nandi article